मालवणीत हिंदू कुटुंबावर दबावतंत्र; अनधिकृत बांधकामाचे पितळ उघडे!

    18-May-2026   
Total Views |
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे स्थानिक हिंदू कुटुंब प्रचंड दबावाखाली आल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय. काँग्रेस नगरसेवक हैदर अस्लम शेख यांच्या वरदहस्ताने आणि दबावतंत्रामुळे हे बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात या संपूर्ण काळ्या कारभाराचे पितळ उघडे पडले.

मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रागिणी रमाशंकर चौरसिया यांच्या मालकीच्या रुम नं. ६३ (मिलाप सोसायटी, राठोडी, मालवणी) च्या दक्षिण भिंतीला लागूनच हे अनधिकृत बांधकाम सुरू होते. पोलिसांच्या तपासातून असे लक्षात आले की, घटनास्थळी बांधकाम करत असलेला इसम शौकत हुसेन आबिद हुसेन सैय्यद याने स्वतः हे बांधकाम करत असल्याची कबुली दिली. या बांधकामाबाबत कोणतीही शासकीय परवानगी नसल्याचे त्याने पोलिसांसमोर स्पष्ट केले.

कोणतीही परवानगी नसताना ६ फूट बाय १२ फूट लांबी-रुंदीचे सिमेंट-विटांचे बांधकाम तब्बल १४ फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले आहे. यासाठी ६ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचे सिद्ध केले. आता चौरसिया कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुंबई महानगरपालिका या १४ फुटी अनधिकृत बांधकामावर तात्काळ हातोडा चालवणार का? याकडे संपूर्ण मालाडकरांचे लक्ष लागले आहे.

दरवाजा न उघडण्याबाबत दबाव!
घराच्या दरवाज्यासमोर सदर अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून आम्हाला दरवाजा न उघडण्याबाबत काही जणांकडून दबाव टाकला जातोय. याप्रकरणी धमकावण्यात सुद्धा आले आहे. हे बांधकाम करण्यासाठी परवानगी असल्याचा दावा त्यांनी केलाय. मात्र हे बांधकाम अनधिकृत आहे.

- रागिणी रमाशंकर चौरसिया, स्थानिक

हे अवैध बांधकाम होऊ देणार नाही
मालवणी परिसरातील अब्बासिया कंपाऊंड येथे रस्त्यावर अवैध छबील (पाणपोई) बनवली जात आहे. हे बांधकाम हिंदू महिला रागिणी चौरसिया यांच्या दारातच तयार केले जातेय. नगरसेवक हैदर अली शेख यांनी या बांधकामाचे उद्घाटन केले होते, असे सांगितले जातेय. म्हणून रस्ता अडवून अशा स्वरूपाचे अवैध बांधकाम करणे चुकीचे आहे. आमचा या गोष्टीस निषेध आहे. आम्ही हे अवैध बांधकाम होऊ देणार नाही.

- मिथीलेश शंकर सिंग, मालवणी प्रखंड मंत्री, विश्व हिंदू परिषद





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक