मुंबई : (Hindu Ekta Mahasankalp Pune) सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने गुरुवार, दि.२८ मे रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत सारसबाग येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 'सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने क्रांतिविनायकाची जयंती साजरी करू या आणि सारसबागेचे पावित्र्य रक्षण करण्यासाठी सिद्ध राहू या,' असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास हिंदू धर्माचे रक्षक ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, रणरागिणी उज्वला गौड, धर्मरक्षक सागर बेग, सर्वेश मेहेंदळे, प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी आणि धर्मरक्षक महेश भुईबार यांची विशेष उपस्थिती असेल. सारसबागेत होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद एकबोटे आणि पराग गोखले यांनी केले असून, पुणेकरांनी हजारोच्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन 'सकल हिंदू समाज'च्या वतीने करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी चैत्र शुद्ध विनायक चतुर्थीच्या सायंकाळी सारसबाग गणपती मंदिर परिसरात एक विशिष्ट घटना घडली होती. ईदचा दुसरा दिवस असल्याने मुस्लिम समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब या परिसरात जमले होते. काही कुटुंबांनी सार्वजनिक बागेच्या आवारात एकत्र येऊन भोजन केले, तर काहींनी तेथे नमाज पठण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी परिसरात अशा प्रकारे गर्दी झाल्याचे समोर आल्यानंतर काही हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.(Hindu Ekta Mahasankalp Pune)
या घटनेनंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत केली होती. मात्र, या तणावामुळे भाविकांना पोलीस बंदोबस्तात गणपतीचे दर्शन घ्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर, सारसबाग परिसराचे धार्मिक पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि हिंदू सणांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २८ मे रोजी होणाऱ्या सावरकर जयंतीच्या जाहीर कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने संघटित व्हावे, असे आवाहन केले जात आहे.
हिंदू समाज हा अनभिज्ञ राहिलेला नाही. त्यांचे डोळे आता उघडलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या दिवशी सारसबागेतील गणपतीच्या दर्शनाला येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिका व पोलीस यंत्रणेने हिंदू समाजासाठी योग्य ती सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा आहे.
- अनिल गचके, विश्वस्त, हिंदू पुनरुत्थान संघ (Hindu Ekta Mahasankalp Pune)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक