मुंबईत ‘काका जोसेफ बप्तिस्ता गार्डन’ आणि ‘ईस्ट इंडियन भवन’चे लोकार्पण
मुंबई भाजपाध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या हस्ते उद्घाटन;प्रकल्पात ईस्ट इंडियन म्युझियम, स्किल सेंटर आणि सांस्कृतिक पॅव्हेलियनचा समावेश
18-May-2026
Total Views |
मुंबई : (East Indian Museum) स्वातंत्र्यसैनिक काका जोसेफ बप्तिस्ता यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या ‘काका जोसेफ बप्तिस्ता गार्डन’ आणि ‘ईस्ट इंडियन भवन’चे उद्घाटन रविवारी मुंबई भाजपाध्यक्ष तथा आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प आमदार अमित साटम यांच्या विकास निधीतून साकारण्यात आला आहे.
उद्घाटन सोहळ्यास ईस्ट इंडियन समाजाचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अमित साटम यांनी सांगितले की, त्यांनी विधानसभेत या प्रकल्पाची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने जागेचे वाटप केले आणि त्याच ठिकाणी या भवनाचे बांधकाम करण्यात आले.
ते म्हणाले की, मुंबईतील आगरी-कोळी समाजाप्रमाणे ईस्ट इंडियन समाजही मुंबईचा मूळ रहिवासी समाज असून त्यांची स्वतःची वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. काका जोसेफ बप्तिस्ता हे या समाजाचे अभिमानस्थान आहेत. त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांचे वकील म्हणून काम केले होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या ऐतिहासिक घोषणेला लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.
साटम यांनी सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यातील काका बप्तिस्ता यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी या भवनाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. परिसरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून येथे “ईस्ट इंडियन म्युझियम”ही तयार करण्यात आले आहे. या म्युझियममध्ये समाजाचा इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित करण्यात आली आहे.(East Indian Museum)
या प्रकल्पांतर्गत सुंदर उद्यान, मुलांसाठी खेळण्याची जागा, आधुनिक सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र तसेच सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य पॅव्हेलियन विकसित करण्यात आले आहे.
हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मोबई गावठाण पंचायतचे नेते ग्लेसन बॅरेटो, अल्फी डिसूजा आणि पंचायत ट्रस्टी यांनी दिलेल्या योगदानाचे अमित साटम यांनी कौतुक केले. तसेच हे उद्यान आणि भवन स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महान क्रांतिकारकाला समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले.(East Indian Museum)