पंच परिवर्तन’चा मंत्रच आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन

    18-May-2026
Total Views |
Dattatreya Hosabale
 
मुंबई : (Dattatreya Hosabale) “हिंदूंचे संघटन हाच हिंदुत्वाचा शाश्वत धर्म आहे. मात्र बदलत्या काळानुसार सामाजिक समरसता, परिवार प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरिक कर्तव्यांचे पालन हा ‘पंच परिवर्तन’ मंत्रच आता हिंदुत्वाचा युगधर्म आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. पुणे येथे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थानात आयोजित ‘अनंत आणि पद्मा बिरादार परिवार’ यांच्या स्नेहमिलन व परिवार प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरिहर येथील वीरशैव लिंगायत पंचमसाली जगद्गुरू पीठाचे जगद्गुरू वचनानंद महास्वामी हेही उपस्थित होते.
 
उपस्थितांना संबोधत सरकार्यवाह म्हणाले, “व्यक्ती निर्माण आणि समाजाचे संघटन हा संघाचा मूलाधार आहे. मात्र युगानुकूल समाजपरिवर्तनासाठी संघाने पंच परिवर्तनाचा विचार मांडला आहे. जन्माच्या आधारावर होणारा भेदभाव हा ईश्वरविरोधी असून हिंदू समाजात त्याला स्थान नाही. समाजातील भेदभाव पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ कायदे करून चालणार नाही, तर दैनंदिन संस्कारांमधून ते बळकट करावे लागेल.
 
नागरिकांना संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्यांचीही जाणीव असली पाहिजे. कुटुंब ही राष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक एकक आहे. याच कुटुंब व्यवस्थेमुळे भारताने हजारो वर्षे परकीय आक्रमणांचा यशस्वी सामना केला. मात्र आजच्या तांत्रिक युगात पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण केल्यामुळे आपल्या कुटुंब व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.”(Dattatreya Hosabale)
 
 
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. भारताच्या प्रत्येक भाषेत जगातील उत्कृष्ट साहित्य निर्माण झाले आहे. मुलांना परकीय भाषा अवश्य शिकवा, पण मातृभाषा बोलताना न्यूनगंड वाटता कामा नये. भाषा आणि संस्कृतीबद्दल केवळ अभिमान बाळगून उपयोग नाही, तर त्याचे दैनंदिन आचरणही झाले पाहिजे.”
 
'परिवार भारताचा प्राण' या मुद्द्यावर विशेष भर देत ते म्हाणाले, परिवारातूनच राष्ट्र निर्माण होते. भौतिक सुविधांमुळे फक्त ‘घर’ तयार होते, पण ‘कुटुंब’ आत्मीयतेतून घडते. भारतीय हिंदू जीवनपद्धतीतील कुटुंब व्यवस्थेचे जगभर कौतुक होते. आज संयुक्त कुटुंब व्यवस्था व्यवहार्य नसली तरी कुटुंबातील परस्पर संबंध, प्रेम आणि आत्मीयता टिकून राहणे आवश्यक आहे.
 
त्याचबरोबर आज सोशल मीडिया आणि स्वार्थाच्या युगात पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्यामुळे कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत आहे. अशा काळात नव्या पिढीवर योग्य संस्कार करणे ही मोठी जबाबदारी आहे. कुटुंब हे केवळ व्यवस्था न राहता संस्कारांचे केंद्र बनले पाहिजे.(Dattatreya Hosabale)
 
आधी हिंदू, नंतर लिंगायत : वचनानंद महास्वामी
 
योग आणि नैसर्गिक उपचारपद्धतीतच वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य आहे, असे सांगताना वचनानंद महास्वामी म्हणाले, “सध्या हिंदू समाजाला विभाजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लिंगायत हे सर्वप्रथम हिंदू आहेत आणि त्यानंतर लिंगायत आहेत, ही भूमिका स्पष्ट असली पाहिजे.”(Dattatreya Hosabale)