तंत्रराष्ट्राच्या उंबरठ्यावर....

    18-May-2026   
Total Views |
AI Governance Future Nations
 
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि विन्स्टन चर्चिल हे तीन महापुरुष एकत्र आल्यावर, एखादा देश चालवू शकतील का? इतिहास अभ्यासकांसाठी ही एक कवी कल्पनाच. एका बाजूला वसाहतवादी राष्ट्राचे युद्धकालीन नेतृत्व सांभाळत विश्वयुद्धाची दिशा बदलणारा नेता, दुसर्‍या बाजूला स्वदेशातील माणसांना त्याच वसाहतवादाच्या कचाट्यातून मुक्त करणारी दोन शिखराएवढी माणसं. ही माणसं एकत्र आल्यावर अर्थातच यांच्यातील संवाद-विसंवाद, हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कल्पनेच्या जगात झेप घेणार्‍या लेखकांनी, आतापर्यंत या महानायकांच्या जीवनाचे आपआपल्या परीने अर्थ लावले. मात्र, आता याच कल्पनेचे रूपांतर वास्तवात होत आहे. आतापर्यंत एखाद्या भूभागाचे शासन, हे माणसाच्या माध्यमातून होत असे. आता मात्र ‘एआय चॅटबॉट्स’, मानवविरहित शासनव्यवस्था तयार करू शकतात का? याची चाचपणी सुरु आहे.
 
साधारण एका वर्षापूर्वी डॅन थॉमसन यांनी एका बेटावर, ‘एआय’शासित देश सुरू केल्याचा दावा केला होता. ‘सेन्से’ नावाच्या एका ‘एआय चॅटबॉट कंपनी’च्या माध्यमातून फिलीपिन्सच्या किनारपट्टीजवळ एक बेट खरेदी करून, तिथे ‘सेन्से आयलंड’ नावाच्या एका देशाची निर्मिती केली. या देशाचं शासन ‘एआय’ यंत्रणांच्या माध्यमातून केले जाणार आहे. या बेटाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथील सरकार चालवण्यासाठी कोणत्याही जिवंत मानवाची निवड केलेली नाही. त्याऐवजी इतिहासातील महान विचारवंत, नेते आणि शास्त्रज्ञांच्या साहित्यावर, भाषणांवर आणि तत्त्वज्ञानावर ‘एआय’ मॉडेल्स प्रशिक्षित करून, एक ‘एआय मंत्रिमंडळ’ तयार करण्यात आले आहे. प्रसिद्ध रोमन सम्राट आणि स्टॉईक तत्त्वज्ञ मार्कस ऑरेलियस, ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, मानवी हक्कांच्या पुरस्कर्त्या एलिनॉर रूझवेल्ट, नेल्सन मंडेला, महात्मा गांधी अशा दिग्गजांच्या विचार-विनिमयातून या राष्ट्राचा कारभार संपन्न होणार आहे.
 
जगभरातील लोक या बेटाचे डिजिटल नागरिक म्हणून नोंदणी करू शकतात. हे नागरिक एका ओपन-अ‍ॅसेस प्लॅटफॉर्मवर, आपली धोरणे किंवा प्रस्ताव मांडू शकतात. त्यावर हे ‘एआय मंत्रिमंडळ’ जाहीरपणे चर्चा करते आणि मतदान करून निर्णय घेते. याउपर आतापर्यंत १२ हजारजणांनी, या आगळ्या-वेगळ्या बेटाचे रहिवासी होण्याची तयार दाखवली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता दिवसेंदिवस कितीही सर्वव्यापी होत असली, तरी तिच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतच आहे. जर ‘एआय’च्या माध्यमातून घेण्यात आलेला एखादा निर्णय मानवी मूल्यांच्या विरोधात असेल किंवा धोकादायक असेल, तर तो निर्णय रद्द करण्याचा अधिकार निवडून आलेल्या नऊ मानवी रहिवाशांच्या समितीला देण्यात आला आहे.
 
हा प्रयोग आपल्याला कितीही ‘जगात भारी’ वाटत असला, तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि तज्ज्ञांनी यावर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. हा प्रयोग करू पाहणार्‍या खुद्द डॅन थॉम्प्सन यानेच स्वतः कबुली दिली आहे की, "हा प्रयोग अत्यंत गुंतागुंतीचा असून याचा शेवट नक्की कसा होईल, याबद्दल शंका आहे!” जर भविष्यात ही संपूर्ण डिजिटल सिस्टम हॅक झाली किंवा सायबर हल्ल्याची बळी ठरली, तर हे संपूर्ण सरकार कोसळू शकते. तसेच, भूतकाळातील महापुरुषांच्या विचारांवर आधारित असलेले हे ‘एआय’ मॉडेल, आजच्या २१व्या शतकातील आधुनिक आर्थिक समस्या आणि सायबर गुन्हेगारीसारख्या लिष्ट आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहेत का? याबाबतही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
 
उपरोधाने या प्रयोगाची तुलना ‘जुरासिक पार्क’ चित्रपटाशी केली जात आहे, जिथे सुरुवातीला सर्व काही नियंत्रणात असल्याचा दावा केला गेला होता; पण नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. दरम्यान, या प्रकल्पाने २०२५ ते २०२८ असा चार वर्षांचा आराखडा तयार केला असून, २०२६ मध्ये संशोधकांचा पहिला गट या बेटावर वास्तव्यास जाणार आहे आणि तिथे पूर्णपणे सौर व अक्षय ऊर्जेवर आधारित पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
 
आधुनिक काळातून उत्तर आधुनिक काळामध्ये झेप घेत असताना, माणसाच्या वाटेला माणसाच्या प्रगतीतूनच निर्माण झालेल्या असंख्य समस्या आज उभ्या ठाकल्या आहेत. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर वातावरण तापलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सर्वव्यापी अवकाश लोकांना अचंबित करणारे आहे. या वातावरणामध्ये हे ‘तंत्रराष्ट्र’ आपल्याला कुठे घेऊन जाईल, हे बघणे औत्सुयाचे ठरते.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.