ही प्रश्नांची उत्तरे फक्त कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या विकास लवांडेसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्या केलेल्या प्रश्नमालिकांची नसून, कदाचित एखाद्या ‘वारकरीपण’ हरवलेल्या त्यांच्यातील वारकर्याचे ‘वारकरीपण’ जागे व्हावे, यासाठी आणि महाराष्ट्र व जगभरात पसरलेल्या आमच्या युवा पिढीतील वारकरी, हिंदू-धर्मप्रेमी युवकांसाठी ही धर्मशास्त्र आणि संतवाङ्मयाधारित उत्तरे आहेत! कोणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास वारकरी संप्रदाय बांधिल नाही. पण, सर्वसामान्य समाज संभ्रमित होऊ नये, खोट्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये, म्हणून श्री रुक्मिणी-पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने व श्रीज्ञानोबा-तुकोबारायादी सकलसंतांच्या कृपाशीर्वादाने हा प्रामाणिक प्रयत्न...!
ज्ञानोबा-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे जाहीर विधान करणार्या संभाजी भिडेंचा तुम्ही निषेध केला होता का?
मनूला संत ज्ञानेश्वर महाराजांनीच श्रेष्ठत्व दिलेले आहे.
मग देव म्हणे अगा पंडुसुता।
हाचि योगु आम्हीं विवस्वता।
कथिला परी ते वार्ता।
बहुतां दिवसांची ॥4/16॥
मग देव म्हणाला, “अरे अर्जुना, हाच निष्काम-कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला.
परंतु, ती गोष्ट फार दिवसांची आहे.”
‘मग तेणें विवस्वतें रवी।
हे योगस्थिति आघवी। निरूपिली बरवी। मनूप्रति ॥17॥मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तमप्रकारे सांगितली.
मनूनें आपण अनुष्ठिली।
मग इक्ष्वाकुवा उपदेशिली।
ऐसी परंपरा विस्तारिली।
आद्य हे गा ॥18॥वैवस्वत मनूने याचे स्वत: आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकु त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. आपल्याकडे आलेली निष्काम कर्मयोगाची ज्ञानपरंपरा ही कशी आली ते सांगताना माऊली मनूचे श्रेष्ठत्व सांगत असतील, तर आम्ही भिडे गुरुजींचा निषेध का करावा?
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ हे परिपूर्ण ग्रंथ नाहीत, असे जाहीर वक्तव्य करणार्या गोविंद देवगिरींचा निषेध केला होता का?
स्वामी गोविंद देवगिरींना प्रत्यक्ष पत्र लिहून वक्तव्याबद्दल ज्ञानोबा-तुकोबारायादी संतांची क्षमायाचना करण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. तुमच्या सारखे स्वामीजींची आणि समर्थांची जात पाहून विरोधासाठी आम्ही उद्युक्त झालो नाही. स्वामीजींनी सदरचे वक्तव्य मागे घेत संतांची क्षमायाचना केली. यात कुठेही वारकरी संप्रदायाच्या जय-पराजयाचा विषय नसून, संप्रदायाच्या श्रद्धास्थानात तडजोड केली गेली नाही.
सनातन धर्म प्रचलित असताना संतांनी स्वतंत्र वारकरी संप्रदाय का सुरू केला? वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माशी किंवा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही, हे मान्य आहे का?
वारकरी संप्रदाय हिंदू धर्माधिष्ठितच आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे प्रस्थानत्रयी मानले जाणारे ग्रंथ -
1) ‘ज्ञानेश्वरी’ (‘भगवद्गीता’ विवेचन) 2) ‘तुकाराम गाथा’ (चहूवेदांचे केलेसे विवरण) 3) ‘एकनाथी भागवत’ (श्रीमद्भगवत एकादश स्कंध). या तीनही हिंदू धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच अगदी तुकोबारायांनी, ‘पाहिली पुराणे। धांडोळली दर्शने॥’ असेच म्हटले आहे, कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ; एकादशी, सोमवार ही अखंड व्रते कोणत्या धर्मानुसार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
सर्वच संतांना त्रास देणारे, छळ करणारे, अपमान करणारे कोण लोक होते? त्यांचा धर्म कोणता? आणि त्यांनी संतांना का त्रास दिला होता? संतांचे काय चुकले होते?
संतांना छळणारे जसे हिंदू धर्मातीलच श्रेष्ठ शास्त्रसंपन्न लोक होते. पण, तरीसुद्धा धर्माचा अथवा शास्त्राचा निषेध संतांनी केला नाही. उलट,
शास्त्र म्हणेल ते सांडावे।
जे राज्य हि तृण मानावे।
जे घेववी ते न म्हणवे।
विषही विरु॥
शास्त्राप्रमाणेच त्यांनी आचरण केले. आपल्या आई-वडिलांना देहान्त प्रायश्चित देणारांबद्दल स्वतः ज्ञानोबाराय कोणतीही टीका-टिप्पणी न करता उलट, ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे।’ म्हणत असतील, तर लवांडेसारख्यांना, पुरोगाम्यांना संतांनी काय आपले वकीलपत्र दिलेय का? तत्कालीन परिस्थिती होती, त्यातून त्यांचे संतत्व उजळून निघाले. उलट, आता वारकरी संप्रदायाला त्रास देण्याचा प्रयत्न करणारे त्या तत्कालीन त्रास देणार्यांचेच वंशज आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
‘मनुस्मृती’चा जाहीर निषेध करणार का किंवा केलेला आहे का?
निषेध नंतर, आधी तुमच्या ज्ञानात भर...
अ) मनू हा क्षत्रिय आहे, ब्राह्मण नव्हे! ब) एकूण चौदा मनू आहेत. त्यांतील सातवे ‘वैवस्वत मनू’ हे या ‘मनुस्मृती’चे प्रणेते. क) ‘मनुस्मृती’मध्ये एखाद्या कर्माबद्दल शुद्रापेक्षा कैकपटीने जास्त शिक्षा ब्राह्मणाला आहे. कारण, ‘धर्मशास्त्राचे ज्ञान असूनही चुकीचे वागणार्यांना जास्त शिक्षा’ हा मनूचा न्याय आहे. त्यामुळे खरेतर ‘मनुस्मृती’चा निषेध ब्राह्मणांनीच जास्त करायला हवा. ड) ‘मनुस्मृती’ हा ‘याज्ञवल्क्यस्मृती’, ‘पाराशरस्मृती’, ‘हरित’, ‘देवल’ अशा अनेको स्मृतींपैकी एक आहे. स्मृतिग्रंथ म्हणजे ‘श्रुती’वरील टीका ग्रंथ आहेत. ते त्या-त्या काळानुसार, राजाने कसे न्यायदान करावे वगैरे अशा भूमिकेतून केलेले असतात. ई) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ‘बुधभूषणम्’मध्ये ‘मनुस्मृती’च्या सातव्या अध्यायातील राजधर्म (राजाची वर्तणूक) विषयावरील श्लोक घेतलेले आहेत.
वरील गोष्टी विषयांतर म्हणून नव्हे, तर ‘मनुस्मृती’ या नावापलीकडे आपल्याला काही माहिती नाही, याची कल्पना आम्हाला आहे. ती माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच! बाकी वारकरी संप्रदाय ज्या ग्रंथानुसार चालतो, ते थेट ग्रंथ ‘गाथा’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘भागवत’ ही प्रस्थानत्रयी आणि इतर सकल संतवाङ्मय आहे. या ग्रंथाच्या आधारावर आमचे नियम तयार होत नाहीत. त्यामुळे ‘मनुस्मृती’चा निषेध करण्याचा आमचा काही संबंध नाही. ज्यांना करायचा असेल, त्यांनी खुशाल करावा.
जाती-वर्ण व्यवस्था मानता किंवा नाही, स्पष्टीकरण देणार का?
जातिव्यवस्था राजकारणातसुद्धा मतांच्या गठ्ठ्यांसाठी वापरली जाते. त्यामुळे आपण यावर बोलूच नये. उलट, वारकरी संप्रदायामुळे लोक जातिभेद विसरून एकत्र येतात. त्यांना ‘धर्म’ ही संकल्पना जवळची वाटते आणि हीच सर्वांत मोठी पोटदुखी तुमची आहे. समाजातील जातिभेद संपला, तर आपण मतविभागणी कशी करणार, लोकांमध्ये भांडणे कशावरून लावणार, यामुळे वारकरी संप्रदायाला लक्ष्य केले जात आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक फड-मठावर सर्व जातीय लोक एकमुखाने पंढरीरायाचे भजन मोठ्या प्रेमाने करतात.
तुमची धर्माची नेमकी व्याख्या काय आहे? धर्म म्हणजे काय?
‘धारयती इति धर्मः’. एकटा माणूस असेल तर त्यासाठी धर्म नसून, माणसांचा समूह ज्याला धारण करून आपल्या स्वार्थाचा परिघ दुसर्याच्या आड येणार नाही असे आचरण ज्या नुसार करतो, त्याला ‘धर्म’ म्हणतात, अशी सोपी व्याख्या आहे. दुसरे धर्मशास्त्रानुसार, ‘यतो अभ्युदय: नि:श्रेयस सिद्धि: स: धर्म:’. ज्यामुळे जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याचे इहलौकिक कल्याण होते, तेच कर्म ईश्वरसमर्पण केल्याने पारलौकिक कल्याणही साधते, या आचरणाला धर्म असे म्हणतात. संतांनी फार खोलात जाण्याऐवजी ‘येथ वडील जे जे करीती। तया नाम धर्म ठेविती। येर अनुष्ठीती सामान्य सकळ॥’ आमचे वाडवडील जे नियम-धर्म पाळत आचरण करत आहेत, त्याला ‘धर्म’ म्हणतात. ‘धर्मो धारयते प्रजाः’ ज्या आधाराने प्रजा राहते, त्याला ‘धर्म’ म्हणतात. मानवाला जगण्यासाठी धर्म महत्त्वाचा आहे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चशिक्षित असतानाही निधर्मी राहण्याऐवजी भारताच्या मातीतीलच वैचारिक उपासना पंथ असणारा बौद्ध धर्म स्वीकारला. पण, ते निधर्मी राहिले नाही, हे महत्त्वपूर्ण.
संतांनी विठ्ठलाचे वर्णन, ‘धर्माची तू मूर्ती।’ असे केले आहे. म्हणजेच, धर्म हा अमूर्त आहे. त्याचे मूर्त स्वरूप अर्थात धर्माची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजेच श्री विठ्ठल उभा आहे. ही संतांची साक्ष आहे. जे संतांचे मनोगत तेच आमचे!
कोणतेही कर्मकांड, व्रत-वैकल्ये, होमहवन, यज्ञ, पुरोहितशाही वगैरे मानता किंवा समर्थन करता काय?
आपल्या धर्मशिक्षणाचा अभाव असे प्रश्न निर्माण करतो. मानवाला धर्माने संस्कारांच्या बंधनात ठेवल्याने तो मानव म्हणून संस्कारित आचरण करतो, अन्यथा मानव आणि पशू यांत फरक काय? विवाह, नामकरण, अगदी अंत्येष्टीपर्यंत सर्व षोडश संस्कारांमुळे माणसाचे माणूसपण टिकून आहे आणि संस्कार करण्याचे ज्ञान असणारा, यासाठी आपल्या आयुष्यातील 12-15 वर्षे पाठशाळेमध्ये शिक्षण घेणारा पुरोहित आणि एखाद्या कामासाठी पदवीप्राप्त पदवीधर दोन्ही आपापल्या कामाची पात्रता सिद्ध केलेले असतात. त्यात वाईट वाटण्याचे कारण काय? फक्त संतांनी प्रापंचिक सिद्धीसाठीच्या कर्मकांडात वेळ आणि शक्ती दोन्ही खर्च करण्याऐवजी ‘भगवद्प्राप्ती’च्या ‘परमार्थसाधने’चा मार्ग पत्करावा, असे सांगितले आहे. म्हणूनच, मग संतांनी ‘योग याग विधी येणे नोहे सिद्धी।’ ही भूमिका सर्वसामान्य लोकांना नामाचा महिमा पटवून सांगण्यासाठी व्यक्त केलेली आहे. योग करणे, यज्ञसामग्री जमा करणे या गोष्टी बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. याकरिता त्याने सर्वात सोपे असे भगवंताचे नाम, ‘ठायीच बैसोनी करा एक चित्त। आवडी अनंत आळवावा॥’ असे सांगितले आहे. योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आज देश-परदेशात यावर अफाट संशोधन झाले आहे. मोठमोठ्या उद्योगपतींनी ठरवले, तर यज्ञयाग त्यांच्यासाठी अवघड नाहीत. पण, संताचा अवतार हा ‘उद्धराया आले दीन जना’ असल्याने त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी सोपे वर्म सांगितले आहे. याचा अर्थ, धर्मशास्त्र नाकारलेले नाही.
इतर धर्मांचा आदर करता की, द्वेष करता?
वारकरी म्हणून आमची सकल जीवमात्रांविषयी ममत्वभावना आहे. जे संतांनी सांगितले, तेच आम्ही करतो. आपण म्हणता म्हणून संप्रदायाला आम्ही ‘निधर्मी’ म्हणणार नाही. वारकरी संप्रदाय संतांनी कोणत्याही इतर धर्माचा धिक्कार केला नाही. हे अर्धसत्य आहे. गोष्ट अशी की, ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पनाच वारकरी संप्रदायाला मान्य नाही. मात्र, ‘सर्वधर्मममभाव’ मानणारा संप्रदाय आहे. ‘यारे यारे लहान थोर। याती भलते नारी नर॥’ हे म्हणत असताना, विठ्ठलभक्तीसाठी कोणालाही अडवले नाही. सर्वांचे स्वागत केले आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान हे विठ्ठलभक्त झाले म्हणून वारकरी संप्रदाय निधर्मी झाला. हा तर्क नव्हे, कुतर्क आहे. उलट, कबीर महाराज मुस्लिमांना उद्देशून म्हणतात, ‘मुल्ला होकर बांग पुकारे युं क्या साहिब बहिरा हैं।’ (मोठमोठ्याने बांग कशाला देता, आपला देव काय बहिरा आहे का?- असा सारांश) हे सांगितले जात नाही. उलट, या सर्वांना रामभक्ती-कृष्णभक्ती-विठ्ठलभक्ती आवडल्याने आपल्या मूळ धर्मात ते परत आले आहेत, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट- आपला देव, देश आणि धर्म या विषयांवर संत कधीही तडजोड करत नाहीत आणि तडजोड करणार्यांना ते झापल्याशिवाय राहत नाहीत. आपल्यासमोर एवढे देव, एवढे संत-महात्मे असताना त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे सोडून दर्गा-कबरींंना देव मानणार्यांना तुकाराम महाराज म्हणतात-
संतां नाहीं मान।
देव मानी मुसलमान ॥1॥
ऐसे पोटाचे मारिले।
देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण। वंदी नीचाचे चरण॥2॥ तुका म्हणे धर्म।
न कळे माजल्याचा भ्रम॥3॥’
आपल्या स्वार्थापोटी संतांऐवजी मुसलमानाला देव मानणार्यांना तुकोबाराय म्हणतात, अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही. कारण, ते अज्ञानामध्ये जगत असतात. यापेक्षा आता अजून काय धर्माबद्दल स्पष्ट भूमिका हवी?
सर्वांप्रति आमचा ममत्वभाव आहे. पण, आमच्या धर्माचे अस्तित्व राखूनच, हाच संतांचा स्पष्ट संकेत आहे.
तुमचा हिंसेवर विश्वास आहे की, अहिंसेवर विश्वास आहे? साधू कुणाला म्हणतात?
‘दया तिचे नाव भूतांचे पाळण। आणिक निर्दालन कंटकांचे॥’ (सर्व जीवांचे पालन करणे ही दया, तसे दुष्टांचे निर्दालन ही दयाच).
होईल तैसें बळ।
फजीत करावे ते खळ ॥3॥
तुका म्हणे त्यांचें।
पाप नाहीं ताडणाचें ॥4॥
खळ प्रवृत्तीच्या लोकांना चोप देण्याचे पाप लागत नाही. या तर थेट जगद्गुरू तुकोबारायांच्या आज्ञा आहेत. तरीही, ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास।’ आहोत. प्रत्यक्ष हिंसेच्या घटना संप्रदायात अपवादानेच आढळतात.
संत पुरोगामी होते, तुम्ही पुरोगामी की प्रतिगामी? स्पष्टीकरण द्यावे. मुळात संतांवर शिक्का मारणारे तुम्ही कोण? ‘धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी।’ किंवा ‘आम्ही वैकुंठवासी। आलो याची कारणासी। बोलीले जे ऋषी। साच भावे वर्ताया॥’ ही संतांची स्पष्ट भूमिका आहे.
आता तुम्ही म्हणालात म्हणून आपण पाहिले, तर ‘पुरोगामी’ शब्दाची शब्दकोशीय व्याख्या ही ‘पुढारलेल्या विचारांचा’ अशी आहे. हाच अर्थ, ‘सनातन’ म्हणजे ‘नित्य-नूतन.’ सॉफ्टवेअर अपडेट होते, तसा कालसुसंगत वैदिक हिंदू धर्मच पुरोगामी आहे. मात्र, दुर्दैवाने त्या ‘पुरोगामी’ शब्दाची व्याख्या तुमच्या संगतीने बदलून ‘कुसंगे नाडला साधु तैसा।’ या न्यायाने ‘पुरोगामी’ म्हणजे ‘देव न मानणारा, धर्म न मानणारा, नास्तिक विचारांचा’ अशी झाल्याने तो शब्द विनाकारण बदनाम झाला आहे. ‘येथ वडील जे जे करीती।’ या संतांच्या व्याख्येला तुम्ही ‘प्रतिगामी’ वगैरे असे म्हणत असाल, तर तो तुमचा दोष आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्या घरात ‘इंद्रजाल’ ही तांत्रिक सिद्ध वनस्पती लावणार्यांचे कार्यकर्ते त्यांना पुरोगामित्वाचा ‘मसिहा’ म्हणतात, हा जागतिक विनोद आहे.
भारतीय संविधान मानता किंवा नाही?
वारकरी संप्रदाय भारतीय संविधानाने दिलेल्या धार्मिक-स्वातंत्र्याच्या मर्यादेतच आपला पंथ चालवतो. वारकरी संप्रदायाची एकही कृती असंविधानिक नाही.
कीर्तन-प्रवचनातून हिंदुत्ववादी भूमिका मांडणे, हे ‘नारदाच्या गादी’वरून संतांच्या विचारांना मान्य आहे का?
संतांचीच भूमिका धर्माविषयी किती स्पष्ट सांगून झाले आहे. संख्या वाढवण्यासाठी तेच ते मुद्दे पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्याचा हा प्रकार आहे. वारकरी कीर्तनकारांनी ‘धर्माचे पालन। करणे पाखांड खंडण॥ हेची आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम॥ तीक्ष्ण उत्तरे। हाती घेऊनी बाण फिरे॥ नाही भिडभार। तुका म्हणे साना थोर॥’ या पद्धतीत समाजाला उपदेश करावा, ही पुन्हा तुकोबारायांचीच आज्ञा आहे. ती आम्हाला शिरसावंद्य आहे. वारकरी कीर्तनकारांची धर्मजागृतीची भूमिका ही कोणत्याही एका निवडणूक काळापुरती नसून, समाजात ‘सार’ आणि ‘असार’ निवडण्याचा विवेक निर्माण व्हावा, यासाठीची कायमस्वरूपी प्रक्रिया आहे.
कौरव आणि पांडवांचा धर्म वेगवेगळा होता की, एकच होता?
तुमच्या प्रश्नाचा रोख कळाला. मुस्लीम धर्माची स्थापना साधारण 1400 वर्षांपूर्वी, तर ख्रिश्चन धर्म साधारण दोन हजार वर्षांपूर्वी स्थापन झाले. पण, ‘महाभारता’चा काळ आधुनिक मान्यतेनुसार, तीन हजार वर्षे, धार्मिक मान्यतेनुसार चार हजार वर्षांपूर्वी. त्यामुळे त्यावेळी सृष्टीवर एकमेव वैदिक धर्मच शिल्लक होता. त्यामुळे त्यावेळी पांडवांचा धर्म ‘सत्य’ आणि कौरवांचा धर्म ‘असत्य’ आणि आजही हीच लढाई सुरू आहे. ‘सत्य’ सनातन, वैदिक आचरणसंपन्न धर्माविरुद्ध असत्य, अनाचारी, आक्रांतकारी अशा ‘असत्य’ धर्माविरुद्धच लढाई सुरू आहे.
राम आणि रावणाचा धर्म एकच होता की, वेगवेगळा होता?
वरचाच प्रश्नाची ही पुनरावृत्ती आहे. आपली शक्ती संपत चालली आहे, असे जाणवते. उत्तर वरचेच आहे. रामाचा सत्य विरुद्ध रावणाचा असत्य धर्म!
मंबाजी स्वामींची पार्टी की, संत तुकोबांची पार्टी? दोन्ही तत्त्वज्ञान व दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या होत्या व आहेत, हे मान्य आहे का?
वारकरी फक्त माळ घालून होत नाही. त्यासाठी ग्रंथ वाचावेत. ग्रंथ वाचले की, मराठी शब्दांची वानवा भासत नाही. पार्टी नव्हे पक्ष किंवा गट. अर्थात, मंबाजी ‘असत्य’ आहेत, तुकोबाराय ‘सत्य’ आहेत. ‘मार्ग दाऊनी गेले आधी। दयानिधी संत ते। तेणेची पंथे चालो जाता। न पडे गुंता कोठे काही॥’ ज्ञानोबा-तुकोबारायादी सकल संत हीच आमची विचारधारा, हाच आमचा पंथ, पक्ष-गट सर्वस्व हेच!
हिंदू धर्माचे संस्थापक कोण आणि धर्मग्रंथ कोणता आहे?
हा धर्म अनादी अर्थात, सृष्टीच्या आरंभापासून आहे. अर्थातच, वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, असा भगवान परमात्माच याचा निर्माता आहे आणि या परमात्म्याच्या श्वासातून निर्माण झालेले ‘वेद’ हे पुढे ऋषिमुनींच्या ध्यानावस्थेतून ‘श्रुती’ रूपाने ते प्रकट झाले. ‘वेद’-‘उपनिषदे’, ‘भगवद्गीता’ व ‘ब्रह्मसूत्रे’ या प्रस्थानत्रयींवरूनच पुढे वारकरी संप्रदायातील संतांचे वाङ्मय निर्माण झाले आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे पुरोगामी आणि समतावादी विचार तुम्हाला पटतात की नाही?
हिंदवी स्वराज्याचे पुनर्संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष तुकोबारायांचा उपदेश आहे. त्यामुळे महाराज हे आमचे सर्वस्व आहेत. शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे प्रत्यक्ष अनुयायी स्वतः ज्या दिवशी त्यांचे 100 टक्के विचार स्वीकारतील, त्या दिवशी आम्हीसुद्धा निश्चितच प्रेरित होऊ. सध्याच्या घडीला समाजासाठी त्यांनी केलेले अविस्मरणीय योगदान, स्वतःचे झोकून दिलेले आयुष्य, त्यांच्यावर असणारा वारकरी संतांचा प्रभाव, यामुळे या सर्व महापुरुषांचा आमच्यावर प्रभाव असून, त्यांचे अनेक घेण्यासारखे गुण आम्ही आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
रामदास स्वामींचा वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नाही आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हे मान्य आहे का?
‘वारकरी’ हा जसा हिंदू धर्मातील एक उपासना पंथ आहे, तसा ‘रामदासी’ संप्रदाय हा रामोपासनेचा, थोडीशी उपासना पद्धतीत बदल असणारा एक स्वतंत्र उपासना पंथ आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामी हे या पंथाचे संस्थापक आहेत. ते पंढरपूरला नित्य दर्शनासाठी येत असत. रामरूपामध्ये सगळीकडे परमात्मा पाहण्याची एकविध वृत्ती असल्याने ‘येथे का उभा श्रीरामा।’ हा अभंग विठ्ठलास उद्देशून त्यांनी म्हटलेला आहे. वारकरी संप्रदाय ज्या ‘अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’ची मांडणी करतो, तेच तत्त्वज्ञान रामदासी संप्रदायाचे आहे. फक्त उपासना पद्धती भिन्न आहे.
आता ते शिवाजी महाराज यांचे गुरू होते का, त्यांची भेट झाली होती का, हा इतिहासतज्ज्ञांनी तपासण्याचा विषय आहे. ‘चाफळची सनद’सारखी ऐतिहासिक कागदपत्रे यावर अधिक प्रकाश टाकतात. पण, या विषयावर नुकतेच दिवंगत झालेले इतिहास अभ्यासक स्व. जयसिंगराव पवार यांचा विचार उदात्त वाटतो. ते म्हणतात, “रामदासी-परंपरेतील लोकांनी समर्थांना विचारल्याशिवाय शिवाजी महाराज काहीच करत नव्हते,” इतका हा विषय अतिरंजित मांडला आहे. तर, बहुजन इतिहास अभ्यासकांकडून समर्थांबाबत अगदी ‘औरंगजेबाचे हेर’ होते, या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी केली आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जयसिंगराव म्हणतात, “माझ्या दृष्टीने समर्थ रामदास स्वामींचे महत्त्व आणि महात्म्य असे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे ‘युगकार्य’ आहे, हे समजलेला हा ‘सत्पुरुष’ आहे.” आमच्या दृष्टीने हीच भूमिका योग्य आहे. समर्थ समाजाच्या कल्याणासाठी जन्माला आलेले सत्पुरुष होते. त्यांची ही समाजोन्नतीची तळमळ त्यांच्या ‘दासबोध’, ‘मनाचे श्लोक’ व इतर वाङ्मयातून दिसून येते. केवळ शिवाजी महाराजांशी संबंध जोडला, तरच समर्थांचे कार्य सिद्ध होते, असे नाही. आमच्या दृष्टीने ‘संतांच्या विभूती। धर्मालागी अवतरती॥ धर्मरक्षाया कारणे। साधू होताती अवतीर्णे॥’ एवढे पुरेसे आहे.
वारकरी संप्रदाय सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारा आहे आणि जात, धर्म, लिंग, पंथ, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभाव वारकरी संप्रदायात नसतो व नाही, ती परंपरा तुम्हाला मान्य आहे का?
वारकरी संप्रदायात आजघडीला कुठेही कोणत्याही फड, मठ, मंदिर याठिकाणी जातीयरचना दिसत नाही. ‘माझीये जातीचे (वारकरी/वैष्णव)। मज भेटो कोणी॥’ या न्यायाने एकमुखाने विठ्ठलभक्तीची परंपरा अव्याहतपणे, अखंड सुरू आहे. राजकीय पक्षांनी निर्माण केलेल्या जातीय द्वेषामुळे बीडसारख्या भागात काहीकाळ वारकरी संप्रदायातील सप्ताहामध्येही तणाव निर्माण झाला होता. मात्र, तो हेतू समाजाच्या लक्षात आल्याने आज असा प्रकार कुठेही दिसत नाही. ‘जातीयवाद’ हा राजकीय पक्षांची देण आहे. वारकरी संप्रदायामुळे ‘जातीयवाद’ नष्ट होतो, हे जातीयवादी राजकीय पक्षांना नको आहे.
सनातन धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ, आराध्य दैवत, आराधना पद्धती आणि तीर्थक्षेत्रे वेगवेगळी आहेत, हे मान्य आहे का? वारकरी संप्रदायाला कुणी शंकराचार्य नाहीत, चालक नाहीत हे मान्य आहे का?
तेच, तेच प्रश्न परत, परत आहेत. म्हणून उत्तर पुन्हा वर दिलेले तेच आहे. मुळात धर्म आणि संप्रदाय दोन्ही विषयीच्या अज्ञानातून प्रश्न-द्विरुक्ती होत आहे. असो! वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे प्रस्थानत्रयी मानले जाणारे ग्रंथ - 1) ‘ज्ञानेश्वरी’ (‘भगवद्गीता’ विवेचन) 2) ‘तुकाराम गाथा’ (चहूवेदांचे केलेसे विवरण) 3) ‘एकनाथी भागवत’ (श्रीमद्भागवत एकादश स्कंध) या तीनही हिंदू धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच अगदी तुकोबारायांनी ‘पाहिली पुराणे। धांडोळली दर्शने॥’ असेच म्हटले आहे. कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ; एकादशी, सोमवार ही अखंड व्रते म्हणजेच, साधना/आराधना ही कोणत्या धर्मानुसार आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. पूर्वकालामध्ये शैव आणि वैष्णव या हिंदू धर्मातील उपासना पंथामध्ये प्रचंड वादविवाद होते. भगवद्पूज्यपाद शंकराचार्यांनी सर्वप्रथम हे सर्व वाद मिटवत, हरिहराचे ऐक्य मांडले व ‘भाष्यकाराते वाट पुसतू।’ असे म्हणत वारकरी संप्रदायानेदेखील शंकाराचार्यांच्या पथदर्शी वाटेवरूनच मार्गक्रमण केले आहे. शंकराचार्यांनीच ‘महायोगपीठे तटे भिमरथ्यां।’ हे ‘श्री पांडुरंगाष्टक’ पंढरपूरला आल्यानंतर रचलेले आहे. त्यामुळे प्रस्थानत्रयीचे भाष्यकार जगद्गुरू शंकराचार्यांना आम्ही वारकरीच म्हणतो.
गोष्ट अशी की, ‘वेद मार्गे मुनी गेले। त्याची मार्गे चालिलों। न कळेचि विषयअंधा। म्हणोनी उघड बोलिलों॥’ संत महात्म्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ज्या ‘वेद’विहित मार्गाने ऋषिमुनी गेले, त्याच मार्गाने आम्ही चाललो आहोत. खरेतर हे सांगायची गरज नाही; पण जे धनाने, कामाने, सत्तालोलुपतेच्या विषयाने अक्षरशः आंधळे झाले आहेत, त्यांना हे कळणार नाही, स्पष्टपणे सांगतो आहे. त्यामुळे या विषयांधांना संत महात्मे ‘घुसखोर’ दिसू लागले आहेत.हा यांच्या अधःपतनाचाच मोठा पुरावा आहे. याचे अत्यंत प्रतिकूल परिणाम त्यांना भोगावे लागतील, एवढे निश्चित.
आणि वर आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जी समाजात गैरसमज पसरवण्यासाठीच मांडले गेले आहेत, त्यांची त्या 20 जणांनी प्रश्नाची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा होती ना. अहो, ते म्हणजे खूप लांबची गोष्ट आहे, त्यांच्या जवळ जायची तुमची योग्यता नाही. माझ्यासारखे लाखो वारकरी तुमच्या हजारो प्रश्नांना निर्माण होण्याच्या आत संपवण्याची ताकद राखून आहेत.तुम्हाला सामान्य वारकरीच पुरून उरतील. महात्म्यांकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमतही करू नका!
माझिये युक्तीचा नोहे हा प्रकार।
मज विश्वंभर बोलवितो॥
रामकृष्ण हरी!
श्रीगुरू चरणपदाश्रित...
- रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
9175595405