विद्यानगरमधील चिमुकलीवरील अत्याचार सहन केला जाणार नाही, नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे!- आमदार अमित गोरखे

    17-May-2026
Total Views |
Vidyanagar Crime News
 
मुंबई : (Vidyanagar Crime News) "विद्यानगर परिसरात एका ८ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आपल्या शहरात अशा विकृत प्रवृत्ती डोकं वर काढत असतील, तर त्यांना वेळेत ठेचून काढणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे." अशी संतापजनक प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी शनिवार दि.१७ रोजी दिली आहे.
 
"या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिस बांधवांनी तपासाची सूत्रे अत्यंत जलद गतीने हलवली आहेत. आरोपी हा अल्पवयीन निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन बालसुधारगृहात (बालकारागृहात) रवानगी केली आहे. गुन्हेगाराची विकृती पाहता, कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी पोलीस प्रशासन आणि आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. तसेच, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील महिला, मुली व नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्यानगर परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची यंत्रणा गतीने कार्यान्वित करण्यात आली आहे." असेही आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले.(Vidyanagar Crime News)
 
"पोलीस प्रशासनाला विनंती करतो की, या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा अखंड सुरू राहील. आम्ही या लढ्यात पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत.अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात अजिबात स्थान नाही!" असेही आमदार गोरखे म्हणाले.