संत रवीदास यांच्या कार्याच्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे — आशिष शेलार
17-May-2026
Total Views |
मुंबई : (Sant Ravidas Research) संत रवीदास यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस’ने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र शासनाकडे तातडीने शिफारस करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संत रवीदास यांच्या विचार आणि कार्यावर आधारित या प्रकल्पासंदर्भात ऑनलाईन बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रकल्पाची माहिती घेताना संत रवीदास यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार, त्यांच्या वारशाचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि समकालीन शैक्षणिक, सामाजिक व धोरणात्मक संदर्भांमध्ये या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाश्वत चौकट विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली.(Sant Ravidas Research)
भक्ती परंपरेतील संत रवीदास यांचे कार्य उल्लेखनीय असून ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्येही त्यांच्या विचारांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या कार्यावर अपेक्षित प्रमाणात संशोधन झाले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘माननीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी योजने’अंतर्गत हा प्रकल्प सादर करता येऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Sant Ravidas Research)