पुण्यात सापडलेला बॉम्ब हा घातपाताचा कट, संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीत कैद, काय म्हणाले मुख्यमंत्री?
14-May-2026
Total Views |
मुंबई : (Pune Bomb Scare) पुण्यात बुधवारी संध्याकाळी हडपसर परिसरात उषाकिरण रुग्णालय परिसरात सापडलेली बॉम्बसदृश्य वस्तू ही बॉम्बच होती, हे स्पष्ट झालं आहे. हा सगळा घातपात घडवण्याचा कट होता, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा चेहरा रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कैद झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. दहशतवादाच्या अँगलने अनेक तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन संशयित रुग्णालय परिसरात
बॉम्ब ठेवलेला संशयित आरोपी हा इलेक्ट्रिक दुचाकीवर बुधवारी संध्याकाळी रुग्णालय परिसरात आला असल्याचा संशय पोलिासंना आहे. या संशयितानं रुग्णालय परिसरात बटम्ब ठेवून नंतर फरार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर ही बटम्बसदृश्य वस्तू रुग्णालय परिसरात दिसल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्बशोधक आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी पोहचले. या पथकानं हा बॉम्ब रुग्णालय परिसरातून उचलून मोकळ्या मैदानात नेला आणि त्यानंतर तो निकामी करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार कमी क्षमतेच्या आयईडी स्फोटकांचा वापर या बॉम्बमध्ये करण्यात आला होता. टायमरच्या सहाय्यानं हे आयईडी उडवण्याचा कट होता. बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी आणि रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. या परिसरातील वाहतूक व्यवस्थाही काही काळासाठी थांबवण्यात आली होती. एटीएस, पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेनं ही एकत्रित कारवाई केली.(Pune Bomb Scare)
बॉम्ब ठेवणाऱ्याच्या हेतूचाही शोध सुरु
बॉम्ब ठेवणाऱ्या संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीत आल्यानंतर आता या व्यक्तीचा शोध घेण्यात येतो आहे. संशयितानं हा बॉम्ब रुग्णालय परिसरात ठेवण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता, याचाही शोध आता तपास यंत्रणा घेताना दिसतायेत. हा घातपाताचा कट असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यानं या प्रकरणाचं गांभिर्य वाढलंय. आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचं सत्य उजेडात येईल, असं दिसतंय.(Pune Bomb Scare)