पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांनी पुन्हा ‘व्होटचोरी’ आणि केंद्रीय यंत्रणांच्या नावाने अपेक्षेप्रमाणे शिमगा सुरु केला. समाजात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा विडाच विरोधकांनी उचलला आहे. तेव्हा, अशा असुरीशक्तींपासून सावध राहूनच राष्ट्रोत्थानासाठी सज्ज होण्याची हीच वेळ आहे...
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे म्हणजे ममता बॅनर्जी यांचे शासन हिंदू जनतेने समाप्त करून टाकले आणि भाजपचे शासन आणले. तृणमूल काँग्रेसच्या ८० विजयी उमेदवारांपैकी ३१ मुस्लीम आहेत आणि भाजपच्या २०७ उमेदवारांत सर्व हिंदू आहेत. बंगालमधील निवडणूक युद्ध हे हिंदू मतदार विरुद्ध भोंदू हिंदू आणि मुसलमान यांच्या विरोधात झाले. त्यात जागृत हिंदूंनी विरोधकांचा सणसणीत पराभव केला.
निवडणूक हरल्यामुळे भोंदू हिंदू आणि कट्टर मुसलमान यांचा पक्ष घेणारे राजनेते, विचारवंत, पत्रकार, कलाकार यांचा पराभव झाला, असे मानण्याची चूक करू नये. या सर्व लोकांची विध्वंसक शक्ती खूप मोठी आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ते हरल्यामुळे त्यांची टिंगलटवाळी करणे योग्य होणार नाही. आवश्यकता याची आहे की, ही सर्व मंडळी इथून पुढे काय करत राहतील, याचा प्रत्येक स्तरावर बारकाईने अभ्यास केला पाहिजे. तो जसा सर्व क्षेत्रीय अभ्यासाचा विषय आहे, तसाच हे राष्ट्र बलवान व्हावे, अशी आकांक्षा धरणार्या वस्ती-पाड्यातील सर्वांचा विषय आहे. आपल्या परिसरात काय चालले आहे, याकडे जागृततेने लक्ष देण्याचा हा कालखंड आहे.
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही आपली दोन महाकाव्ये. या दोन्ही महाकाव्यांत ‘वनवास’ हा एक मुख्य विषय आहे आणि या दोन्ही महाकाव्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या असुरीशक्ती कशा कार्यरत असतात, याच्या असंख्य कथा आहेत. यातील बहुतेक कथा प्रतीकात्मक आहेत. या कथांमधील समान धागे असे आहेत, या असुरीशक्ती मायावी आहेत. म्हणजे, त्या लोकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सोंगे घेऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे आकार घेऊ शकतात. ती त्यांची शक्ती आहे. दुसरी समान गोष्ट म्हणजे, या असुरीशक्तींकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विशेष सामर्थ्य असते. या सामर्थ्याचा उपयोग करून या शक्ती सज्जनांना खूप त्रास देत असतात.
या असुरीशक्तींचे आजचे रूप म्हणजे डावे इकोसिस्टमवाले, स्वत:ला ‘उदारमतवादी’ म्हणणारे, स्वत:ची प्रतिमा ‘लोकशाहीचे रक्षणकर्ते’ अशी करणारे, दीनदुबळ्या गरीब लोकांचा अत्यंत कळवळा प्रकट करणारे, मानवाधिकार आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या बाता मारणारे असे आहे. त्यांच्या मायावी रूपामुळे आपल्यातील अनेक तरुण आणि लोकशाही, संविधान, गरिबांची कळकळ असणारे बळी पडतात. त्यांना असे वाटू लागते की, ही मायावी असुरमंडळी जे काही बोलत आहेत, ते खरेच आहे. त्यांना बळ दिले पाहिजे, त्यांची शक्ती वाढविली पाहिजे, असे भोळेपणामुळे वाटू शकते.
या मायावी असुरशक्तीचा अखिल भारतीय चेहरा आहे, राहुल गांधी. ते ‘लाल संविधान’ हातात घेऊन भारतभर फिरत असतात. पूज्य डॉ. बाबासाहेबांचे संविधान ‘लाल’ नाही. संविधानाचा खेळखंडोबा करणारे सर्व त्यांचे मित्र आहेत. ममता बॅनर्जींनी लोकशाही मूल्यांवर आघात करणारी अनेक कृत्ये केली. प्रशासनाला समांतर अशी पक्ष-गुंडांची ‘सिंडिकेट’ उभी केली. हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे, पक्षकार्यकर्त्यांना पैसा द्या; चांगल्या शाळेत प्रवेश पाहिजे, पैसा द्या; घर बांधायचे आहे, मग आम्ही सांगतो त्याच्याकडून घराला लागणारे साहित्य खरेदी करावे लागेल, ही यादी खूप मोठी आहे.
‘जाती राष्ट्रविरोधी आहेत’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अखेरच्या भाषणात म्हणाले होते. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी एका जातीची पार्टी आहे. म्हटले, तर हे घटनाविरोधी आहे. हे अखिलेश राहुल गांधींचे परममित्र आहेत. राज्यघटनेने प्रत्येकाला उपासनास्वातंत्र्य दिलेले आहे. तामिळनाडूत स्टॅलिन आणि त्यांचा पुत्र सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतो. कालपरवापर्यंत हे दोघे राहुलबाबांची गळाभेट करणारे मित्र होते.
एका खांद्यावर झोळी आणि वाढलेली दाढी, कुरता-पायजमा या ‘लिबरल’ पोशाखात फिरणारे योगेंद्र यादव आहेत. ममता बॅनर्जींचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि ते किंचाळले, ‘लोकशाहीला धोका आहे’, ‘हुकूमशाहीकडे ही वाटचाल चालली आहे.’ त्यांचे दिल्लीतील दोस्त अरविंद केजरीवाल हेदेखील छाती बदडून शोक करीत आहेत की, आता लोकशाहीचे काय होणार? मतदार सूचीतून लाखो मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आणि गैरमार्गाने मिळविलेला हा विजय आहे. राहुलबाबा याला ‘व्होटचोरी’ म्हणतात. ममता त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की, "ही मतदारसंघ-चोरी आहे.”
या सर्व उरबडव्यांना दोन-तीन प्रश्न आपण विचारू शकतो. तामिळनाडू आणि केरळम्मध्ये भाजपला यश मिळालेले नाही. तेथे ज्यांना यश मिळाले, हे यश ‘व्होटचोरी’चे की ‘मतदारसंघ-चोरी’चे आहे? हेदेखील त्यांनी स्पष्ट करावे. बंगालमध्ये दोन कोटींच्या आसपास बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत, हा आकडा फार पूर्वीच सांगितला गेलेला आहे. या घुसखोर मतदारांना मतदानाचा हक्क देणे, हे राज्यघटनेचे कशाप्रकारे रक्षण होते? हे त्यांनी स्पष्ट करावे. आसनसोलला दहा वर्षे दुर्गामातेचे मंदिर बंद करून ठेवले होते. मुस्लीमबहुल वस्तीत हे मंदिर असल्यामुळे मुसलमानांना त्याचा त्रास होतो, असा युक्तिवाद केला जातो, तो राज्यघटनेच्या कोणत्या कलमाला धरून केला गेला? हे स्पष्ट करावे. केजरीवाल यांनी मद्य-घोटाळ्यात अनेक कोटींचा भ्रष्टाचार केला. स्वत:साठी ‘शिशमहल’ बांधला, यात गरिबांची कोणती सेवा झाली? हे ‘डाव्या इको सिस्टम’ने सांगितले पाहिजे.
आता देश एका अवघड परिस्थितीतून जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला आवाहन करून काही काटकसरींचे विषय सांगितले आहेत. ज्यांना देशभक्तीशी काही देणेघेणे नाही आणि ज्यांच्या जगण्याचा मंत्र मोदीद्वेष आहे, ते निरनिराळ्या प्रकारच्या कथा रचायला लागतील. ‘संविधान बचाव’ची कथा समोर येईल. ‘गरिबी बचाव’च्या कथा तयार होतील, ‘नारी सन्माना’च्या कथा रचल्या जातील. थोर पुरुषांच्या बदनामीच्या कथा रंगून सांगितल्या जातील. सर्व देशभक्तांना याची उत्तरे द्यायची आहेत. संघगीताचे एक कडवे राष्ट्रभक्तांपुढील
आव्हान स्पष्ट करणारे आहे, ते असे -
असुर निर्दालन बाकी हैं|
जग-जननी के आंचल पर,
कलंक जो लगा हैं
दुष्टोंका उसको मिटाने,
शक्ती का अभिसार बाकी हैं|
असुर निर्दालन बाकी हैं,
अभी राष्ट्र का उत्थान बाकी हैं|
रमेश पतंगे
९८६९२०६१०१