पंतप्रधान मोदींच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रत्येक नागरिकाने पाठबळ द्यावे-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; केंद्राकडे प्रलंबित ओबीसींच्या प्रश्नांकडे स्वत: लक्ष घालणार

    13-May-2026   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वदेशीच्या आवाहनाला भारताच्या प्रत्येक नागरिकाने पाठबळ दिले पाहिजे. कुठलेही जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाला फार बैठकीला न बोलवता ऑनलाईन बैठका घेण्याची सुरुवात आम्ही केली आहे. तसेच आमच्याकडे असलेला ताफा कमी करण्याचाही विचार सुरु आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)म्हणाले की, “इंदिरा गांधी आणि पी. चिदंबरम यांनीही कितीतरी वेळा सोने घेऊ नका असे आवाहन केले. तसेच महात्मा गांधीजींनीही स्वदेशीचा नारा दिला. आपल्या देशाच्या मजबूतीकरिता काही काळ काटकसर करावी लागल्यास काय फरक पडणार? सगळेच बंद होणार असे नाही. आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्वदेशी वापरूनही आपण आपले जीवन जगू शकतो आणि याचा विचार आपण करायला हवा"
 
प्रत्येक भेटीतून राजकीय संदर्भ घेणे चुकीचे
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, "शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचे आहे. तटकरे आणि त्यांच्या परिवाराचा राजकीय, सामाजिक आणि सर्वच विषयावर शरद पवार यांच्याशी आयुष्यभर संबंध राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या वेळी भेट घेतल्यास त्यात राजकीय विषयच असतात असे नाही. मीसुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आलो. त्यामुळे या भेटीतून राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही."(Chandrashekhar Bawankule)
 
 
गंभीर प्रकरणातील आरोपीला मदत करणे योग्य नाही
 
ते पुढे म्हणाले की, "निदा खानसारख्या गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला आश्रय देणे हे खेदजनक आहे. त्यामुळे पोलिसांनी एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरावर कारवाई केली असेल. आरोपींना शह देणाऱ्या सह आरोपींबद्दल काय निर्णय घ्यायचा हे पोलिसच ठरवतात आणि त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला असेल. इतक्या गंभीर आणि समाजाला कलंक असलेल्या प्रकरणातील आरोपीला मदत करणे योग्य नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी याबाबत संस्कार, संस्कृती पाळली पाहिजे."
 
परभणी वाळू माफियाने एका सरपंचाला चिरडण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आम्ही अशा आरोपींना सोडणार नाही. मागच्या वेळी बुलढाण्यातील घटनेतही आम्ही तात्काळ अटक करून कारवाई केली. याप्रकरणाचीही गंभीर दखल घेऊन आरोपीवर दाखल असलेल्या पुर्वीच्या गुन्ह्यांवर आधारित त्याला कडक शिक्षा देऊ."
 
केंद्राकडे प्रलंबित ओबीसींच्या प्रश्नांवर स्वत: लक्ष घालणार
 
ते म्हणाले की, "केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या ओबीसींच्या प्रश्नांवर मी स्वत: लक्ष घालणार असून मुख्यमंत्र्यांनी मला तशा सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या १५ दिवसांत मी केंद्राकडे जाणार आहे. ओबीसींच्या अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार वर्गाच्या केंद्रात प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अतुल सावे आणि मी आम्ही दोघांनी लक्ष घातले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे."(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....