मराठीचा आम्हाला अभिमान, मराठी बोलण्यासाठी गरिबांवर दादागिरी नको - केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले;जातीभेदाप्रमाणेच भाषिक भेदभावही घटनाविरोधी
12-May-2026
Total Views |
मुंबई : (Ramdas Athawale) मराठी विरुध्द हिंदी असा भेदभाव करणे चुकीचे आहे. जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषिक भेदभाव असा कोणताही भेदभाव भारतीय राज्यघटनेला मान्य नाही. जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावाने जे भेदभाव करतात, ते घटना विरोधी आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, एकात्मता शिकवणारी राज्यघटना देशाला दिलेली आहे.
घटने विरोधात जे वागतात, घटनेला विरोध करण्याचा जे विचार करतात त्यांचा सत्यानाश होतो. भारतीय राज्यघटना कधीही बदलली जाणार नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. रिक्षा, टॅक्सी चालक हे गरीब आहेत, त्यांना मराठी शिकण्याची संधी राज्य शासनाने देवून चांगली भुमिका घेतली आहे.
मराठीचा आम्हाला अभिमान आहे, मराठी आमची मातृभाषा तर हिंदी राष्ट्रभाषा आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह जरुर धरला पाहिजे. मात्र मराठी बोलण्यासाठी गरिबांवर दादागिरी करणे चुकीचे आहे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. (Ramdas Athawale)
बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात भाजपप्रणित वाहतुक संघटनेच्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी आयोजक हाजी अरफात शेख तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, अभिनेता अनुप सिंह ठाकुर, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, रिपाइंचे मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल शेख आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते. (Ramdas Athawale)