'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

    10-May-2026
Total Views |

आजच्या आधुनिक काळात समाजमाध्यमे ही प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाली आहेत. ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘युट्यूब’, ‘स्नॅपचॅट’ अशा अनेक माध्यमांमुळे लोक एकमेकांशी जोडले गेले. नाती जपणे, आठवणींची देवाणघेवाण करणे, नवीन माहिती मिळवणे आणि संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी आहेत. पण, याच समाजमाध्यमांचा चुकीचा वापर नात्यांमध्ये गैरसमज, वाद, शंका आणि दुरावाही निर्माण करू शकतो, हे आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. विशेषतः लग्नाआधी आणि लग्नानंतर याचा वापर अधिक समजूतदारपणे करणे आवश्यक असते.

लग्नाआधी समाजमाध्यमांच्या संदर्भात काय करावे?

लग्नाआधी दोन व्यक्ती एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत असतात. अशा वेळी समाजमाध्यम हे संवादाचे एक साधन ठरू शकते. एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार, छंद आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी समाजमाध्यमे मदत करू शकतात. मात्र, फक्त समाजमाध्यमांवरूनच व्यक्तीचा अंदाज बांधू नये. मोकळेपणाने आणि आदराने संवाद साधावा. मेसेज, कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना सभ्य भाषा वापरावी. नात्याची सुरुवात करताना परस्परांवरचा विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि विश्वास हाच नात्याचा पायादेखील असतो. समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा आदर करावा. प्रत्येक वेळी लगेच उत्तर मिळाले नाही म्हणून रागावू नये. अनेकदा व्यक्ती वेगळ्या कामात असू शकते, प्रवास करत असते, निराळ्या मूडमध्ये असते, त्यामुळे लगेच उत्तर देणे मनात असूनही शक्य होत नाही. अशा वेळी समजून घेणे हेदेखील सुदृढ नात्यासाठी आवश्यकच असते.

शक्यतो, संदेश लिहिताना पूर्ण भाषा वापरावी. शॉर्टफॉर्ममध्ये संदेश नसावा. हल्ली मुले-मुली जेव्हा बाहेर भेटतात, त्यावेळी लगेच फोन नंबर एकमेकांना दिले जातात आणि मग सुरू होते संवादांची मालिका. यामध्ये जेवण झाले का? अशा स्वरूपाचे विनोदी संदेशही पाठवले जातात, हे पूर्णपणे टाळावे. एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींचा आदर करावा. फोटो पोस्ट करायचा असेल, ‘रिलेशनशिप’ जाहीर करायची असेल किंवा ‘एंगेजमेंट’चे फोटो टाकायचे असतील, तर दोघांचीही संमती असणे गरजेचे आहे.

लग्नानंतर सोशल मीडियाच्या संदर्भात काय करावे?

एकमेकांचे ‘अकाऊंट’ तपासणे, सतत ‘ऑनलाईन’ का आहात हे विचारणे, ‘पासवर्ड’ मागणे किंवा मोबाईल चेक करणे प्रकर्षाने टाळावे. नात्याची सुरुवात विश्वासावर व्हावी, तपासणीवर नाही. सतत ती व्यक्ती कुठे गेली, हे ‘ट्रॅक’ करणे नसावे. जेणेकरून माणसाला मोकळीक मिळेल. जुने फोटो, जुने मित्र, फॉलोअर्स किंवा कमेंट्स पाहून शंका घेणे चुकीचेच आहे. प्रत्येक व्यक्तीचे लग्नाआधीचे आयुष्य वेगळे असते, त्यावरून नाते खराब करू नये. खोटे जीवन दाखवण्यासाठी बनावट पोस्ट, महागड्या गोष्टींचे प्रदर्शन किंवा नात्याचे अनावश्यक प्रदर्शन करू नये. समाजमाध्यम आणि वास्तव यात फरक असतो.

लग्नानंतर समाजमाध्यमे ही नाते सुंदर करण्यासाठी उपयोगी पडू शकतात, जर त्यांचा योग्य पद्धतीने वापर झाला तर. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, प्रवास, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कुटुंबीयांसोबतचे फोटोदेखील यावर आनंदाने शेअर करता येतात.

पती-पत्नीने एकमेकांच्या यशाचे कौतुक करावे. समाजमाध्यमांवरही आदराने वागावे. जोडीदाराच्या पोस्टवर चांगल्या भावना व्यक्त करणे, सपोर्ट दाखवणे आणि सकारात्मकता ठेवल्याने नाते अधिक मजबूत होण्यास सहकार्य होते.

मित्र, नातेवाईक आणि दूर राहणार्‍या लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी समाजमाध्यमे उपयुक्त आहेत. नवीन गोष्टी शिकणे, व्यवसाय वाढवणे किंवा प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठीही यांचा चांगलाच उपयोग होऊ शकतो. घरातील भांडण, मतभेद, नाराजी किंवा वैयक्तिक समस्या समाजमाध्यमांवर पोस्ट करू नयेत. रागाच्या भरात ‘स्टेटस’ ठेवणे, टोमणे मारणे किंवा अप्रत्यक्ष ‘पोस्ट’ करणेही नात्यासाठी घातकच ठरते.

इतर जोडप्यांचे फोटो, व्हिडिओ किंवा लाईफस्टाईल पाहून, त्याची स्वतःच्या संसाराशी तुलना करू नये. समाजमाध्यमावर दिसणारे प्रत्येक आयुष्य परिपूर्ण नसते. आपल्या जोडीदाराला वेळ न देता सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणेदेखील टाळावे. एकाच घरात राहूनही संवाद कमी होणे, हीच आजची मोठी समस्या आहे. अनावश्यक चॅटिंग, गुप्त मैत्री, सतत इतरांशी फ्लर्टिंग किंवा संशयास्पद वागणूक प्रकर्षाने टाळावी. यामुळे नात्यातील विश्वास कमी होतो.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, समाजमाध्यमे नाते निर्माण करू शकतात. पण, टिकवू शकत नाहीत. नाते टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास, संवाद, वेळ आणि त्याचबरोबर समजूतदारपणाही आवश्यक असतो. समाजमाध्यमे वापरा; पण त्यांचे गुलाम होऊ नका. मोबाईलपेक्षा घरातील माणसांना वेळ द्या, ‘पोस्ट’पेक्षा भावना जपा आणि ‘लाईक्स’पेक्षा नात्याला महत्त्व द्या. (क्रमश:)

- डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‘अनुरूप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून, ‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)
[email protected]