"धम्मकीर्तीतील स्त्रीशक्ती - संघमित्रा"

    01-May-2026
Total Views |
Sanghamitra
 
तथागत गौतम बुद्धांनी बौद्धधम्म स्थापन करून स्त्री-पुरुष समानतेच्या न्यायाने ‘भिखू’ आणि ‘भिखुणी’ यांना दीक्षा दिली. या परिप्रेक्ष्यात ‘धम्मकीर्तीतील स्त्रीशक्ती’ याचा विचार उरतो; तेव्हा असे लक्षात येते की, बुद्धकाळातच स्त्रियांनी बौद्धधम्माची दीक्षा देऊन आचरणातून बौद्धधम्माची शिकवण सिद्ध करत धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. पण, बुद्धांच्या ३०० वर्षांनंतर धम्माची ध्वजा परदेशात रुजवणार्‍या संघमित्रा यांचे योगदान धम्मकीर्तीमध्ये अलौकिक आहे. संघमित्रा यांच्या जीवनकार्याचा सारांश या लेखात मांडला आहे.
 
सम्राट अशोक मौर्य बुद्धांच्या ३०० वर्षांनी जन्माला आले आणि कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या प्रियदर्शी सम्राटाने आपली मुलगी ‘संघमित्रा’ यांना धम्मप्रसारार्थ परदेशात म्हणजे श्रीलंका येथे पाठवले. संघमित्रा ही सम्राट अशोक आणि त्यांची पहिली पत्नी राणीदेवी यांच्या कन्या, प्रसिद्ध बौद्ध भिखू महेंद्र यांची धाकटी बहीण होय. संघमित्राचा जन्म इ.स.पू. २८२ मध्ये उज्जैन (मध्य प्रदेश) येथे झाला. तिचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी अशोकाचा भगिनेय अग्निब्रह्मा याच्याशी झाले होते. त्यांना ‘सुमन’ नावाचा मुलगा होता. संघमित्रा यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. त्या भिक्खुणी झाल्या. त्यांनी अतिशय कठोर परिश्रमाने धम्माचा अभ्यास केला आणि ‘अरहंत’ हे सर्वोच्च आध्यात्मिक पद प्राप्त केले.
 
सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र याला आधीच श्रीलंकेत पाठवले होते. तेथे स्त्रियांना धम्माची दीक्षा देण्यासाठी एका भिखुणीची आवश्यकता होती. त्यानुसार, संघमित्रा इतर ११ भिक्खुणींसह श्रीलंकेत गेल्या. बोधीवृक्षाचे आगमन श्रीलंकेत झाले, ते संघमित्रामुळेच. त्याचे असे झाले, ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती बुद्धगया येथील त्यावर ब्राह्मीवृक्षाची एक फांदी (कलम) संघमित्रा स्वतःसोबत श्रीलंकेत घेऊन गेल्या. त्यांनी जेव्हा फांदी तोडली, तेव्हा सम्राट अशोक यांचे डोळे पाणावले. समुद्र पार करून लेक धम्मासाठी जात आहे, याचा अभिमान, आनंद त्या अश्रूंत होता. सोन्याच्या कलशात फांदी ठेवून ७०० जणांच्या ताफ्यांसह रवाना केली. श्रीलंकेत राजा तिस्साने सोन्याच्या रस्त्यावरून त्यांचे स्वागत केले. पुढे संघमित्रा यांनी अतिशय खडतर प्रवास केला आणि त्या श्रीलंकेला पोहोचल्या. तो प्रवास कसा होता तर- पाटलीपुत्र-ताम्रलिपी बंदर-जहाजाने जबुकोल बंदर श्रीलंका.
 
(नागपूर जिल्ह्यातील मनसर-नगरधन-मंडाचा जिल्ह्यातील पवनी शहर-येथे विहारात संघमित्रा थांबल्याचे संशोधनातील अवशेषावरून सिद्ध झाले आहे. ‘मनसर-नगरधन-पवनी’ येथे उत्खननात विहारे सापडली आहेत. पवनातील तर जमिनीतून अशोकस्तंभ निघाले. पवनीजवळच्या आकोट गावात १०-१४ माणसांना उचलणार नाहीत, एवढ्या मोठ्या दगडावर कोरलेले अशोकचक्र शतकानुशतके आहे.) तिच्या सोबत ११ ‘अरहंत’ भिखुणी, आठ राजकुलातील स्त्रिया, व्यापारी, वैद्य आणि तिचा मुलगा ‘सुमन’ होता. संघमित्रा श्रीलंकेत गेल्या आणि त्यांनी सोबत नेलेली बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुशधापुरा येथे लावण्यात आली. जी आजही ‘जय श्री महाबोधी’ या नावाने प्रसिद्ध आहे. या महाबोधी वृक्षाचीच कलम दीक्षाभूमी नागपूर आणि उलस (अमेरिका) येथील बुद्धविहायन लावण्यात आली आहे. भिखुणी संघमित्रा यांनी श्रीलंकेत प्रथमच भिखुणी संघाची स्थापना केली. पहिली दीक्षा श्रीलंकेची राजकन्या अतुला आणि इतर ५०० महिलांनी संघमित्रा यांच्याकडून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. संघमित्रा यांचा सांस्कृतिक प्रभाव अजूनही श्रीलंकेत आहे. कारण, यांच्या सोबत भारतातून गेलेल्या कारागिरांनी श्रीलंकेत स्थापत्य शिल्पकला आणि नवीन सांस्कृतीत मूल्ये रुजवली.
 
संघमित्रा यांनी ‘हाथाल्हक विहार’ हा भिखुणींसाठीचा पहिला विहार बांधला. तिच्यामुळे श्रीलंका हा थेरवाद बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र बनला. आजही तिथे ‘उन्दुवय पौर्णिमा’ म्हणजे डिसेंबरमधील पौर्णिमेला संघमित्रा दिन साजरा करतात. ज्यादिवशी त्या बोधीवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेत पोहोचल्या तो दिवस. थोडक्यात काय, तर संघमित्रा यांनी फक्त धर्मप्रचार केला नाही; तर श्रीलंकेत स्त्रियांसाठी धम्माची दारे उघडली. माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, भिक्खुणी संघमित्रा यांनी साहित्यामध्ये काही भर घातली का? तर, संघमित्रा या स्वतः ग्रंथकर्त्या असल्याचे थेट पुरावे मिळत नसले, तरी काही पुरावे सापडले आहेत की, संघमित्रांच्या कृतीने, विनयाने उपदेश करण्याने साहित्यनिर्मिती करण्यास लेखकांना प्रेरणा मिळाली होती.
 
(१) ‘विनयपिटक’ आणि भिक्खुणी संघाचे नियम- श्रीलंकेत स्त्रियांना दीक्षा देण्यासाठी संघमित्रा यांनी ‘भिखुणी विनय’ म्हणजे भिखुणींसाठीचे नियम श्रीलंकेत आणले. संघमित्रामुळे हा भाग श्रीलंकेत पोहोचला आणि लिहून ठेवला गेला. आज श्रीलंकेचा ‘भिखुणी विनय’ हा संघमित्राच्या परंपरेतून आलेला मानला जातो.
 
(२) अट्ठकथा साहित्याची सुरुवात- ‘दीपवंस’ आणि ‘महावंस’ या श्रीलंकेच्या प्राचीन इतिहास ग्रंथामध्ये नोंद आहे की, संघमित्रा आणि महेंद्र यांनी ‘पाली त्रिपिटक’सोबत त्यावरील ‘अट्ठकथा’ म्हणजे अर्थकथा, भाष्यदेखील मौखिक स्वरूपात श्रीलंकेत आणले. पुढे इ.स. पाचव्या शतकात बुद्धघोष यांनी या ‘सिंली अट्ठकथां’चे पालीभाषेत रूपांतर करून ‘विसुद्धिमग्ग’सारखे ग्रंथ लिहिले. त्यामुळे संघमित्रा ही ‘अट्ठकथा’ साहित्याची आद्यवाहक मानली जाते.
 
(३) बोधीवृक्ष आणि त्याच्याशी संबंधित साहित्य- संघमित्राने आणलेल्या बोधीवृक्ष अनुशधापुरात लावला. या वृक्षाची पूजा, त्याचे
महत्त्व, त्याच्या रक्षणाची जबाबदारी; ‘बोधिवंस’ आणि ‘महाबोधिवंस’ यांसारखे ग्रंथ श्रीलंकेत लिहिले गेले. या साहित्यपरंपरेची सुरुवात संघमित्रामुळे झाली.
 
(४) स्त्रियांचे साहित्य- थेरीगाथा परंपरा ः संघमित्रा ‘अरहंत’प्राप्त भिखुणी होत्या. ‘थेरगाथा’ आणि ‘थेरीगाथा’ हे बौद्ध साहित्यातील ‘अरहंत’ भिखू-भिखुणींच्या उद्गारांचे संकलन आहे. जरी ‘थेरीगाथे’त संघमित्राची गाथा थेट नसली, तरी तिने श्रीलंकेत शेकडो भिखुणी तयार केला. त्यामुळे ‘सिंहली थेरी परंपरा’ निर्माण झाली. या परंपरेतून पुढे अनेक थेरींचे साहित्य निर्माण झाले. संघमित्रा यांचे श्रीलंकेत ४५ वर्षांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
(१) हाथाल्हक विहार - भिखुणी पहिला विहार बांधला. 
 
(२) एक हजारपेक्षा अधिक भिखुणी - त्यांनी स्वतः एक हजारहून अधिक स्त्रियांना दीक्षा दिली. त्यामुळे श्रीलंकेत भिखुणी संघ एक हजार वर्षे टिकला.
 
(३) आयुर्वेद - त्या वैद्यकातही पारंगत होत्या. श्रीलंकेत आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींचे ज्ञान पोहोचवले.
 
(७) भारतात संघमित्रा विसरल्या गेल्या? - भारतात इस्लामी आक्रमणे झाली, तेव्हा इथला भिखुणी संघ नष्ट झाला. पण, संघमित्रांमुळे श्रीलंकेत भिखुणी संघ टिकला. म्हणून आजही श्रीलंका, थायलंड, म्यानमारमध्ये तिला ‘संघमातृ’ मानतात.
 
(८) आजचा वारसा -
 
(१) उन्दृवप पौर्णिमा - डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला श्रीलंकेत राष्ट्रीय सुटी असते, ज्यादिवशी संघमित्रा बोधीवृक्ष घेऊन पोहोचल्या, तो दिवस.
 
(२) जय श्री महाबोधी - त्यांनी लावलेला बोधीवृक्ष २३००पेक्षा जास्त वर्षांनंतरही जिवंत आहे. जगातील सर्वांत जुना नोंदणीकृत वृक्ष.
 
(३) मूर्ती - कोलंबोच्या भिखुणी संघात त्यांची मूर्ती आहे. भारतात सांची स्तूपाजवळही त्यांचे शिल्प आहे.
 
(४) महिला सबलीकरणाचे प्रतीक - २३०० वर्षांपूर्वी एकटी स्त्री धर्मप्रचारासाठी परदेशात जाऊन समाज बदलते, हे आजही प्रेरणादायी आहे.
 
(९) ‘दीपवंस’ आणि ‘महावेस’मधील नोंदी - श्रीलंकेच्या या दोन महान ग्रंथात संघमित्रांचे वर्णन आहे. म्हणजे ती प्रज्ञावान, विनयस जाणणारी आणि धम्म धारण करणारी होती. थोडक्यात, संघमित्रा फक्त अशोकाची मुलगी नव्हती; ती भारताची पहिली महिला राजदूत, पहिली महिला धर्मप्रचारक आणि भिखुणी संघाची संस्थापिका होती. त्यांच्यामुळे बौद्ध धर्म स्त्रियांपर्यंत पोहोचला.
 
आधुनिक काळातील संघमित्राचे महत्त्व -
 
१. स्त्रीसक्षमीकरणाचे प्रतीक : संघमित्रा या इतिहासातील पहिल्या महिला धर्मप्रचारकांपैकी एक. २५०० वर्षांपूर्वी एक स्त्री दुसर्‍या देशात जाऊन धार्मिक संस्थात्मक नेतृत्व करते, हे आजच्या स्त्रीवादासाठी प्रेरणादायी आहे.
 
२. भारत-श्रीलंका सांस्कृतिक सेतू : अनुराधापुरातील ‘जय श्री महाबोधी’ हा वृक्ष जगातील सर्वांत जुना मानवाने लावलेला वृक्ष मानला जातो. तो भारत व श्रीलंका यांच्यातील २३०० वर्षांच्या सांस्कृतिक मैत्रीचे जिवंत प्रतीक आहे. देशांच्या राजनैतिक कार्यक्रमात याचा उल्लेख येतो.
 
३. जागतिक बौद्धवारसा - ‘युनेस्को’ने अनुराधापुराला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. बुद्धगयेचा मूळ बोधीवृक्ष १८७०च्या दशकात नष्ट झाला. पण, श्रीलंकेतील फांदीपासून १८८० मध्ये पुन्हा बुद्धगयेत वृक्ष लावला, म्हणजे संघमित्रांमुळेच बुद्धगयेत बोधीवृक्ष आहे.
 
४. पर्यावरण संदेश - एका फांदीचे जतन करून २३०० वर्षे वृक्ष जगवणे हा पर्यावरणरक्षणाचा मोठा संदेश आहे. ‘बोधीवृक्ष संवर्धन’ मोहीम याच प्रेरणेतून राबविली जाते.
 
५. सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी - भारत सरकार ‘बौद्ध परिपथ’ पर्यटन आणि ‘धम्मयात्रा’मध्ये संघमित्रेच्या कार्याचा प्रचार करते. श्रीलंकेने २०२३ मध्ये संघमित्रांच्या नावाने टपाल तिकीट काढले होते. भारत सरकारने तर ‘संघमित्रा एक्सप्रेस’ ही रेल्वेगाडीच सुरू केली आहे.
 
थोडक्यात, स्त्री-नेतृत्व, आंतरराष्ट्रीय मैत्री आणि वारसा जतन या तीनही गोष्टींचे प्रतीक संघमित्रा आहेत. एका विवाहित स्त्रीने स्वतःच्या मुलाला सोबत घेऊन राजाज्ञेनुसार, दुसर्‍या देशात धम्म-प्रसारार्थ जाणे, हे असे करणारी संघमित्रा पहिली भिखुणी ठरली. भारतीय (जम्बुदीप) सम्राटाच्या आदेशाने श्रीलंकेत बौद्धधम्म-प्रसारार्थ गेलेल्या संघमित्रा एक राजदूत म्हणून पहिली स्त्री होत्या. वरीलप्रमाणे भिखुणी संघमित्रा यांची माहिती उपलब्ध ‘थेरीगाथां’मधून होते. ‘धम्मकीर्तीतील ज्या स्त्रीशक्ती आहेत, त्यात मानाचे स्थान भिखुणी संघमित्रा यांना प्राप्त झालेले आहे.’

- डॉ. ईश्वर नंदपुरे
(लेखक समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष आहेत )