बुद्धपौर्णिमेला केवळ भगवान गौतम बुद्धांची आठवण होत नाही, तर भारतीय समाजातील समता, विवेक आणि मानवी स्वाभिमानाच्या संघर्षाचाही इतिहास समोर उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धम्माला आधुनिक सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. मात्र, या संपूर्ण धम्मक्रांतीच्या निर्णायक काळात त्यांच्या सोबत शांतपणे उभे असलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सवितामाई आंबेडकर. बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची प्रकृती, धम्मदीक्षेची तयारी, लेखनकार्य आणि सततचा मानसिक ताण या सगळ्या परिस्थितीत माईसाहेबांनी निभावलेली भूमिका इतिहासात स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक ठरते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा केवळ एका नेत्याच्या प्रकृतीचा प्रश्न नव्हता, तर भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्याचा काळ होता. संविधान तयार झालं, कायदेशीर समानता मिळाली; पण समाजाच्या मनातला भेदभाव बऱ्याच प्रमाणात तसाच राहिला असल्याचे बाबासाहेबांना जाणवले. जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अपमान हे वास्तवात कायम असताना बाबासाहेबांना हे नीट उमगले होते की, कायदे बदलले म्हणून समाज बदलत नाही. त्यासाठी विचार बदलावा लागतो, जगण्याची पद्धत बदलावी लागते. त्याच काळात त्यांची तब्येत मात्र दिवसेंदिवस ढासळत चालली होती. मधुमेह, रक्तदाब, संधिवात, निद्रानाश अशा अनेक त्रासांमध्येही ते अभ्यास, लेखन आणि चर्चांमध्ये गुंतलेले असायचे. अशा परिस्थितीत डॉ. सवितामाई आंबेडकर यांची भूमिका अधिक ठळक होत गेली.
सारस्वत ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या डॉ. शारदा कबीर या स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, स्वतंत्र ओळख असलेल्या महिला होत्या. त्या काळात स्त्रीने डॉक्टर होणे हीच मोठी गोष्ट होती. त्यांनी ते साध्य केलं होतं. १९४८ मध्ये बाबासाहेब आणि डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला. त्या निर्णयाकडे समाजाने वेगवेगळ्या नजरेने पाहिलं, पण बाबासाहेबांसाठी तो निर्णय जातिभेद मोडणाऱ्या विचाराशी सुसंगत होता. त्यांनी जे आयुष्यभर सांगितलं, तेच स्वतःच्या आयुष्यातही जगून दाखवलं. विवाहानंतर त्या ‘माईसाहेब’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
बाबासाहेबांच्या शेवटच्या काळात माईसाहेबांनी केवळ पत्नी म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून जबाबदारी घेतली. औषधं वेळेवर देणे, आहार सांभाळणे, विश्रांती मिळवून देणे, भेटीगाठींचं नियोजन करणे या सगळ्या गोष्टी त्या शांतपणे पाहात राहिल्या. त्या काळात त्यांच्या शिस्तबद्ध काळजीचा उल्लेख अनेकजणांनी नोंदवला आहे.
याच काळात बाबासाहेबांचा बुद्धधम्माकडे अभ्यास अधिक खोलवर गेला होता. त्यांनी तो केवळ श्रद्धेने स्वीकारलेला नव्हता. पाली साहित्य, त्रिपिटक, बौद्ध तत्त्वज्ञान आणि विविध धर्मांचा सामाजिक परिणाम याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या दृष्टीने बुद्धांचा धम्म म्हणजे दुःख समजून घेणारा आणि त्यावर उपाय सांगणारा विचार होता. देव, चमत्कार किंवा जन्माधारित श्रेष्ठत्व यांवर तो आधारित नव्हता. बाबासाहेबांनी बुद्धांच्या शिकवणीत तर्क, करुणा, नैतिकता आणि समता पाहिली. धर्म माणसाला कमी लेखणारा नसावा, तर त्याला स्वाभिमान देणारा असावा, हे त्यांचं ठाम मत होतं. यातूनच ‘नवयान’ ही संकल्पना पुढे आली.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्माला केवळ आध्यात्मिक मार्ग न ठेवता, सामाजिक न्यायाचं साधन बनवलं. समाजात अपमान सहन करणाऱ्या लोकांना नव्या सन्मानाची गरज होती. बुद्धधम्म त्यांना तो मार्ग देत होता. त्यामुळे लाखो लोकांनी त्यांच्यासोबत धम्म स्वीकारला. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ याच विचारप्रक्रियेचा परिणाम होता. प्रकृती साथ देत नसतानाही ते हे लेखन करत राहिले. त्या काळात माईसाहेबांनी त्यांना शांतता मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर झालेला धम्मदीक्षा सोहळा हा इतिहासातला मोठा क्षण ठरला. लाखो लोकांच्या साक्षीने बाबासाहेबांनी बुद्ध, धम्म आणि संघाचा स्वीकार केला. तो फक्त धर्मबदल नव्हता, तर सामाजिक अपमानाविरुद्ध उभा राहिलेला एक मोठा प्रतिकार होता. त्या दिवशी माईसाहेब त्यांच्या सोबत होत्या. बाबासाहेबांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात त्यांची काळजी घेतली.
धम्मदीक्षेनंतर बाबासाहेबांची प्रकृती आणखी खालावली. तरीही ते लेखन आणि अभ्यास थांबवू शकले नाहीत. दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यावेळी माईसाहेब त्यांच्या जवळ होत्या.
डॉ. आंबेडकरांच्या सहवासात हे त्यांचं आत्मकथन आज बाबासाहेबांच्या शेवटच्या काळाचा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. त्यातून त्या काळातील आरोग्य, कामाचा ताण, तयारी आणि वैयक्तिक आयुष्य स्पष्टपणे समजतं.
बाबासाहेबांच्या निधनानंतर माईसाहेबांनी त्यांचं साहित्य, हस्तलिखितं, छायाचित्रं आणि आठवणी जपण्याचं मोठं काम केलं. पुढच्या पिढ्यांपर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. त्यांनी बुद्धधम्माशी निष्ठा कायम ठेवली आणि विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. १९९० मध्ये पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या राष्ट्रीय आघाडी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘मरणोत्तर भारतरत्न’ प्रदान करून सन्मानित केले. हा केवळ सन्मान नव्हता, तर सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांना मिळालेली राष्ट्रीय मान्यता होती. माईसाहेबांनी हा सन्मान बाबासाहेबांच्या कार्याला मिळालेली योग्य आणि ऐतिहासिक दखल म्हणून स्वीकारला.
आज बुद्धपौर्णिमेनिमित्त बुद्धांचा धम्म, बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि माईसाहेबांचे योगदान एकत्र पाहणं गरजेचं आहे. इतिहासात काही लोक पुढे दिसतात, काही मागे राहतात. पण मागे राहूनही जे काम करतात, ते कधीच कमी महत्त्वाचे नसतात. सवितामाई भीमराव आंबेडकर त्याच शांत पण निर्णायक भूमिकेचं नाव आहेत.
9967020364