मराठी सिनेसृष्टीत ‘कौटुंबिक ड्रामा’ हा नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करणारा राहिला आहे. भावनांची गुंफण आणि हलक्या-फुलक्या विनोदाची फोडणी हीच त्याची खरी ताकद. मात्र, गेल्या काही दिवसांत एकदम धमाल, खळखळून हसवणाऱ्या आणि मन हलकं करणाऱ्या चित्रपटाची उणीव जाणवत होती. हीच उणीव भरून काढण्यासाठी आता ‘सुपर डुपर’ हा चित्रपट दि. 3 एप्रिलपासून चित्रपटगृहात दाखल झाला आहे. त्याविषयी...
समीर पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर’ या चित्रपटात विनोद, गोंधळ, नातेसंबंध आणि अनपेक्षित वळणांची कथा पाहायला मिळणार आहे. विनोदी कलाकारांची फौज आणि भन्नाट संवाद यांमुळे चित्रपटाला एक वेगळीच रंगत प्राप्त झालेली दिसते. नावीन्यपूर्ण मांडणी आणि हलक्या-फुलक्या कथानकामुळे हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासाठी ‘एंटरटेनमेंट पॅकेज’ ठरतो.
अभिनेता ललित प्रभाकर मागच्या काही चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला, पण यावेळी काहीशी वेगळी आणि हटके भूमिका त्याने साकारली आहे. रोहित-ईशा (ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले) या तरुण जोडप्याचा आपापल्या आयुष्यात व्यावसायिक आणि सामाजिक दोन्ही स्तरांवर संघर्ष सुरू आहे. रोहित हा कामाच्या शोधात भटकणारा गायक, तर ईशा अभिनेत्री होण्यासाठी प्रयत्नशील. मुंबईसारख्या शहरात दोघे ‘लिव्ह-इन’मध्ये राहात असले, तरी बिनलग्नाचे असल्यामुळे त्यांना सतत घर बदलण्याचा त्रास सहन करावा लागतो. अखेर अनेक अडचणींवर मात करत, कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून ते स्वतःचं हक्काचं घर, एक नवा फ्लॅट खरेदी करतात. आता आयुष्य स्थिर होईल, या आशेने ते आनंदी असतानाच, कथा एक अनपेक्षित वळण घेते.
घर विकणाऱ्या एजंटने तेच घर दोन वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेलं असतं; एक रोहित-ईशा आणि दुसरं जाधव कुटुंबाला. जाधव कुटुंब नुकतंच गावाहून शहरात दाखल झालेलं. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेलं हे कुटुंब रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेते. त्यांच्या संसारात अगदी बकरीपासून लहान मुलं, वृद्ध जोडपं असा सगळा गोंधळ आणि तितकीच भावनिक बांधिलकी असते. परंपरा, संस्कार आणि नात्यांना जपणारं हे कुटुंब एका बाजूला आणि आधुनिक विचारांचे, स्वप्नांचा पाठलाग करणारे रोहित-ईशा दुसऱ्या बाजूला, असा दोन वेगळ्या जगांचाच संघर्ष या कथेत उभा राहतो. मग घरावर नेमका हक्क कोणाचा, हा प्रश्न पुढे अधिक गुंतागुंतीचा होतो. या संघर्षात भावनिक, विनोदी आणि नाट्यमय वळणं येत राहतात. शेवटी हे घर नेमकं कोणाला मिळतं आणि कथेत पुढे कोणते धक्कादायक, पण तितकीच विनोदी वळणे येतात, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल.
चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे, तर सिनेमेटोग्राफीची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे. चित्रपटात केवळ विनोदच नाही, तर भावनिक आणि सामाजिक पैलूंनाही प्रभावीपणे हाताळण्याचा प्रयत्न दिसून येतो. परंपरा आणि आधुनिक जीवनशैलीचा संघर्ष, कुटुंबातील संवादाची गरज आणि एकत्र राहण्याची बदलती व्याख्या, हे विषय अगदी हलक्याफुलक्या शैलीत दिग्दर्शकाने मांडले आहेत. विशेष म्हणजे, कोणताही उपदेशात्मक सूर न लावता, सहजपणे प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे मुद्दे, ही चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. एकूणच हा चित्रपट फक्त प्रबोधनपर नाही, तर तो तितकाच मनोरंजनही करतो.
मात्र, या सगळ्यासोबतच चित्रपटात काही त्रुटीही जाणवतात. कथानकातील बरेचसे प्रसंग अगदीच सहज अंदाज लावण्याजोगे वाटतात. विशेषतः उत्तरार्धात काही विनोदी प्रसंग अनावश्यकपणे लांबलेले जाणवतात, ज्यामुळे चित्रपटाची गती काहीशी मंदावते. याशिवाय, काही पात्रांची पार्श्वभूमी फारच थोडक्यात दाखवली गेली आहे. ती अधिक सविस्तर उलगडली असती, तर कथा अधिक परिणामकारक ठरली असती. तरीदेखील, या त्रुटींकडे दुर्लक्ष करायला भाग पाडणारे काही प्रभावी संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात. ‘झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच,’ यांसारखे संवाद या कथेला भावनिक खोली प्रदान करतात. मात्र, या भावनांना आणखी विस्तार देण्याची संधी निश्चितच होती. तसेच, चित्रपट विनोदी असल्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणखी प्रसंग असायला हवे होते, ही उणीव जाणवते. तरीही, हलक्याफुलक्या मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देऊन जातो.
‘सुपर डुपर’ हा फक्त विनोदी चित्रपट नाही, तर ती एका कुटुंबाभोवती फिरणारी मजेशीर, कधी भावनिक, तर कधी अगदी खळखळून हसवणारी सफर आहे. प्रत्येक पात्रात एक वेगळी छटा आहे आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात.
चित्रपटात ललित प्रभाकर, विदुला चौगुले, निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे, प्रतीक्षा कोते, जागृती दातीर असे एकापेक्षा एक कलाकार पाहायला मिळतात. ललित आणि विदुलाची फ्रेश जोडी चांगली जमली आहे. आजच्या युगातलं तरुण जोडपं त्यांनी हुबेहुब साकारलं आहे, तर दुसरीकडे नम्रता संभेराव आणि प्रतिक्षा कोते यांचं ग्रामीण भागातील स्त्रीचं पात्र अगदीच उठावदार आहे. दोघींनी अक्षरशः कमालच केली आहे. गावरान बाज, हावभाव आणि भाषेची पकड अगदी नेमकी जमली आहे. याशिवाय शशांक शेंडे आणि निर्मिती सावंत हे दिग्गज कलाकार तर आहेतच. त्यांना उत्तम साथ हृषिकेश जोशी आणि कुशल बद्रिके आणि इतर कलाकारांनीसुद्धा दिली आहे. प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख बजावली आहे.
चित्रपटातील गाणी ठीकठाक वाटतात; मात्र संगीतामध्ये आणखी काही वेगळेपणा आणि हटके प्रयोग करता आले असते, अशी थोडी खंत जाणवते. एकूणच, ‘सुपर डुपर’ हा मनोरंजनाने परिपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारा चित्रपट आहे. छोट्या-छोट्या प्रसंगांतून मोठा अर्थ सांगण्याची ताकद या चित्रपटात नक्कीच आहे. तो प्रेक्षकांना हसवतो, गुंतवून ठेवतो आणि नातेसंबंधांचे मेोल अधोरेखित करतो.