प्रियांका चोप्राचा जिजाजी राघव चड्ढांना पाठिंबा, ‘आप’ नेतेपदावरुन हटवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

    04-Apr-2026
Total Views |

मुंबई : (Aam Aadmi Party) ‘आप’ने गुरुवारी राज्यसभेत मोठा निर्णय घेत राघव चड्ढा (Raghav Chadha) यांना उपनेतेपदावरून हटवले असून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना “मला गप्प बसवलं गेलं आहे, हरवलं नाही” असे ठाम शब्दांत सांगितले.

या घडामोडीनंतर राघव चड्ढा यांनी संसदेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा एक व्हिडिओ शेअर केला. शिक्षण आणि रोजगारातील तफावत, ‘वन नेशन, वन ट्रीटमेंट’, वेतन निर्देशांक आणि भगतसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी यांसारख्या विषयांचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे. त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत केवळ भारतीय तिरंग्याचा इमोजी वापरला, ज्यातून सध्याच्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शांत पण ठाम संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने कमेंट सेक्शनमध्ये हार्ट-आयज आणि टाळ्यांचे इमोजी पोस्ट करत राघव चड्ढा यांना पाठिंबा दर्शवला आहे. राघव चड्ढा यांनी अभिनेत्री परिनीती चोप्रा (Parineeti Chopra) हिच्याशी विवाह केला असून, प्रियांका चोप्रा ही तिची चुलत बहीण आहे.


उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी ‘X’ (ट्विटर) वर व्हिडिओ पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली. “संसदेत जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले अशोक मित्तल हे उद्योगपती असून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत.

या प्रकरणामागे काही महिन्यांपासून पक्षांतर्गत तणाव वाढत असल्याचे सांगितले जाते. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर राघव चड्ढा यांनी कमी प्रतिक्रिया दिल्यामुळे पक्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काही नेत्यांनी त्यांच्यावर मोठ्या राजकीय लढतींपेक्षा जनसंपर्कावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचा आरोपही केला आहे. मात्र, राघव यांनी संसदेत मांडलेल्या जनहिताच्या मुद्द्यांचा दाखला देत स्वतःचे समर्थन केले आहे.




दरम्यान, प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या ‘वाराणसी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) आणि पृथ्वीराज सुकुमरन (Prithviraj Sukumaran) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित प्रियांका ‘क्रीश ४’ या फ्रँचायझीमध्येही झळकणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका हृतिक रोशन (Hrithik Roshan) साकारणार आहे.