राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी ‘नो किंग्ज’ आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर एकटवले. ‘नो किंग’ अर्थात, ‘आम्हाला राजा नको’ म्हणत, अमेरिकन नागरिकांनी इराण युद्ध, निर्वासितांची हकालपट्टी यांसारख्या ट्रम्प यांच्या हुकूमशाही निर्णयाला या आंदोलनातून कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेतील स्वातंत्र्यासाठीचा ब्रिटिश राजेशाहीविरोधातील लढा आणि ट्रम्प यांना चढलेली सत्तेची झिंग यांचा आढावा घेणारा हा लेख...
अमेरिकेच्या सर्व राज्यांत ‘नो किंग्ज’चे आंदोलन चालू आहे. आतापर्यंत कैक दशलक्ष लोक विविध राज्यांत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या हातामधले बॅनर, फलक इत्यादींचे सर्व फोटो बातम्यांमध्ये झळकलेले आहेत. अमेरिकेत तर कोणी राजा नाही. अमेरिकेच्या भाषेत सांगायचे, तर अमेरिका ‘रिपब्लिक’ देश आहे, म्हणजे प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताकात कोणी राजा नसतो. मग ‘नो किंग्ज’ आंदोलनाचा अर्थ काय होतो?
अमेरिकेचा ‘स्वातंत्र्य दिन’ 4 जुलै 1776 मानला जातो. या दिवशी अमेरिका ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्त झाली, असे नाही. ब्रिटिशांचे राज्य संपायला 1782 साल उजाडले. त्यावेळच्या अमेरिकन पिढीला ब्रिटिशांशी घनघोर संग्राम करावा लागला, त्याला ‘अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणतात. दि. 4 जुलै 1776 साली अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित झाला. अमेरिका मानसिकदृष्ट्या इंग्रजी दास्यातून मुक्त झाल्याचा तो दिवस आहे. म्हणून त्याला ‘अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस’ म्हटले जाते.
स्वातंत्र्यासाठी अमेरिकन जनतेने ब्रिटिश राजा आणि पार्लमेंट यांच्याशी संघर्ष केला. राजाचे नाव होते ‘जॉर्ज दुसरा.’ राजा आणि ब्रिटनची संसद मिळून आपल्यावर प्रचंड जुलूम करीत आहेत, अशी अमेरिकेतील लोकांची भावना झाली. या जुलमाविरुद्ध जनतेला जागृत करण्याचे काम दोघांनी केले. एकाचे नाव आहे, थॉमस पेन आणि दुसरा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिणारा लेखक थॉमस जेफरसन.
थॉमस जेफरसनच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील राजासंबंधीची वाक्ये अशी आहेत ः ‘विद्यमान ग्रेट ब्रिटनच्या राजाचा इतिहास म्हणजे, वारंवार केल्या जाणाऱ्या जखमा, बळकावण्याची मनोवृत्ती. या सर्वांचा अंतिम उद्देश आपल्या सर्व राज्यांवर (13 राज्यांवर) निरंकुश अत्याचाराची अंमलबजावणी करणे आहे.’ नंतरच्या परिच्छेदात या गोष्टी राजा जॉर्ज कशाप्रकारे करीत आहे, याची भलीमोठी यादी दिली आहे ः ‘असा जुलूम करणारा, जबरदस्ती करणारा, अन्याय-अत्याचार करणारा राजा आम्हाला मुळीच नको.’
अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीला वैचारिक आशय देण्याचे काम थॉमस पेन याच्या ‘कॉमन्ससेन्स’ या प्रबंधाने केले. या प्रबंधात थॉमस पेन म्हणतो, “राजेशाही म्हणजे काय, तर सैतानाने शोधलेले वैभवशाली असे उपकरण की, जे व्यक्तिपूजेचा प्रचार करण्यासाठी अवतरित झाले आहे.” ब्रिटिश राजेशाहीविषयी त्याचे हे म्हणणे होते. थॉमस पेन स्वत: ब्रिटिशर आहे. याच प्रबंधात तो पुढे म्हणतो, “प्रारंभीच्या काळी राजेशाही उदयास आली आणि मुख्य झुंडशाहीतून काही पिढ्या गेल्यानंतर अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या कथा रचणे सोपे गेले आणि त्यामुळे राजाचे वंश-पारंपरिक अधिकार लोकांच्या गळी उतरविणे सोपे झाले.”
थॉमस पेनचे आणखी एक अवतरण असे, “राजाची वंशपरंपरागत अधिकारासंबंधीची मूर्खता व्यक्त करण्याचा एक नैसर्गिक पुरावा आहे. निसर्गच हे वंशपरंपरागत अधिकार स्वीकारत नाही. निसर्गाने ते जर स्वीकारले असते, तर निसर्गाने सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव (राजे) दिले नसते.”
आता आपल्याला ट्रम्पचा आणि ‘राजा’ या संज्ञेचा संबंध येतो कुठे, हे बघावे लागेल. डोनाल्ड ट्रम्प काही राजा नाही. ते अमेरिकेचे 47वे अध्यक्ष आहेत. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. राजाचे जे गुणधर्म असतात, ते सर्व ट्रम्पपाशी आहेत. ते उर्मट आहेत, घमेंडी आहेत, अधिकारलालसी आहेत, हुकूमशाही मनोवृत्तीचे आहेत. ‘मी सांगेन तोच कायदा’ अशा वृत्तीने जगणारे आहेत. मला कोणी प्रश्न करता कामा नये, माझ्या आज्ञांचे पालन झाले पाहिजे,’ ही त्यांची वृत्ती आहे. म्हणजे ते ‘दुसरा जॉर्ज’ जसा वागत होता, तसे वागणारे; पण लोकनियुक्त ‘राष्ट्राध्यक्ष’ आहेत.
अशा मनोवृत्तीचा राष्ट्रनायक आम्हाला नको, ही अमेरिकन जनतेची स्वाभाविक वृत्ती आहे. दुसऱ्यांदा निवडून देताना अमेरिकन जनतेने ट्रम्पला का निवडून दिले? ट्रम्प काय आहे, हे त्यांना माहीत नव्हते का? आणि आता त्यांच्या विरोधात देशभर मोर्चे काढणे चालू आहे, याचा अर्थ जनतेला आपली चूक समजली का? असे समजायचे का? सर्व प्रश्नांची सरळसोट उत्तरे देणे कठीण आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे अध्यक्षांची चार वर्षांची मुदत असते. या चार वर्षांत त्याला हटवता येत नाही. संसदेत अविश्वासाचा प्रस्ताव आणता येत नाही. त्याच्यावर ‘महाभियोग’ चालविता येऊ शकतो; परंतु त्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि जटिल आहे. अमेरिकेची स्थिती एका पठाणासारखी झाली आहे. एका पठाणाने कलाकंद समजून एका दुकानातून साबण विकत घेतला. नंतर तो एका ठिकाणी बसून खाऊ लागला. दुसऱ्या माणसाने त्याला विचारले, “तू काय खातोस?” तो म्हणाला, “मी कलाकंद खातोय.” तो माणूस त्याला म्हणाला, ‘तू जे खात आहेस, तो साबण आहे.’ पठाण म्हणतो, ‘मी तर कलाकंदसाठी पैसे दिले, आता तेच खाणार.’
सत्ता ही अशी गोष्ट आहे की, सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीचे डोके फिरविण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. त्याला आपण म्हणतो, ‘सत्तेचा माज.’ तो एखाद्या नगरसेवकालाही चढतो, महापौरालाही चढतो आणि चढत्या श्रेणीने मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानापर्यंत सर्वांना चढत असतो. ही अशी दारू आहे की, जी न पिताच चढत जाते आणि मग त्याचा ‘ट्रम्प’ कधी होईल, सांगता येत नाही. इराण आणि अमेरिकेदरम्यान चाललेले युद्ध लवकर संपले पाहिजे, असे ट्रम्प सोडून जगातील सर्वांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांना ताळ्यावर आणण्याचे काम अन्य कोणी करू शकत नाहीत. ते सामर्थ्य अमेरिकेच्या जनतेच्या हातातच आहे.
अमेरिकन संविधानाचे मूलभूत तत्त्व आहे की, सर्व सत्तेचा उगम प्रजेतून होतो. प्रजा सार्वभौम आहे. सार्वभौम प्रजा राज्यघटना निर्माण करते, राज्यघटनेतून सत्तेची पदे निर्माण होतात. ही सत्तेची पदे मर्यादित अर्थानेच सार्वभौम असतात. आपल्या मर्यादा सोडून जर ती वागायला लागली, तर सार्वभौम जनतेने आपला सार्वभौम राजदंड त्यांच्या माथ्यावर मारणे आवश्यक असते. अमेरिकन जनतेने ते सुरू केले आहे. सर्वप्रथम या जनतेचे अभिनंदन आणि पुढे काय होईल, याची आपण प्रतीक्षा करूया.
- रमेश पतंगे
9869206101