मुंंबई (विशेष प्रतिनिधी) - राधानगरीत अभयारण्यात रायबा (एसटीआर-टी७) या वाघाचे अस्तित्व उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वाघाचा वावर समोर आला आहे (radhanagari tiger). साधारण पाच वर्षांचा असणारा या नव्या वाघाला एसटीआर - टी०८ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून त्याला सरदार या नावाने संबोधले जाईल (radhanagari tiger). रायबा म्हणजेच एसटीआर- टी०७ या वाघापेक्षाही अतिशय बलाढ्य असणारा हा वाघ गेल्या वर्षभरापासून राधानगरीच्या जंगलात वावरतोय. (radhanagari tiger)
फेब्रुवारी, २०२५ रोजी पहिल्यांदा सरदारचा फोटो टिपला गेला. मार्च, २०२५ मध्येही त्याचा हा फोटो टिपला गेला. त्यानंतर वर्षभर हा पट्ट्या कुठेच दिसला नाही. तो राधानगरीमधून निघून गेला की काय, अशी शंका येत असतानाच जानेवारी, २०२६ पासून त्याचे पुन्हा एकदा राधानगरीत दर्शन घडू लागलंय. तेव्हापासून तो राधानगरी स्थिरावलेला दिसत आहे. रायबापेक्षाही मोठा परिसर पालथा घालताना दिसत आहे. रायबाप्रमाणेच त्याचेही छायाचित्र कोकण-सह्याद्री वन्यजीव भ्रमणमार्गातील कोणत्याही वाघासोबत जुळून आले नसल्याने त्याला एसटीआर टी-०८ असा सांकेतिक क्रमांक दिला गेल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संंचालक तुषार चव्हाण यांनी दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी मिळून आता वाघांची सख्या नऊ झाली आहे. त्यामध्ये सेनापती-एसटीआर टी०१, सुभेदार-एसटीआर टी०२, बाजी-एसटीआर टी०३, चंदा-एसटीआर टी०४, तारा-एसटीआर टी०५, हिरकणी-एसटीआर टी०६, रायबा-एसटीआर टी-७, सरदार-एसटीआर टी०८ आणि शिलेदार-एसटीआर टी०९ यांचा समावेश आहे.
चंदा, तारा, हिरकणी प्रमाणे या नर वाघांना देखील विदर्भातून आणून सह्याद्रीत सोडले जात असल्याचे अनेकांचे मत आहे. तर तसे नाही. हे नर वाघ नैसर्गिकरित्याच दक्षिणेकडील भागांमधून राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रवास करुन येत आहेत. नर प्रवास करुन येतात मग मादी का नाही ? तर वाघिणीचे हद्दक्षेत्र म्हणजेच टेरिटरी ही साधारण ५० ते ६० चौ. किमी क्षेत्रावर पसरलेली असते. हे क्षेत्र त्या भूभागातील वाघांच्या संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ ताडोबात वाघांची संख्या जास्त असल्याने तेथील वाघिणींचे हद्दक्षेत्र हे साधारण २५ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. तर सह्याद्रीत तारा आणि चंदाचे ५० ते ६० चौ.किमी क्षेत्रावर. वाघ ज्याप्रमाणे नव्या आणि विस्तृत हद्दक्षेत्राच्या शोधात दीर्घ स्थलांतर करतो, तसे स्थलांतर वाघिण करत नाही. सह्याद्री पर्वतरांगेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोल्हापूरातील काही पट्ट्यात वाघिणींचा नैसर्गिक अधिवास आहे. तिथे जन्मास येणाऱ्या वाघिणी देखील थोडाफार प्रवास करत आहेत.