१०० हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण, गुपचुप चित्रीकरणही करायचा, स्वतःच्या फोनमध्ये हे सर्व व्हिडिओ सेव्ह करण्याची आणि पाहण्याची विकृती, २००३ पासूनची ही प्रकरणं. मात्र शेवटी स्वत:च केलेल्या फिर्यादीतून थेट आरोपी बनला. तुम्हाला वाटलं असेल ना, हा सगळा प्रकार नाशिकच्या भोंदू अशोक खरातचा आहे. नाही पण हा विषय वेगळायं. नाशिकमधल्या एका कथित व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वयंघोषित पत्रकार रवींद्र एरंडे याचे हे कारनामे आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरण अजून ताजं असतानाच, आता त्याच धर्तीवरचं आणखी एक गंभीर प्रकरण उघड झालं आहे. पण ते कसं? रवींद्र एरंडे नेमका आहे तरी कोण? आणि हे नेमकं प्रकरण काय आहे? (Nashik Ravindra Erande Case)
तर, या प्रकरणाची सुरुवात झाली ती एका ब्लॅकमेलिंग तक्रारीपासून. रवींद्र एरंडे याने सातपूर पोलीस ठाण्यात, त्याच्या कार्यालयातून त्याचे टॅब चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. तक्रारीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे त्या टॅबमध्ये त्याचे काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओस होते. ज्याच्या आधारे काही अज्ञात व्यक्ती त्याला धमकावत होती. या प्रकरणात त्याच्याकडून तब्बल १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीनंतर सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. या आधीही तक्रारदाराने १० हजार रुपये खंडणी संबंधितांना दिली होती. सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आडगावजवळील दहावा मैल परिसरात असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने पाठलाग करून संशयितांना जेरबंद केले. पोलिसांनी कारवाई करत आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे या चार संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Nashik Ravindra Erande Case)
मात्र, इथूनच या प्रकरणाला एक मोठं आणि धक्कादायक वळण मिळालं. तपासादरम्यान समोर आलं की, ज्यांनी तक्रार दिली तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पण ते कसं, तर हे सर्व प्रकरण सुरू असतानाच एका पीडित महिलेने रवींद्र एरंडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. एरंडे हा सातपूर परिसरातील कथित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. एवढचं नाही तर, एरंडे याची महिला सबलीकरणासाठी सातपूर येथे एक संस्था देखील आहे. मात्र या संस्थेआडूनच तो ही घाणेरडी कृत्य करायचा. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, रवींद्र एरंडे यांनी तिच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. “तुमचं भविष्य उज्ज्वल करून देतो,” असं सांगत त्यांनी तिला विश्वासात घेतलं. त्यानंतर नाशिक आणि इगतपुरी परिसरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर या सर्व प्रकाराचं गुप्त चित्रीकरण केल्याचाही खुलासा झाला आहे. (Nashik Ravindra Erande Case)
संशयित आरोपी रवींद्र एरंडे देखील आता पोलिसांच्या ताब्यात असून. सातपूरमधील या घटनेत तक्रारदारच आरोपी निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एरंडेकडून ४ मोबाईल फोन, २ पेन ड्राइव्ह आणि १ मेमरी कार्ड जप्त केलं आहे. तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व डिव्हाइसेसमध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. हे व्हिडिओ २००३ ते २०२४ या कालावधीतील असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच, हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. याशिवाय पोलीसांनी जप्त केलेल्या टॅबमध्ये ८७ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. या व्हिडिओंची पडताळणी सध्या सुरू असून, यामध्ये किती महिला पीडित आहेत याचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, १०० हून अधिक महिलांचं शोषण झाल्याची शक्यता आहे. (Nashik Ravindra Erande Case)
या प्रकरणातील पीडित महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, खासगी कंपनीतील कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याचं माध्यमांकडून समजत आहे. म्हणजेच समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांना टार्गेट करून त्यांचं शोषण केल्याचा आरोप आता एरंडेवर करण्यात येत आहे. (Nashik Ravindra Erande Case)
पोलिसांनी या प्रकरणात रवींद्र एरंडे याच्याविरोधात लैंगिक शोषण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अश्लील व्हिडिओंची विक्री ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात करण्यात आली आहे का? आणि या व्हिडिओंच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते का? याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंबड आणि सातपूर पोलिसांचं विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून. पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गोपनीयता राखत सखोल तपास केला जाणार आहे. (Nashik Ravindra Erande Case)
दरम्यान, पोलिसांकडून पीडित महिलांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. (Nashik Ravindra Erande Case)
एकीकडे ब्लॅकमेलिंग प्रकरणात फिर्याद देणारा व्यक्तीच आरोपी निघाल्यामुळे या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच अशाच स्वरूपाचे प्रकरण पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूणच, नाशिकमध्ये समोर आलेल्या या सलग घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता या प्रकरणात पुढे काय उलगडतं? हे व्हिडिओ कुठे वापरले जात होते का? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं… अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली जाणार? (Nashik Ravindra Erande Case)