युवा इतिहास अभ्यासकांनी सत्याची कास सोडू नये! : गुरुप्रसाद कानिटकर

    04-Apr-2026   
Total Views |

उद्या रविवार, दि. 5 एप्रिल रोजी पुण्यातील ‌‘भारत इतिहास संशोधक मंडळा‌’च्या राजवाडे सभागृहामध्ये गुरुप्रसाद कानिटकर लिखित ‌‘मर्वेन टेक्नोलॉजीज्‌‍‌’ प्रकाशित ‌‘मुघल फर्माने‌’ खंड-1 आणि खंड-2 या ग्रंथसंपदेचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. ‌‘भारत इतिहास संशोधक मंडळा‌’चे चिटणीस तथा ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यानिमित्ताने लेखक गुरुप्रसाद कानिटकर यांच्याशी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने साधलेला विशेष संवाद...

‌‘मुघल फर्माने‌’ या ग्रंथनिर्मितीमागची प्रेरणा काय आहे? नेमका हाच विषय निवडण्यामागचे कारण काय?

मी इतिहासाचा विद्याथ आहे. पुण्याच्या ‌‘भारत इतिहास संशोधक मंडळा‌’मध्ये राजेंद्र जोशी सरांनी आमचे उर्दू-फारसीचे वर्ग घेतले. दिवंगत ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचेदेखील मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांनी दिशा दिल्यामुळेच मी हा विषय निवडला आणि कामाला लागलो.

या ग्रंथामध्ये वाचकांना नेमके काय वाचायला मिळणार आहे?

या ग्रंथामध्ये उत्तर प्रदेशमधल्या तत्कालीन राज्य अभिलेखागारांमध्ये असलेल्या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यावेळेचे जमिनीचे व्यवहार, धार्मिक इनाम यांची तपशीलवार माहिती या माध्यमातून पोहोचवली आहे. त्याचबरोबर त्यावेळेला झवेरी नावाचे एक कुटुंब होते, ज्यांना वेळोवेळी दानपत्रं देण्यात आली, त्यासंदर्भातील माहिती यामध्ये समाविष्ट केली आहे. मुघलांच्या काळामध्ये राज्यव्यवहार कशा रितीने सुरू होता, याची यानिमित्ताने माहिती मिळते. कुठलीही राज्यव्यवस्था ही पैशावर चालत असते, व्यापारी, उद्योजक यांच्या माध्यमातून व्यवहार सुरू असतात. एक विशिष्ट करप्रणाली असते. आता त्या काळामध्ये ज्या संज्ञांचा वापर केला जायचा, त्या काही प्रमाणात आजसुद्धा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, ‌‘बिघा‌’ हा शब्द आपण नियमित वापरतो. त्याचीसुद्धा आपल्याला यानिमित्ताने माहिती होते.

इतिहासलेखनामध्ये आजच्या काळात आपल्याला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे? आपण त्यावर मात कशी करता?

आताच्या घडीला सर्वांत मोठं आव्हान म्हणजे, इतिहासाला लागलेली जातीयवादाची कीड. काही विचारप्रवाहांच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. उदाहरणार्थ, मला जर एखादी गोष्ट मांडायची असेल आणि ती सत्य असेल, तर त्यात माझ्या जातीचा काहीच संबंध येत नाही. मात्र, काही माणसं जाणीवपूर्वक असा संबंध जोडून लोकांची दिशाभूल करतात. दुसरं सर्वांत मोठं आव्हान आहे, ते म्हणजे सोशल मीडियावर निर्माण झालेल्या संशोधकांचं. आता ग. ह. खरेंसारखी व्यक्ती वयाच्या 80व्या वष स्वतःला इतिहासाचे अभ्यासक म्हणवत असेल, तर तिथे बाकीच्यांची काय बिशाद! त्याचबरोबर ‌‘व्हाट्सॲप‌’च्या माध्यमातून जो एक विकृत इतिहास पसरवला जातो, ती एक मोठी अडचण आहे. मागच्या काही काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान किती होते, यावर चर्चा रंगायची. मग वर्षागणिक तो आकडा वाढत जायचा. आता महाराजांनी गुणवत्तेच्या आधारावरती स्वराज्य कार्यासाठी लोकांची निवड केली. आणि त्यांच्या कार्यामध्ये सर्व जातींचे लोक होते. त्यामुळे आपल्याला खरा इतिहास हवा आहे का, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.

मागील काही महिन्यांच्या अवधीत गजानन भास्कर मेहेंदळे, डॉ. मोरवंचीकर, जयसिंगराव पवार अशी दिग्गज माणसं आपल्याला सोडून गेली. त्यांचा आपल्यावर काय प्रभाव होता?

ही सगळी मंडळी माझ्यासाठी गुरूतुल्यच आहेत. डॉ. जयसिंगराव पवार यांची कारकीर्द कोल्हापुरातली आणि माझंही बालपण कोल्हापुरातच गेलं. त्यामुळे त्यावेळेला डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. जयसिंगराव पवार यांच्या माध्यमातून इतिहासात रुची वाढली. डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाईंवरचं संशोधन केलं, जे लेखन केलं, ते पाहून थक्क व्हायला होतं. आज एका क्लिकवर जगभरातली ज्ञानसंपदा उपलब्ध आहे. मात्र, अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था नसताना, या माणसांनी साधनसिद्ध इतिहास केवळ लोकांसमोर मांडलाच नाही, तर घराघरापर्यंत पोहोचवला. गजानन भास्कर मेहेंदळे हे तर एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वच. त्यांनी शिवचरित्रावर जेवढा अभ्यास केला आहे, तेवढा मला नाही वाटत, इतर कुठल्या व्यक्तीने केला असावा. त्यामुळे त्यांचंदेखील बहुमोल मार्गदर्शन आम्हाला लाभलं.

तत्कालीन भारतामध्ये जिथे वेगवेगळ्या परकीय सत्ता हिंदुस्थानावर राज्य करत होत्या, त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वेगळेपण नेमके कशात होते?

अगदी एका वाक्यात सांगायचं, तर मरण्यापासून मारण्यापर्यंतचा प्रवास! छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपला भोवताल पूर्णपणे बदलला. उदाहरणार्थ, अफझलखान ज्यावेळेला स्वराज्यावर चालून आला, त्यावेळेला त्याची इच्छा होती की, महाराजांनी रणांगणावर समोरासमोर त्याच्याशी युद्ध करावं. मात्र, महाराजांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने, आपल्याला हव्या त्या जागी, हव्या त्या परिस्थितीमध्ये अफझलखानाला संपवलं. ज्याप्रकारे यश हे पचायला जड असतं, तसंच संयम हा बाळगायला उघड असतो. महाराजांनी हे तंत्र अत्यंत बरोबर पाळलं. महाराजांच्या युद्धशास्त्राचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला असं लक्षात येईल की, आजसुद्धा भारतीय सैन्याची जी रचना आहे, तिचा विचार आपल्याला महाराजांच्या रणनीतीमध्ये सापडतो. नौदलाच्या सामर्थ्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे राजे होते. लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं. हे मला वाटतं, महाराजांच्या स्वराज्याचं वेगळेपण होतं.

आज नाटक आणि चित्रपटातून महाराजांचा इतिहास मोठ्या प्रमाणात दाखवला जात आहे. आपल्याला काय वाटतं कुठला दिग्दर्शक/लेखक हा इतिहास अचूकपणे चितारण्यात यशस्वी झाला आहे?

मी म्हणेन एकही नाही! त्याचं कारण असं आहे की, नाटक किंवा चित्रपट तयार करणाऱ्या लोकांनी त्यांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर मांडले आहेत. खऱ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण वेगळे होते. त्यासाठी तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. माझा कुठल्याही कलाकृतीवर किंवा नटावर आक्षेप नाही; मात्र तुम्ही जी कुठली कलाकृती तयार करणार आहात, त्यासाठी तुमचा इतिहासाचा अभ्यास किती पक्का आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. जी माणसं ‌‘कास्टिंग‌’ करतात, त्यांचा तो अभ्यास आहे का, हे तपासायला हवा. त्याचबरोबर मध्ययुगीन काळातील भाषा हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेला कोणती भाषा कशा पद्धतीने बोलली जायची, याची काही निश्चित माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे त्या कलाकृतीमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचासुद्धा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज थोरच होते. मात्र, कलाकृतीच्या माध्यमातून महाराजांच्या नावाखाली विशिष्ट ‌‘पॉलिटिकल अजेंडा‌’ राबवला जात असेल, तर ती आक्षेपार्ह गोष्ट आहे.

इतिहासाचा अभ्यास करून सत्य शोधणारी पिढी आज धडपड करताना दिसते. तिला आपण काय संदेश द्याल?

मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, सत्य हेच टिकतं. सध्याच्या मार्गावरून कधीही ढळू नका; कारण हाच मार्ग शाश्वत आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुठल्याही ‌‘इझम‌’ला बळी पडू नका. वाईट मार्गांनी केवळ चार दिवस प्रसिद्धी मिळते; मात्र लोकांना ज्या क्षणी तुमचं सत्य कळतं, त्यावेळेला ते तुमच्यापासून दूर जातात. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर मोडी लिपी, फारसी भाषा अवगत करायलाच हवी. इतिहासामध्ये पुराव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात ठेवूनच पुढे जायला हवं!

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.