प्रेमाच्या पुढची गोष्ट...

    04-Apr-2026
Total Views |

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी सिनेविश्वातली लाडकी जोडी. आता दोघेही लवकरच ‌‘झी5‌’च्या ‌‘हे काय नवीन‌’ या नव्याकोऱ्या सीरिजमध्ये एकत्र झळकणार आहेत. प्रेमाच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच लग्नाच्या दहा-15 वर्षांनंतर नात्यात काय बदल होतात, हे या सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने उमेश-प्रिया बापट आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्याशी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने साधलेला हा विशेष संवाद...

‌‘हे काय नवीन‌’ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय नवीन पाहायला मिळणार आहे?

प्रिया बापट : वयाचा आणि नात्याचा पुढचा टप्पा गाठलेली ही गोष्ट आहे, असं मला वाटतं. कारण, प्रत्येक म्हणजे लग्नाच्या त्या ‌‘हॅप्पी क्युट फेज‌’च्या पुढे जेव्हा लग्न जातं, तेव्हा त्या जोडप्याचं काय होतं, त्यांच्या आयुष्यात काय अनुभव येतात, तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं, याबद्दलची ही गोष्ट आहे. ही एका नात्याच्या पुढच्या टप्प्याची गोष्ट आहे. ही मराठी मातीतली, चाळीशीतील एक ‌‘रॉमकॉम‌’ सीरिज आहे, जी प्रेक्षकांना आपलीशी वाटेल. कारण, ही कुठल्याही बाहेरच्या प्रेरणेवर आधारित नसून, आपल्या वास्तवातून आलेली आणि प्रामाणिकपणे सांगितलेली कथा आहे.

‌‘प्रेमानंतर काय?‌’ या प्रश्नावर आधारित ही सीरिज आहे. त्यामुळे नेमका हा विषय निवडण्यामागची काय प्रेरणा होती?

वरुण नार्वेकर : मला नेहमी असं वाटतं की, लग्नात प्रेम हा खूप छोटासा भाग असतो. आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा आपण पुन्हा ज्याकडे वळतो, ते म्हणजे नात्यातलं प्रेम. विशेषतः चाळीशीच्या उंबरठ्यावर येताना असं जाणवतं की, ते प्रेम कुठेतरी आहे, पण आधीसारखं सहज सापडत नाही. पूव जे पटकन जाणवायचं, ते आता शोधावं लागतं. म्हणूनच ही एक वेगळी फेज आहे, जी मला उलगडायची होती आणि त्याच भावनेतून या सीरिजमधून त्या टप्प्याला प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सीरिजमध्ये ‌‘जेन-झी‌’ आणि ‌‘मिलेनिअल्स‌’मध्ये जी दरी आहे, ती दाखवली आहे, त्याविषयी काय सांगाल?

प्रिया बापट : माझ्या आयुष्यात आई-वडिलांनीच आमच्या पिढीशी खूप छान जुळवून घेतलं. त्यांनी जुन्या काळापासून ते आजच्या स्मार्टफोनच्या जगापर्यंत सगळं अनुभवलेलं आहे, त्यामुळे त्यांची स्वीकारण्याची पद्धत खूप प्रेरणादायी वाटते. आता ‌‘जेन-झी‌’कडूनही खूप काही शिकायला मिळतं, त्यांची स्पष्ट करण्याची वृत्ती आणि ‌‘अपडेट‌’ राहण्याची सवय. प्रत्येक पिढी काहीतरी नवीन शिकवते, त्यामुळे जे झेपतं, ते घ्यायचं आणि बाकी सोडून द्यायचं, असा माझा दृष्टिकोन आहे.

तुम्ही दोघांनी यापूवही बरेचदा एकत्र काम केलं आहे. तरी या सीरिजमध्ये एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता?

उमेश कामत : सुरुवातीला जेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं, त्याच्या आधी आम्ही एक मालिका करत होतो. तसेच एक नाटक करत होतो. एक फिल्म केली आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की, थांब आता; जरा आपण ब्रेक घेऊया.

एकमेकांबरोबर सतत काम करायला नको. नाहीतर, लोकांना वाटेल, हे एकत्रच काम करतात. पण त्यानंतर असाही एक काळ आला की, अरे, आपल्याला एकत्र काम करायला पाहिजे. आपण केलंच नाही. खूप दिवस झाले, मग एक सीरिज केली. मग आता आम्ही नाटकही करत आहोत. नंतर चित्रपटसुद्धा आला. माझ्या मते, हा एक टप्पा असतो, जो वेळोवेळी येत राहतो. आम्ही तो समतोल जपतो आणि एकत्र काम करतानाच वैयक्तिकरित्या वेगवेगळी कामंही करत राहतो. त्यामुळे अजून तरी कंटाळा आलेला नाही आणि आपल्यालापण काम करायला एकत्र मजा आली पाहिजे.

- अपर्णा कड