शालेय विद्यार्थ्यांना संस्कृतची गोडी लागावी, यासाठी संस्कृत अभ्यासपुस्तके प्रकाशित करणाऱ्या ‘त्रिधारा प्रकाशन’च्या प्रमुख संचालिका डॉ. धनश्री शेजवलकर यांच्याविषयी...
जर्मन’, ‘फ्रेंच’सारख्या परदेशी भाषांना प्राधान्य देत, आपल्या संस्कृतीचा ठेवा असलेली ‘संस्कृत’ भाषा आपल्याकडून काही प्रमाणात डावलली जात आहे. विज्ञान आणि गणिताला महत्त्व देत, मुलांना अधिकच्या अभ्यासासाठी अभ्यासपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. पण, या मागे पडत चाललेल्या संस्कृत भाषेला नाश पावण्यापासून वाचवायचे असेल, तर आजच्या नवीन पिढीमध्ये संस्कृतबद्दल रुची निर्माण करणे, हाच एकमेव उपाय. त्यासाठी काय करता येईल, मूळ समस्या काय आहे, याचा सखोल विचार केल्यावर अधिकच्या सरावासाठी पाठ्यपुस्तकावर आधारित असे एक संस्कृत अभ्यासपुस्तक तयार करून, ते ‘त्रिधारा प्रकाशन’तर्फे प्रकाशित केले गेले. आज शालेय अभ्यासक्रमापासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत सर्व इयत्तांच्या अभ्यासपुस्तिका प्रकाशित करत, लाखो विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतची ओढ निर्माण केली, ती ‘त्रिधारा’च्या संचालिका डॉ. धनश्री शेजवलकर यांनी!
धनश्री यांचा संस्कृतशी परिचय बालपणी ‘परवचा’ म्हणतानाच झाला. त्यांच्या आजोबांनी धनश्री आणि त्यांच्या भावाकडून स्तोत्रांबरोबरच, दोन-तीनशे सुभाषिते सार्थ पाठ करून घेतली होती. तेव्हा जरी त्यांना कंटाळा येत असला, तरी त्याचा त्यांना शाळेत निबंध लिहिताना, वक्तृत्व स्पर्धेसाठी भाषण लिहिताना उपयोग होत असे. शिवाय, इतरांपेक्षा त्यांचे उच्चारदेखील अधिक स्पष्ट असल्याचे त्यांच्या कालांतराने लक्षात आले. आठवीला संस्कृत शिकायला सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, पुस्तकातले बरेचसे शब्द त्यांना आधीपासूनच माहीत आहेत. तेव्हा त्यांनी आजोबांनी शिकवलेल्या लोकांचा अर्थ समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्याच चिकित्सक दृष्टिकोनातून त्यांना संस्कृत व्याकरण अधिक आवडू लागले.
शाळेत शिकत असतानाच, धनश्री यांनी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’च्या संस्कृतच्या परीक्षा दिल्या होत्या. त्यापुढील परीक्षाही देत बहिःस्थ पद्धतीने त्यांनी ‘टिमवि’ची ‘संस्कृत कोविद’ पदवी संपादन केली आणि पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बारावीचेही शिक्षण घेतले.
याच काळात त्यांनी ‘संस्कृतभारती’ या संस्थेचा संभाषणवर्ग पूर्ण केला. त्यातून त्यांना संस्कृतमध्ये संभाषण करण्याचा आत्मविश्वास लाभला. त्यांची भाषा व्याकरणदृष्ट्या शुद्ध असल्यामुळे त्यांना ते लवकर अवगत झाले आणि त्यांना ‘संस्कृतभारती’तर्फे शिक्षक होण्याचे प्रशिक्षणही घेण्याची संधी मिळाली. ते पूर्ण करून त्या ज्ञानाचे उपयोजन करत, त्या लगेचच शालेय वयातील मुलांच्या शिकवण्या घेऊ लागल्या.
त्यासोबतच आपले शिक्षण चालू ठेवत, त्यांनी एकाच वेळी ‘टिमवि’मधून ‘संस्कृत’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘भूगोल’ विषयात पदवी संपादित केली. खूप फिरण्याची आवड असल्यामुळे लहानपणापासूनच ‘नकाशवाचन’ हा धनश्री यांचा छंद होता. त्यातील सखोल ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी पुढे भूगोलात पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली आणि चरितार्थाचे साधन असलेल्या संस्कृत विषयाचेही उच्चशिक्षण घेणे आवश्यकच असल्यामुळे त्यातही पदव्युत्तर पदवी संपादित केली.
त्यानंतर आपल्या अध्यापनाचा आवाका वाढवत त्या पुण्यासह मुंबईतही शिकवू लागल्या. सोबतच, त्या प्रश्नपत्रिकानिर्माणही करत असत. त्या अनुभवातून आणि एकंदरीत परिस्थिती पाहता, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन मुलांना अधिकच्या सरावाची आवश्यकता असल्याचे त्यांनी हेरले. परंतु, अध्यापकांशी चर्चा करून त्यांची कमी वेळेची समस्याही त्यांनी लक्षात घेतली. यावर तोडगा म्हणून, मुलांना घरी बसून सराव करता येईल, अशी एक संस्कृत अभ्यासपुस्तिका त्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली लिहून प्रकाशित केली. आश्चर्य म्हणजे, केवळ दोनच महिन्यांत प्रयोग म्हणून लिहिलेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या. यश पाहता, एप्रिल 2016 मध्ये त्यांनी आपल्या प्रकाशन संस्थेची ‘त्रिधारा’ नावाने नोंदणी केली आणि आज दहा वर्षांचा टप्पा पूर्ण करत, ‘त्रिधारा’ने तब्बल 57 पुस्तके प्रकाशित केली आहेत. पाचवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत उपयोगी सर्व अभ्यासपत्रे आणि संदर्भपुस्तके ‘त्रिधारा’ने उपलब्ध करून दिली आहेत.
धनश्री यांचे प्रकाशनकार्य आणि त्यांच्या अध्यापनाचा अनुभव यामुळे त्यांना संस्कृत शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्याचीही संधी मिळाली आणि आज मागील 15 वर्षे त्या ती जबाबदारी चोख निभावत आहेत. यासोबतच, त्यांनी आपले शिक्षणही सुरू ठेवत, अनेक छोटे-मोठे अभ्यासक्रम पूर्ण केले. पैकी ‘भारतीय विद्ये’तील पदव्युत्तर पदवीने त्यांना संस्कृतकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. आपण जे संस्कृत आतापर्यंत बोलतोय, शिकतोय, शिकवतोय; त्या भाषेचा इतिहास काय, तिचा उगम कसा झाला, विकास कसा होत गेला, शिलालेख इत्यादी गोष्टींमध्ये झालेला वापर यांचे सखोल ज्ञान त्यांना मिळाले. यातूनच, पुढे त्यांनी ‘स्थलपुराण’ या पुराणाच्या एका शाखेतील विषय निवडत ‘पीएचडी’ पूर्ण केली. एक स्थळ निवडत, तेथे पुराणकाळात झालेल्या विकासाचा अभ्यास करणे हे त्यांना भूगोलाच्या आवडीमुळे, नव्याने लाभलेल्या ऐतिहासिक दृष्टिकोनामुळे आणि संस्कृतच्या ज्ञानामुळे सोपे गेले. डॉ. धनश्री यांच्या कार्यासाठी त्यांना ‘भाषा सन्मान’ या पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे.
‘पीएचडी’ पूर्ण करूनही त्यावर न थांबता, ‘पोस्ट डॉक्टरल फेलोशिप’ मिळवून त्या सध्या नाशिकच्या ‘शंकराचार्य न्यासा’मध्ये अभ्यासरत आहेत. डॉ. धनश्री यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा!