मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वनवणव्याच्या नियंत्रणासाठी येऊर वन विभागात अग्निरक्षक म्हणून काम केलेले दोन इसम बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील ‘बिबट शिकार प्रकरणा’मध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. डहाणू वनविभागाने बिबट्याच्या कातडीच्या तस्करीवरून राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणामध्ये आजवर सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील दोन आरोपी हे येऊर वनविभागात अग्निरक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे वणव्यापासून जंगलाचे रक्षण करणारे अग्निरक्षकच बिबट्याचे भक्षक असल्याचे उघड झाले आहे. (sgnp leopard poaching
राष्ट्रीय उद्यानातील ‘एल-३०’ या नर बिबट्याची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी करणार्यांच्या मुसया डहाणू वनविभागाने आवळल्या होत्या. या प्रकरणात आजवर सहा आरोपींना अटक करण्यात आली असून ते मिरा-भाईंदर येथील काशीगावचे रहिवासी आहेत. यातील दोन आरोपी हे येऊर वनविभागात अग्निरक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. उन्हाळ्यातील वनवणव्याच्या हंगामात वनविभागात अग्निरक्षकांची रोजंदारी स्वरूपात नेमणूक केली जाते. हे अग्निरक्षक जाळपट्ट्यांची डागडुजी, वनवणवा नियंत्रण अशा स्वरूपाची कामे वनकर्मचार्यांसोबत करतात. अटक केलेल्या आरोपींमधील दोन आरोपीदेखील बिबट्याची शिकार झालेल्या जंगलात अग्निरक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांनी इथला परिसर आणि तिथल्या बिबट्याची हालचाल हेरून ठेवली होती.
चौकशीदरम्यान बिबट्याची शिकार दि. २१ डिसेंबर रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलवरील काही छायाचित्रांवरून ही माहिती उघड झाली आहे. मात्र, आम्ही हा बिबट्या मारला नसून तो कोणीतरी लावलेल्या तारेच्या हासकीत अडकून त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. मृत बिबट्या दिसल्याने पैशांच्या हव्यासापोटी आम्ही केवळ त्याची कातडी काढल्याचे, आरोपी म्हणत आहेत. मात्र, यामधील सत्य पडताळण्यासाठी भाताणे वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी सखोल चौकशी करत आहेत. तसेच मुख्य आरोपी विशाल वरठा याला अटक केल्यानंतर भीतीपोटी माझ्यापाशी असलेले बिबट्याचे दात आणि नखं घोडबंदरच्या खाडीत फेकून दिल्याचे एका आरोपीने सांगितले. त्याचीदेखील चौकशी करण्यात येत आहे.