Ambadas Danve candidate : ठाकरेंची माघार? अंबादास दानवेंचं नाव विधान परिषदेसाठी घोषित, मविआला क्रॉस वोटींगची भीती!

    29-Apr-2026   
Total Views |

ambadas danve
 
मुंबई : (Ambadas Danve candidate) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच पक्षांनी पडद्यामागील हालचाली वेगानं सुरू केल्या आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी अंकगणित, रणनीती आणि उमेदवार निवडीवर जोरदार खलबतं सुरू आहेत. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा एका प्रश्नाची आहे ती म्हणजे, उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का? मात्र, खासदार संजय राऊतांनी अंबादास दानवेंचं नाव विधान परिषदेसाठी शिवसेना उबाठा पक्षातर्फे जाहीर केलं आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
 
अंबादास दानवे हे विधान परिषदेवर विरोधी पक्ष नेते म्हणूनही होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला होता. तुलनेने उद्धव ठाकरेंची एकूणच विधान परिषदेतील उपस्थिती याबद्दल प्रश्नचिन्हचं होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नावासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे एकमत होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी यंदा विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Ambadas Danve candidate)
 
त्यासाठी मविआच्या नेत्यांकडून त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू होते. ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार नसल्यास काँग्रेस या जागेवर डोळा ठेवून आहे. त्यामुळे या निवडणूकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या निवडणूकीत दहावा उमेदवार देण्याचीही चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर न जाण्याचा निर्णय घेतल्याने आता मविआची रणनिती काय असेल? आणि शिवसेनेने दहावा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. (Ambadas Danve candidate)
 
 
महाविकास आघाडीच्या वाट्याला विधान परिषदेत फक्त १ जागा आहे. ही जागा लढवण्याबाबत उद्धव ठाकरे फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे मविआतील इतर घटक पक्षांची चिंता वाढली आहे. मविआतील काही वरिष्ठ नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न होते. ठाकरे उमेदवार असतील तर, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय न घेतल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. अंबादास दानवे यांच्याशिवाय सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक, सूरज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उबाठातर्फे इच्छुक होते. मात्र, ही उमेदवारी पुन्हा दानवे यांना दिल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर अधिक बळकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Ambadas Danve candidate)
 
उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार नाहीत याचा अर्थ आता ही एकमेव जागा आपल्या वाट्याला यावी, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेसमध्ये आधीच अनेक इच्छुक नेते सक्रिय असून, या जागेच्या माध्यमातून विधानपरिषदेत आपली ताकद वाढवण्याची संधी पक्षाला दिसतीये. त्यामुळे ठाकरेंच्या निर्णयाकडे काँग्रेसचं बारकाईन लक्ष आहे. मात्र, या एका जागेवरून मविआत एकमत न झाल्यास या निवडणुकीचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. (Ambadas Danve candidate)
 
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार असून ३० एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असताना अद्याप कोणत्याही पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ पाहता भाजप ५, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येते. तर, महाविकास आघाडीची केवळ एक जागा निवडून येऊ शकते. (Ambadas Danve candidate)
 
दुसरीकडे, शिवसेनेकडून या निवडणुकीत दहावा उमेदवार देण्याची चर्चा रंगलीये. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका आमदाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेत शिवसेनेचे ५७ इतके संख्याबळ असून त्यांच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने या निवडणूकीत दहावा उमेदवार देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशावेळी क्रॉस व्होटिंगची शक्यता अधिक बळावते. शिवसेनेने हा डाव टाकल्यास महाविकास आघाडीसमोर मतांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान असेल. (Ambadas Danve candidate)
 
मविआसाठी ही निवडणूक केवळ एका जागेची नाही, तर प्रतिष्ठेची बनली आहे. पुढील काही दिवसांत काय घडेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज, पक्षांतर्गत बैठका आणि अंतिम अंकगणित यावरून अंतिम चित्र स्पष्ट होईलच. (Ambadas Danve candidate)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....