Engineers Union : जनगणना व मतदार यादी कामातून अभियंत्यांना वगळा

युनियनची आयुक्तांकडे मागणी

    28-Apr-2026
Total Views |

Engineers Union
 
मुंबई : (Engineers Union) मुंबई महापालिकेतील सुमारे ५० टक्के अभियंता पदे रिक्त असताना कार्यरत अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जनगणना तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अभियंते व वास्तुशास्त्रज्ञांकडे देण्यात येत असल्याने शहरातील पायाभूत सुविधा व नागरी सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कामांतून अभियंत्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.(Engineers Union)
 
युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी मांडली आहे. महापालिकेत सुमारे साडेचार हजार अभियंते व एक वास्तुशास्त्रज्ञ कार्यरत असून त्यापैकी जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध अभियंत्यांवरच अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत.(Engineers Union)
 
पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गटारे, रस्ते बांधकाम व दुरुस्ती यांसारख्या अत्यावश्यक नागरी सेवांमध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ते आधीच कामात व्यस्त असताना त्यांच्याकडे निवडणूक व जनगणनेशी संबंधित कामे सोपविणे गैरसोयीचे ठरत असल्याचे युनियनने नमूद केले आहे.(Engineers Union)
 
हेही वाचा :  Monsoon Preparation : ८ हजार अस्थापनांना नोटीस; ३३ हजार फांद्यांची छाटणीचे मोठे आव्हान
 
ही कामे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या मनुष्यबळाच्या मदतीने पूर्ण करता येऊ शकतात. त्यामुळे अभियंते व वास्तुशास्त्रज्ञांना या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमधून मुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ अभियांत्रिकी कामांवर लक्ष केंद्रित करता येईल, असे युनियनचे म्हणणे आहे.
 
दरम्यान, युनियनच्या या मागणीवर आयुक्त अश्विनी भिडे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Engineers Union)