KEM Hospital : केईएम रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राची आशादायी सुरुवात
आययूआय उपचारातून १२ वर्षांनंतर महिलेला गर्भधारणा
22-Apr-2026
Total Views |
मुंबई : (KEM Hospital) मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात नुकतेच सुरू करण्यात आलेल्या आयव्हीएफ केंद्रातून पहिल्याच महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. आययूआय (इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन) पद्धतीच्या मदतीने ३३ वर्षीय महिलेला विवाहानंतर तब्बल १२ वर्षांनी प्रथमच गर्भधारणा झाल्याची नोंद झाली आहे.
रुग्णालयातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वंध्यत्वावरील उपचार ही टप्प्याटप्प्याने केली जाणारी प्रक्रिया आहे. सुरुवातीला औषधांच्या सहाय्याने अंडोत्सर्जन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरही अपेक्षित परिणाम न मिळाल्यास आययूआय पद्धतीचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात, ज्यामुळे गर्भधारणेतील अडथळे कमी होऊन संधी वाढते.
केईएमच्या (KEM Hospital) या नव्या केंद्रात आतापर्यंत १४ महिलांनी आयव्हीएफसाठी नोंदणी केली आहे. यामधील बहुतांश महिला यापूर्वी विविध उपचारांमध्ये अपयशी ठरलेल्या असून काहींना वाढते वय आणि इतर वैद्यकीय गुंतागुंतही आहे. त्यामुळे पुढील उपचार प्रक्रिया आव्हानात्मक असणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.(KEM Hospital)
अनेक जोडपी शिक्षण, नोकरी, आर्थिक परिस्थिती किंवा निवासाच्या समस्यांमुळे गर्भधारणा पुढे ढकलतात. मात्र योग्य वयात उपचार न घेतल्यास वंध्यत्वाची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. दीर्घकाळ गर्भधारणा होत नसेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे केईएमच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मजा सामंत यांनी स्पष्ट केले.(KEM Hospital)
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत या केंद्रात कमी खर्चात उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. औषधांवर साधारण २० ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. मात्र एकूण उपचार खर्च खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी ठेवण्यात येत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.(KEM Hospital)
खासगी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ उपचारांसाठी साधारण दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र केईएममध्ये ही सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. पहिल्याच महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून आययूआय पद्धतीद्वारे एका महिलेला गर्भधारणा झाल्याचे समाधानकारक यश मिळाले आहे.