१५ वर्षे माणसांमध्ये राहून एकदाही माणसांवर हल्ला न करणारा नाशिकचा 'टग्या'

    21-Apr-2026
Total Views |
leopard in nashik



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नाशिकच्या वासाळी गावात गेल्या १५ वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या टग्या नाव्याच्या नर बिबट्याचा शनिवार दि. १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला (leopard in nashik). नांदिनी नदीच्या किनारी त्याने शेवटचा श्वास घेतला (leopard in nashik). स्थानिक वन्यजीव प्रेमी या बिबट्याच्या वावरावर गेल्या १५ वर्षांपासून नजर ठेवून होते (leopard in nashik). या १५ वर्षात त्याने एकाही माणसावर हल्ला केला नाही (leopard in nashik). त्यामुळे टग्या बिबट्या खऱ्या अर्थान मानव-बिबट्या सहजीवनाचे आदर्श उदाहरण जगला. (leopard in nashik)
 
 
नाशिकच्या वासाळी गावात अधिवास करणाऱ्या या बिबट्याचा माग गेली १० वर्ष एकनाथ मंडळ आणि राजू लगरे या वन्यजीव प्रेमींनी ठेवला. वासाळी गावातच राहणारे राजू लगरे २०१३ पासून या नर बिबट्यावर नजर ठेवून होते. २०१७ मध्ये वन्यजीव छायाचित्रकार एकनाथ मंडळ यांना या बिबट्याचे प्रथम दर्शन घडले. राजू यांनी हा बिबट्या २०१३ पासून गावाच्या आसपास राहत असल्याचे त्यांना सांगितले. देखणा आणि शरीराने भारदस्त असणाऱ्या या बिबट्यावर यापुढे पाळत ठेवायचा निर्णय या दोघांनी घेतला. म्हणून त्याचे नाव ठेवले टग्या. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. २०१९ साली टग्याचे पहिले छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. शरीरावर ठिपक्यांच्या म्हणजेच रोझेट पॅटर्नच्या रचनेवरुन तो टग्याच असल्याचे समजले. अतिशय संयमी असणारा हा टग्या त्यानंतर अनेकावेळा कॅमेऱ्याच्या समोरून जात राहिला. एकदा एकनाथ आणि राजू हे दोघं सायंकाळी एका पाणवठ्यावर बसले होते. तिथून हे दोघंही उठून गेल्यावर बरोबर सात मिनिटांनी टग्या तिथे येऊन पाणी येऊन गेला. दरम्यानच्या काळात अधूनमधून टग्या कॅमेऱ्यात समोर येत असे. आपली मादी आणि पिल्लं असणाऱ्या परिसरात देखील त्याचा वावर कॅमेऱ्यात टिपला जात होता. मात्र, २०२२ साली अचानक पाच-सहा महिन्यांसाठी टग्या गायब झाला. परतला तेव्हा तो दुबळा झाला होता. त्याच्या शेपटीवर एक गाठ देखील होती. एकनाथ यांनी लावलेल्या डीएसएला कॅमेऱ्यात त्याचे थकलेले शरीर टिपले गेले.
 
 
पुढच्या काळात टग्या गंगापूर धरणाचा परिसर पालथा घालून आला. २०२५ मध्ये त्याचे दर्शन झाले तेव्हा तो पुन्हा आपल्या भारदस्त रुपात दिसला. एकनाथ आणि राजू यांच्या जीवात जीव आला. गेल्या आठवड्यात टग्या नंदिनी नदीच्या पुलाखाली निपचिप बसला होता. त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी आरडाओरडा करुन त्याला त्रास देण्यात प्रयत्न केला. रेस्क्यू-नाशिक आणि वन विभागाने त्याचा बचाव करणार इतक्यात एकनाथ आणि राजूसमोर टग्याने शेवटचा श्वास घेतला. १५ वर्षाच्या प्रवासाचा करुण अंत झाला. आज नाशिकमध्ये उफाळून आलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या अगदी विरुद्धार्थी टग्याचे जीवन होते. टग्याने पाळीव जनावरांची शिकार जरुर केली. मात्र, तो कधीही माणसाच्या वाट्याला गेला नाही. शेवटच्या क्षणीही जेव्हा माणसांनी त्याला त्रास देण्याचा प्रय़त्न केला, तेव्हा तो आपले प्राण सोडूनच गेला.