Masoom Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

    21-Apr-2026
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
मुंबई :(Masoom Project) बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी मासूम प्रकल्प राबविण्यात येतो. येथील अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने 'मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे.
 
महिला व बाल विकास विभाग आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘ईमपॉवर' उपक्रम यांच्यातील परस्पर सामंजस्य करारातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रकल्पांतर्गत (Masoom Project) २० संस्थांमधील १,८६१ मुलांना लाभ मिळाला असून ५,००० हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत. मानकीकृत मूल्यांकन साधनांच्या आधारे मुलांच्या भावनिक स्थैर्यात आणि सामाजिक वर्तनात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच पालक व पालक प्रतिनिधींनाही समुपदेशन देऊन कुटुंबीय नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.(Masoom Project)
 
फेब्रुवारी २०२३ मध्ये सामंजस्य कराराद्वारे या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
 
 
प्रारंभी महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मर्यादित स्वरूपात राबविण्यात आलेला हा प्रकल्प आता राज्य शासनाने निश्चित केलेल्या १२१ बालसंगोपन संस्थांपर्यंत विस्तारण्यात येत आहे. या संस्थांमध्ये दोन प्रमुख गटांतील मुले राहतात, एक म्हणजे संकटग्रस्त मुले, जसे अनाथ, मानव तस्करीतून मुक्त केलेली मुले किंवा कुटुंबाकडून काळजी घेणे शक्य नसलेली मुले; आणि दुसरा गट म्हणजे कायद्याच्या संघर्षात आलेली मुले, जी न्यायप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निरीक्षण गृहात ठेवली जातात.
 
‘मासूम’ प्रकल्पांतर्गत मुलांना ट्रॉमा-आधारित समुपदेशन आणि सातत्यपूर्ण मानसिक आधार दिला जातो. यामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे मुलांची तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन व थेरपी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये सखोल निदान करून दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता देखील ठरवली जाते.(Masoom Project)