मुंबई : (Hindu Sammelan) महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हिंदू संमेलन (Hindu Sammelan) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात विशेषत्वाने महिला रिक्षा चालकांचा सहभाग व त्यांचा सन्मान हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या संमेलनात विविध संस्कार शाळांच्या विद्यार्थ्यांनी नाटक, गीत व पथनाट्य सादर करत समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला. आराध्या शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत सादर केले. तसेच साहेबराव लक्ष्मण गोळे यांनी पोवाडा व भजन सादर करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते महिला रिक्षा चालकांचा सहभाग आणि सत्कार. जान्हवी वेंगुर्लेकर, संजना दुधाणे, जयश्री वरांडे, कविता चव्हाण, मैथिली राऊळ, पुष्पा कदम व सुषमा जाधव या महिलांनी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या रिक्षा व्यवसायात जिद्दीने काम करत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ उदरनिर्वाहासाठी नव्हे, तर स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि समाजात नवा आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. हिंदू संमेलनात त्यांच्या उपस्थितीने आणि सन्मानाने महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजात पोहोचला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बजरंग दल घाटकोपर विभाग संयोजक सिद्धिविनायक चव्हाण, कला क्षेत्रातील साहेबराव लक्ष्मण गोळे तसेच चेंबूर भाग संघचालक रमेश ओवळेकर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून घाटकोपर विभाग कार्यवाह आनंद कदम यांनी पंच परिवर्तन व हिंदुत्व या विषयांवर मार्गदर्शन करत समाज परिवर्तनासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धनावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश काळे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १२० हिंदू बंधुभगिनींची उपस्थिती लाभली होती.(Hindu Sammelan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक