मुंबई : (India Locomotive Export Mozambique) ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या उपक्रमाअंतर्गत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स येथे तयार करण्यात आलेली १० डिझेल लोकोमोटिव्ह इंजिने आफ्रिकेतील मोजांबिक या देशाला निर्यात करण्यात आली आहेत.(India Locomotive Export Mozambique)
सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी या ऑर्डरमधील शेवटची खेप म्हणून दोन लोकोमोटिव्ह मापटो पोर्ट येथे पोहोचली असून, संपूर्ण निर्यात ऑर्डर यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येकी ३३०० हॉर्सपॉवर क्षमतेची ही इंजिने जड मालवाहतूक तसेच प्रवासी सेवांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आली आहेत.(India Locomotive Export Mozambique)
ही इंजिने भारताच्या आधुनिक रेल्वे उत्पादन क्षमतेचे आणि तांत्रिक सामर्थ्याचे प्रतीक ठरत आहेत. या यशस्वी निर्यातीमुळे जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह रेल्वे उपकरण पुरवठादार म्हणून भारताची ओळख अधिक भक्कम झाली आहे. विशेषतः आफ्रिकन देश भारतासाठी महत्त्वाचा आणि वाढता बाजार म्हणून पुढे येत आहेत.(India Locomotive Export Mozambique)
गेल्या काही वर्षांत भारताने आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही सक्रिय भूमिका बजावली आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंतील आर्थिक सहकार्य सातत्याने मजबूत होत आहे. बनारस लोकोमोटिव वर्क्स ही देशातील अग्रगण्य लोकोमोटिव्ह निर्मिती युनिट्सपैकी एक असून येथे डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारची इंजिने तयार केली जातात. ही युनिट नेपाळ, बांग्लादेश, व्हिएतनाम, टांझानिया यांसारख्या अनेक देशांना नियमितपणे लोकोमोटिव्ह निर्यात करत आहे.(India Locomotive Export Mozambique)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.