Water Scarcity and Health Schemes : प्रभावी नियोजनासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

    18-Apr-2026
Total Views |
palakmantri shivendraraje bhosale
 
लातूर : (Water Scarcity and Health Schemes) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे जिल्ह्यातील विविध विकासकामे, संभाव्य पाणी टंचाई आणि आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
 
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पर्जन्य झाले असून, सध्या जिल्ह्यात सुमारे ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा जुलैपर्यंत पुरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्री ना. भोसले यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, “संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाणी बचतीवर विशेष भर द्यावा. जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरणे अत्यावश्यक असून यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच जलसंवर्धनासाठी विशेष बैठकांचे आयोजन करून शहर व ग्रामीण भागात रिचार्ज प्रकल्प राबविण्याबाबत ठोस नियोजन करावे.” (Water Scarcity and Health Schemes)
 
येत्या काळात पाण्याच्या टँकरची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्वतयारी ठेवावी. परिस्थितीनुसार तात्काळ टँकर उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना अधिकार देण्यात यावेत, असेही त्यांनी निर्देशित केले. प्रत्येक मतदारसंघनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्याचेही आदेश देण्यात आले. तसेच पाणी गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
बैठकीत विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना सार्वत्रिक आरोग्य संरक्षण देण्यात येत असून, नेटवर्क रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
 
 
या योजनेअंतर्गत (Water Scarcity and Health Schemes)प्रत्येक कुटुंबास दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य कव्हरेज देण्यात येते, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ४.५ लाख रुपयांपर्यंत सहाय्य दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभाची तरतूद असून २३९९ आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. तसेच २२३ शासकीय राखीव उपचार प्रक्रियांचाही समावेश आहे. (Water Scarcity and Health Schemes)
 
रस्ते अपघातातील जखमींना प्रधानमंत्री राहत योजनेतून १.५ लाख रुपयांपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत दिली जाते. लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक नेटवर्क रुग्णालयात ‘आरोग्यमित्र’ नियुक्त करण्यात आले असून टोल फ्री क्रमांक १५५३८८ वर माहिती उपलब्ध आहे.
 
पालकमंत्री ना. भोसले यांनी सांगितले की, "नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि सुरक्षित पाणीपुरवठा देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे."
 
बैठकीस लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे उपस्थित होत्या.
 
तर मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार यांनी बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदविला. तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Water Scarcity and Health Schemes)