खरातचा फोन बंद होईपर्यंत चाकणकरांचा संपर्क

Ashok Kharat case : अंजली दमानिया यांचा दावा; खरातला मोठे करणारे अधिकारी आणि राजकारणी

    15-Apr-2026   
Total Views |
ashok kharat case : anjali damaniya
 
मुंबई :(Ashok Kharat case) भोंदुबाबा अशोक खरातचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्याच्याशी बोलत होत्या, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी केला. तसेच खरातला मोठे करणारे अधिकारी आणि राजकारणी असल्याचेही त्या म्हणाल्या.
  
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, "रूपाली चाकणकर यांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहीली. त्यात त्यांनी हुबेहुब धनंजय मुंडे जे बोलत होते तेच शब्द लिहिलेत. माझ्यावर मीडिया ट्रायल होते आहे, माझ्याविरुद्ध पुरावा नाही असे विधान त्यांनी केले. त्यासुद्धा धनंजय मुंडेंसारख्या मीडियापासून लांब आहेत. रुपाली चाकणकर यांनी खरातला १७७ कॉल केलेत. यामध्ये ११९ इनकमिंग आणि ५८ आऊटगोईंग कॉल आहेत. १ एप्रिल ते १७ मार्चपर्यंचा हा डाटा आहे. खरातचा फोन बंद होईपर्यंत चाकणकर त्याच्याशी बोलत होत्या. एकेदिवशी ते तब्बल २२ मिनिटे गप्पा मारत होते. या कशाच्या गप्पा होत्या?"
 
एसआयटीने चाकणकरांना चौकशीसाठी बोलवावे
 
"खरातसोबत (Ashok Kharat case) सर्वात जास्त वेळ बोलणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर त्यांची मुलगी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर आहेत. ३३ हजार ७२७ सेकंद त्या खरातशी बोलल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोंढे, चौथ्या क्रमांकावर कल्पना खरात यांचे नाव आहे. एसआयटीने ताबडतोब रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवले पाहिजे. अशोक खरातला एक उपजिल्हाधिकारी मदत करत होते. अभिजित भांडे पाटील असे त्यांचे नाव असून त्यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे," असेही त्या म्हणाल्या.
 
 
समता पतसंस्थेत ३४ सेकंदात ६ आर्थिक व्यवहार
 
"अजित पवार यांच्या बारामती येथील घराच्या बाहेर भानामतीचे प्रकार झाले. त्याच दिवशी म्हणजेच १७ तारखेला रात्री खरात ठाण्यात आले होते. १८ तारखेचा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते. अवघ्या ३४ सेकंदांमध्ये समता पतसंस्थेत ६ आर्थिक व्यवहार झालेत. याचे गुढ पोलिसांनी उलगडायचे आहे. माहितीनुसार, समता पतसंस्थेत २७ ते २९ या तीन दिवसात ५ कोटी ३३ लाख रुपयांचे व्यवहार झाले. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी ५ कोटी ३३ लाखांचे व्यवहार झाले. हे व्यवहार कुणाकडून झाले, याची चौकशी ईओडबल्युने करणे गरजेचे आहे," असेही अंजली दमानिया म्हणाल्या.(Ashok Kharat case)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....