चांदणे शिंपीत जाशी चालतां तूं चंचले

    12-Apr-2026
Total Views |

asha bhosle


तुमची भावनिक स्थिती काहीही असो, तुमचे वय कोणतेही असो, जर तुम्ही गाण्यातले दर्दी असाल, तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आशाताईंचे गाणे तुम्हाला भेटतेच. आशाताईंचे गाणे अजरामर आहे. शरीराने आज आशाताई आपल्यासोबत नसल्या, तरी त्यांचे गाणे आपली साथ सदैव देणार आहे.

१९८३ सालच्या ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ या गाण्यापासून, ते तब्बू गात आहे, असे दाखवलेल्या १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘तक्षक’ चित्रपटातील ‘मोहे रंग दे’ या दोन गाण्यांमधला हरकतीचा सूर आज विसावला. ती हरकत आक्षेपाची नव्हती, तर गळ्यातून घेतल्या जाणार्यास सुरेल तानेला चढत्या पट्टीत निरनिराळ्या टप्प्यांवरून फिरून नेण्याचा प्रकार होती. वयाच्या पाचव्या वर्षी गायला सुरुवात केलेल्या आशाबाईंनी, गाण्याचा प्रवास कधी थांबवलाच नव्हता. आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक गाणे त्यांनी गायले. ८०च्या दशकात गाजलेला कॅब्रे असो, मराठीतील सदाबहार ठसकेबाज लावणी असो किंवा सुमधुर भक्तिसंगीत, आशाताईंनी हिंदी-मराठी व प्रसंगी तमिळ गाण्यातील आव्हानेही लीलया पेलली. केवळ तामिळच नव्हे, तर बंगाली व अन्य भारतीय भाषांमध्येही त्या गायल्या. मंगेशकर घराण्याचा गाण्याचा वारसा आशाताईंनी समर्थपणे पुढे तर नेलाच, पण या गायकीवर स्वत:चा असा कर्नाटकी कशिदाही काढला. कवी किंवा संगीतकार कुठल्याही पिढीचा असो, मात्र त्याच्या बोलांना व संगीताला सूर देणारा आशाताईंचा स्वर सदैव चिरतरुणच राहिला!
 
मंगेशकर घराण्यात एकाहून एक अशी संगीतरत्ने जन्मली. प्रत्येकाचा बाज निराळा, स्वर निराळा, गायकी निराळी आणि श्रोतृवर्गही निराळा होता. कमालीची गरिबी, त्यातून मार्ग काढत गायकीच्याच क्षेत्रात कमावलेले नाव व त्यातूनच संपूर्ण जगाला कवेत घेण्याची धडाडी, ही मंगेशकर कुटुंबीयांची खासियतच होती. आशाताईही त्याला अपवाद नव्हत्या. खासगी मैफिली, रेडिओ, जाहीर कार्यक्रम, चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत, ‘नक्षत्रांचे देणे’सारखे स्वतंत्र कार्यक्रमदेखील त्यांनी केले. त्याचवेळी, ‘म्युझिक अल्बम’ करण्याचा एक काळ हिंदी-मराठी संगीतात आला होता. आशाताईंनी त्यावरही स्वत:चा प्रभाव निर्माण केला. सचिन देव बर्मन, ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन, खैय्याम यांसारख्या दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलेच, पण ए. आर. रहमान, इलायी राजा यांसारख्या धीरगंभीर व अलीकडच्या संगीतकारांबरोबरही त्यांनी कारकीर्द गाजवली. १९५० ते २०००च्या काळातील जवळजवळ सर्वच मोठ्या हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली गायकांबरोबर त्यांनी काम केले होते. त्यांची खरी कारकीर्द बहरली, ते आर. डी. बर्मन यांच्यासोबतच. पाश्चिमात्य संगीताने तिकडे ‘पॉप’चे वळण घेतले, त्यावेळेस भारतात आर. डी. बर्मन व आशाताई निरनिराळे प्रयोग करीत होते. त्यात काचेचे ग्लास एकमेकाला भिडवून आर.डींनी संगीत तयार केले, तर आशाताईंनी त्यावर स्वरसाज चढवला. त्यातच ‘चुरा लिया हैं तुमने जो दिल को’ या अजरामर गाण्याचा जन्म झाला.

आधुनिक संगीताचा अवतार मानल्या जाणार्याल गाण्यातही आशाताईंनी एक थक्क करणारा प्रयोग केला होता. ब्रेट ली या जलदगती ऑस्ट्रेलियन गोलंदाज क्रिकेटपटूसोबत २०१३ साली आशाताईंनी ‘यु आर द वन फॉर मी’ हा ‘पॉप अल्बम’देखील साकारला होता. मराठीतील ‘रॉमँटिक’ कविता आशाताईंनी सूरबद्ध केली. त्यांची लावणी, लोकगीतं, शोकगीतं आशाताईंनी ज्याप्रकारे गायली, ती आजही मराठी संगीत रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत. ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘जीवलगा राहिले दूर घर माझे’, ही गाणी त्याची प्रचिती देतात. गडद होत जाणारा भावनांचा कल्लोळ, हे शांताबाईंच्या कवितांचे मर्मस्थान होते. अशा वाचायला सोप्या वाटणार्याे, परंतु गायला अत्यंत अवघड असणर्या कविता आशाताईंनी गीतरूपाने सादर केल्या. कालातीत ठरलेल्या एखाद्या कोरीव लेण्याप्रमाणे ही गाणी भासतात. आशाताई खूप बोलक्या होत्या, मनस्वी होत्या. जीवनाच्या प्रवासात येणार्याू कटू-गोड अनुभवांचे प्रतिबिंब कलाकारांच्या अभिव्यक्तीत अवतरते. आशाताई कार्यक्रमाच्या दरम्यान श्रोत्यांशी गप्पा मारायच्या, लटका हट्ट करायच्या, त्या उत्तम मिमिक्रीही करायच्या. या संवादातून अलगदपणे एखादा तत्त्वज्ञ बोलत आहे, असे भासायला लागायचे. व्यक्तिगत जीवनात प्रचंड चढ-उतार असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा त्यांच्या गाण्याइतकाच सुमधुर होता. कलाकार म्हणून जगण्यातील स्वातंत्र्य त्यांनी पुरेपूर घेतलं; मात्र सामाजिक दातृत्वाचा व देशभक्तीचा मंगेशकर परिवाराचा वारसा त्यांनी कधीही सोडला नाही. ‘परवशता का पाश दैवे ज्यांच्या गळा लागला’ हे गाणे ज्या उत्कटतेने आशाताई गायल्या, हे गीत त्यांच्यातल्या उत्कट देशभक्तीचं परिचय देतं. इंग्रजीत ज्याला ‘व्हर्सटाईल’ म्हटले जाते, अशी आशाताईंची शैली होती. आशाताईंच्या गाण्याचे अजून एक वैशिठ्य म्हणजे, त्यांच्या गाण्यातली सुस्पष्टता. कितीतरी मोठ्या गायकांनादेखील हा चकवा टाळता येत नाही. गाता-गाता स्वर इतके प्रधान होऊन जातात की, उच्चारच ऐकू येईनासे होऊन बसतात. आशाताईंची गायकी हिर्याहसारखी लखलखीत तर होतीच, पण त्यांच्या उच्चारांनाही सुस्पष्टतेचा पैलू होता. त्यामुळे त्यांनी गायलेल्या गाण्यातील प्रत्येक शब्द, अनुस्वार, काना-मात्रा व उकारही ऐकाणार्याणला सुस्पष्टपणे ऐकू यायचा. स्वरांवर त्यांची हुकुमत होती. हरकती, आवाजात केलेले बदल, गाण्यातला दमसास यावर त्यांचे नियंत्रण वादातीत होते. चिं. त्र्य. खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांनी शब्दबद्ध केलेल्या कविता, आशाताईंनी स्वरबद्ध केल्या. ‘गेले द्यायचे राहून’, ‘येरे घना’, ‘केव्हा तरी पहाटे’ ही गाणी, आशाताईंनी गायल्यानेच अजरामर झाली.

आरती प्रभूंसारख्या कवींच्या कविता या अंधारातल्या नक्षत्रासारख्या देखण्या आणि तितक्याच गूढ आणि गुंतागुंतीच्या. आशाताईंनी त्या सुरेल केल्या. ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे’ ही आरती प्रभूंची मुक्तछंदात लिहिलेली कविता, या कवितेत यमक नाही, प्रास नाही, बंध नाहीत, मात्र गायला अत्यंत अवघड असलेली ही कविता ज्या श्रोत्यांनी आशाताईंच्या तोंडून रंगमंचावरून प्रत्यक्ष ऐकली, त्यांच्यासारखे भाग्यवंत रसिक तेच! हरकती, आवाजातील चढ-उतार, टिपेला पोहोचणारी भावोत्कटता, उरात दाटलेल्या भावनांच्या गलबल्याने प्राण कंठाशी यावा, तशी स्थिती हे गाणे प्रत्यक्ष ऐकानाना यायची.

मराठी गायनाने त्यांनी त्यांची कारकीर्द सुरु केली. पण, हिंदीतही हा बाज आशाताईंनी सोडला नाही. ‘मेरा कुछ सामान’, ‘रंगीला’ असे जुन्या-नव्या दमाचे प्रयोगही आशाताईंनी भरपूर केले. आशाताई सहप्रवासी होत्या; अनेक पिढ्यांच्या भावविश्वाच्या. शैशव, तारुण्य, वार्ध्यक्य अशा सगळ्याच मानवी मनाची होणारे भावनिक उचंबळ आशाताईंनी स्वत:च्या वैयक्तिक जीवनात पुरेपूर अनुभवली आणि ती आपल्या गाण्यातही उतरवली. वयाचा कुठलाही टप्पा असो, त्या टप्प्यात आशाताईंचे कुठले ना कुठले गाणे तुमच्या मनाला स्पर्श करतेच. या प्रवासाची सहसोबती असलेली ही दिग्गज गायिका पार्थिवरूपात आपल्याबरोबर नसली, तरी तिच्या गाण्यामुळे अजरामर आहे.