लंका नगरीचे चतुर

    09-Mar-2026
Total Views |

जंगलात जाऊन वाघ-बिबटे पाहणे तसे सोपे. मात्र, आकाराने लहान असणाऱ्या जीवांना पाहण्यासाठी विशेष दृष्टी असावी लागते. ही दृष्टी असली की देश कोणताही असो, तिथली सूक्ष्म जीवसृष्टी उघड्या डोळ्यांनीदेखील दिसते. श्रीलंकेतील चतुर-टाचण्यांची सूक्ष्म सृष्टीची ओळख करून देणारा हा लेख...

लंका हा देश निसर्गसौंदर्याने पुरेपुर नटलेला आहे. ‌‘पाचूचे बेट‌’ अशी ओळख असणारी लंका आपल्याला रामायणामुळे जास्त माहीत असते. मात्र, जैवविविधतेच्या बाबतीत हा देश खरोखरच ‌‘100 नंबरी सोने‌’ आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढले असल्याने अनेक पशु-पक्षी, तसेच कीटक लंकेच्या केवळ 65 हजार चौ. किमीच्या क्षेत्रात प्रदेशनिष्ठ, अर्थात ‌‘एंडेमिक‌’ आहेत. मग चतुर आणि टाचण्याही या बाबतीत का मागे राहतील? श्रीलंकेबद्दलची माझी उत्सुकता खरे तर 2017 पासूनच चाळवली होती. याला कारण होते, श्रीलंकेतील चतुर संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ अमिल सुमनपल याचे अखिल भारतीय ओडोनेट परिसंवादात झालेले सादरीकरण. त्या सादरीकरणात अमिलने सादर केलेले फोटो पाहून आपण काहीतरी भन्नाट गोष्टी अनुभवत आहोत, असे वाटले होते. कधीतरी मलाही लंकेला जाण्याची संधी मिळेल आणि तिथल्या प्रदेशनिष्ठ चतुर-टाचण्यांना पाहता येईल, असे स्वप्न मधेेच पडून जाई. पण गेल्याच वष सप्टेंबर महिन्यात लंकेला जाण्याचा योग्य आला.

लंकेच्या मध्यभागी असलेल्या पर्वतराजीमुळे मोसमी वारे अडले जाऊन देशाचे तीन विविध वातावरणीय प्रदेशांत विभाजन होते. त्यांपैकी मध्य आणि दक्षिण-पश्चिम भागात चतुर-टाचण्यांची संख्या जास्त आहे. पूर्वेकडील तुलनेने शुष्क प्रदेशात त्यांची संख्या कमी होत जाते. लंकेतील चतुर-टाचण्या हे इतके प्रदेशनिष्ठ आहेत की, काही प्रजाती या फक्त ठरावीक पर्वताच्या उंच प्रदेशातच दिसतात. अगदी पर्वताच्या पायथ्याशीदेखील त्या आढळून येत नाहीत. अशा ‌‘हाय-एंडेमिक झोन‌’मध्ये लंकेतील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर ‌‘श्रीपाद‌’ किंवा ‌‘डम्स पीक‌’चा समावेश होतो. ‌‘लंका पसरपंखी (Sinhalestes orientalis)‌’ आणि काही ‌‘लंकासुंदरी (Ceylonosticta)‌’ टाचण्या या केवळ ‌‘श्रीपाद‌’ शिखराच्या आसपासच दिसतात आणि जगात इतरत्र कोठेही आढळून येत नाहीत! ‌‘श्रीपाद‌’ शिखर सर करणे, हे काहीसे जिकिरचे काम. हाताशी पुरेसा शिधा आणि कमीत कमी चार ते पाच दिवसांचा वेळ घेऊन ‌‘श्रीपाद‌’ शिखराच्या भेटीला जावे लागते. भगवान बुद्ध, तसेच भगवान शंकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा सिंहली आणि हिंदू लोकांसाठी एक पवित्र स्थान आहे. मात्र, या ठिकाणी जाणे वेळखाऊ असल्याने आम्ही सिंहराजा पर्जन्यवनात जाण्याचे ठरवले होते.

सिंहराजा पर्जन्यवन हे जवळपास चतुर-टाचण्यांच्या 100 प्रजातींचे निवासस्थान असल्याचे अमिलने सांगितले होते. त्यामुळे नशिबाची परीक्षा द्यावी, तर इथेच असे म्हणून आम्ही सिंहराजा वर्षावनात दाखल झालो. इथे येण्याआधी कॅण्डी, सिगिरिया, कोलंबो ही ठिकाणी फिरून झाली होती. वाटेत आम्ही भारतीय असल्याचे कळल्यावर अनेक लोकांनी खरंच खूप आदराने स्वागत केले होते आणि लंकेत कोठे फिरणार, असेही विचारले होते. सिंहराजा वर्षावनाचे नाव घेतल्यावर ते लोक थोडे चकित होत आणि त्यावर म्हणत तुम्ही नक्की जा. खूप शांत आणि सुंदर जागा आहे, जी तुम्हाला खूपच आवडेल आणि सिंहराजा वर्षावन ‌‘युनेस्को‌’ जागतिक वारसास्थळाने आम्हाला अजिबात निराश केले नाही.

सिंहराजा पर्जन्यवन हे श्रीलंकेतील एकमेव पर्जन्यवन आहे, जे पुरातन काळापासून आहे तसेच जपले गेले. लंकेतील इतर पर्जन्यवनेही मोठ्या प्रमाणात तोडली गेली होती; मात्र अथक प्रयत्नांनी त्यावर नवीन लागवड केली गेली. सिंहराजातील अनेक झाडे ही 400-500 वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. या अभयारण्याच्या टोकाशी असलेल्या कुडव गावात आमचा मुक्काम होता. कुडव गावात एका नदीकिनारी असलेल्या होम-स्टेमध्ये आमचा मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या नदीत जाऊन ‌‘लंका निळी मखमल‌’ टाचणीचे यथेच्छ निरीक्षण केले. त्या नदीने ‌‘लंका केशरी पुष्कराज (Libellago greeni)' ही सुंदर प्रदेशनिष्ठ भेट आम्हाला बहाल केली. नदीच्या पाण्यात पाय बुडवून टाचण्या मोजताना आणि पावसाचे ढग पाहताना वेळ कसा गेला, ते कळलेच नाही.

सिंहराजा वर्षावनातील चढणीचा रस्ता दुतर्फा वेगवेगळ्या झाडांनी भरून गेलेला होता. चालताना आम्हाला प्रकारचे चतुर दिसत होते, ज्यात भारतातही आढळणाऱ्या प्रजातींचा समावेश होता. काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला पहिला प्रदेशनिष्ठ चतुर दिसला. काळ्या रंगावर फिकट निळसर रंगाची नक्षी असलेला ‌‘लंका जंगलचतुर (Hylaeothemisfruhstorferi)' या फांदीवरून त्या फांदीवर उडत होता. अजून थोडे पुढे गेल्यावर गर्द झाडीत एक लहानसा झरा होता. त्या झऱ्याच्या आजूबाजूला लंका निळी मखमल टाचण्या उडत होत्या. त्यात आम्हाला ‌‘पांढऱ्या ठिपक्यांची चिवार (Elattoneura oculate)' ही प्रदेशनिष्ठ टाचणी मिळाली. काळ्या शरीरावर पिवळसर केशरी रंगाच्या पट्ट्या आणि पोटावर दोन लहान पांढरे ठिपके अशी त्या टाचणीची ओळख. अजून काही अंतर गेल्यावर ‌‘काळा पुष्कराज (Libellago corbetti)' नावाची अतिशय दुमळ टाचणी आम्हाला मिळाली, जी केवळ चार ते पाच ठिकाणीच दिसून आली आहे. दिवसाचा शेवट एका अज्ञात चतुराच्या दर्शनाने झाला. ‌‘पाचूभिंगरी‌’ जातीचा हा चतुर श्रीलंकेत केवळ तीनदा आढळून आला आहे. आम्ही पाहिलेली या चतुराची ही चौथी नोंद. मात्र, ही ‌‘पाचूभिंगरी‌’ केवळ इकडून तिकडे घिरट्या घालत असल्याने उडतानाचे काही फोटो यावरच समाधान मानावे लागले. मात्र, एक नवी प्रजात यानिमित्ताने आम्ही पाहिली, जिचा शोध अजूनही लागलेला नाही.

पुढच्या दिवशी कोलंबोमध्ये येऊन तिथल्या पाणथळ जागा फिरून झाल्या. कोलंबो शहराने पाणथळ जागा खूप चांगल्या पद्धतीने जपल्या आहेत आणि खारफुटी झाडांच्या मधून चालण्यासाठी उत्तम प्रतीचे ‌‘पाथ-वे‌’ बांधले आहेत. या खारफुटीच्या जंजाळात आम्ही अजून एक टाचणी हुडकली. ही टाचणी नावाला अगदी साजेशी म्हणजे केवळ अडीच सेमी लांबीची निळी निमुळती सुई. ‌‘लंका बटू टाचणी (Mortonagrion ceyloniucm)‌’ या खारफुटी जंगलाशी आणि खाऱ्या पाण्याशी निगडित असलेल्या प्रदेशनिष्ठ टाचणीच्या भेटीने माझी श्रीलंका स्वारी सुफळ संपूर्ण झाली. अमिलच्या मदतीने आम्ही 132 पैकी 52 टाचण्या केवळ तीन दिवसांत पाहू शकलो आणि त्यांचे सुंदर फोटोही घेऊ शकलो. चतुर पर्यटन करणे, ही एक वेगळीच मजा असते. गदच्या पर्यटनस्थळांपासून दूर जात नव्या देशातील नव्या जागा पाहायला मिळतात आणि तो देश खऱ्या अर्थाने समजू लागतो. Happy odonating!

सिंहराजा पर्जन्यवनातील चतुर

लंकेतील प्रदेशनिष्ठ टाचणी ‌‘लंका निळी मखमल (Euphaea splendans)‌’ अर्थात श्रीलंका शायनिंग गोसामरविंग. काळ्या रंगाची ही टाचणी तिचे काळे पंख फडफड करत उडते, तेव्हा मधेच पंखांच्या आत असलेला चमकदार पाचू रंग उठून दिसतो. पंख बंद करून बसलेली असताना एका विशिष्ट कोनातून पाहिले की, काळ्या पंखांवर असणारा चकाकता निळा-जांभळा भाग मनाचा ठाव घेऊन जातो. नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर अलगद पंख हलवत जाणारी ही टाचणी एखादी परीच वाटते!

‌‘निळ्या पट्टीची लंकासुंदरी (Ceylonosticta nietneri)‌’ हे लंकासुंदरी प्रकरण फारच देखणे आहे. या टाचण्यांच्या प्रेमात पडणार नाही, असा कीटकशास्त्रज्ञ सापडायचा नाही. निमुळत्या शरीराची ही टाचणी शेपटीकडच्या भागावर आकाशी निळा रंग मिरवते. मोठाल्या डोळ्यांमध्ये कधी तिरंगी, तर कधी चौरंगी उधळण असते. आणि उडताना तर अशी नजाकत की निव्वळ पाहात राहावे. मारुती चितमपल्ली म्हणतात, तसे निसर्गध्यान करायचे असेल, तर लंकासुंदरीला एकदातरी पाहिलेच पाहिजे.

लंकासुंदरी टाचणीची लांबची बहीण ‌‘तपकिरी पाठीची लंकासुंदरी (Ceylonosticta brincki)‌’चेही दर्शन झाले. पाठीवरच्या निळ्या पट्ट्यामुळे या दोन्ही टाचण्या वेगवेगळ्या ओळखू येतात. तपकिरी पाठीच्या लंकासुंदरीला पाठीवर निळा पट्टा नसतो.

‌‘पिवळ्या मानेच्या लंकासुंदरी (Ceylonosticta anamia)‌’ला पाहून मन घायाळ होते. सोन्याचा चमचमता कंठहार घालावा, असा पिवळा रंग तिच्या मानेवर असतो. स्लोवेनियन कीटकशास्त्रज्ञ मात्याश बेद्यानिच (Matja Bedjani) याने 2010 साली तीन लंकासुंदरी टाचण्यांचा शोध लावला आणि त्यांना आपली बायको मोयत्सा आणि मुले अनामिया आणि बीने यांची नावे दिली. त्यातली ही अनामिया. दुसऱ्या दिवशी आम्हाला बीने अर्थात ‌‘शेवाळी लंकासुंदरी (Ceylonosticta bine)‌’ही पाहायला मिळाली.

श्रीलंकेत चतुर टाचण्या

श्रीलंकेत चतुर-टाचण्यांचा एकूण 132 प्रजाती आढळतात. त्यांपैकी 59 प्रजाती या प्रदेशनिष्ठ म्हणजे केवळ लंकेतच सापडतात. त्यामुळे साधारण 50 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठता असलेली चतुर-टाचण्यांची जैवविविधता ही संपूर्ण जगात अद्वितीय अशी आहे. या 132 प्रजातींमध्ये स्किमर्स (Libellulidae family), अर्थात दंडारे-पिंजारे-चतुर कुळातील प्रजातींची संख्या सर्वाधिक असून त्याखालोखाल शॅडोडॅमसेल (Platystictidae family) अर्थात लंकासुंदरी टाचण्यांच्या प्रजातींचा क्रमांक येतो.

- डॉ. दत्ताप्रसाद सावंत
(लेखक देवगडस्थित पेशाने डॉक्टर असून चतुरांवर संशोधन करण्याचे काम करतात.)
8793839148