स्परविंग्ड लॅपविंगची दुर्मीळ भेट

    09-Mar-2026
Total Views |

नदीच्या गाठी गेल्यावर आपल्याला लाल गालाची टिटवी किंवा गवताळ प्रदेशात गेल्यावर माळटिटवी सहज दिसते. मात्र, भारतात पहिल्यांदाच आढळलेल्या स्परविंग्ड टिटवीवर प्रकाश टाकणारा हा लेख...

गभरात लॅपविंग म्हणजेच टिटवीच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात. यांपैकी भारतीय उपखंडात व्हॅनेलस (Vanellru) कुळातील एकूण सात प्रजाती आढळून येतात. यांमध्ये लाल गालाची टिटवी (Red-wattled Lapwing), पिवळया गालाची माळटिटवी (Yellow-wattled Lapwing), आणि नदी टिटवी (River Lapwing) या तीनच प्रजाती भारतात स्थानिक रहिवासी असून इतर चार प्रजाती या स्थलांतरकरून भारतात येत असतात. स्थलांतर करून येणाऱ्या प्रजातीमध्ये राखी डोक्याची टिटवी वी(Grey-headed Lapwing), संघचारी टिटवी वी‌’(Sociable Lapwing), तुरेवाली टिटवी वी‌’(Northern Lapwing) आणि पांढऱ्या शेपटीची टिटवी वी‌’(White-tailed Lapwing) या चार प्रजातींचा समावेश आहे. वर्ष 2024च्या सुरुवातीला स्परविंग्ड लॅपविंग नावाची भारतात कधीही न आढळून आलेली आणि स्थलांतर करून न येणारी एक नवीन लॅपविंग-प्रजाती भारतात प्रथमच आढळून आली होती. टिटवीची ही प्रजाती प्रामुख्याने भूमध्य-समुद्राच्या भोवतालच्या तुर्की, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त, तसेच सहारा-प्रदेश आणि पूर्व-आफिकेकडील भागात आढळणारी एक टिटवीची प्रजाती आहे. आपल्या देशातील लाल गालाची टिटवी जशी सर्वत्र आढळते. त्याचप्रमाणे स्परविंग्ड लॅपविंग भूमध्य प्रदेशातील देशांमध्ये सर्वत्र आढळणारी, तेथील पाणथळी व तलावांवर दिसणारी एक सामान्य प्रजात आहे. साधारणतः आपल्या टिटवीच्या आकाराची व रंगाने आपल्या देशातील नदी टिटवीप्रमाणे दिसणारी व सहज ओळखता येणारी ही प्रजात, डोक्यावर संपूर्ण काळी टोपी, गळ्याच्या खालील भाग व छाती पूर्णतः काळी, तसेच शेपटीची टोके काळ्या रंगाची, मानशुभ्र पांढरी व पंखांचा रंग मातकट करड्या रंगाची असते. नदी टिटवीला (RiverLapwing) पूव आपल्या देशात स्परविंग्ड प्लोवर, Spur-wingedPlover अशी ओळख असल्याने सुरुवातीला या प्रजातीला समजून घेताना बराच गोंधळ झाला होता.

स्परविंग्ड लॅपविंग ही प्रजात भारतात 2024 साली प्रथमच आढळून आली. हा पक्षी कधीच स्थलांतर करीत नाही किंवा यापूव कधीही भारतीय उपखंडात नोंदविला गेला नसल्याने ही नोंद विशेष ठरली होती. जानेवारी 2024 दरम्यान हा पक्षी तेलंगण राज्यात बारंगल शहराजवळ असलेल्या अम्मावरीपेटा तलावावर आढळला. येथील प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. जगनपन्नाला यांना तो आढळून आला होता.

मात्र, त्यांनी या पक्ष्याची ओळख ‌‘नदी टिटवी‌’ अशी केली. पुढे फेब्रुवारी महिन्यात, ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट (GBBC) व हैदराबाद बर्ड रेसदरम्यान बारंगल येथील पक्षीअभ्यासक छायाचित्रकार इंदराम नागेश्वरराव व डॉ. जगनपन्नाला हे परत या ठिकाणी गेले असता, त्यांना ही प्रजात पुन्हा आढळून आली. इंदराम यांनी या पक्ष्यांची छायाचित्रे टिपली. त्यावेळी इंदराम नागेश्वर राव यांना ही वेगळी कुठलीतरी टिटवी आहे, अशी शंका आली. त्यांनी काढलेले फोटो हे विविध संदर्भ पाहून तपासले असता, हा पक्षी स्परविंग्ड लॅपविंग नावाची भारतात आजवर कधीही आढळून न आलेली टिटवी असल्याचे दिसून आले. भारतीय पक्षीविश्वासाठी ही आश्चर्यकारक नोंद होती. या प्रजातीची ही पहिलीच नोंद ठरल्याने ही बातमी देशभर पसरली.

हा पक्षी पाहण्यारासाठी आम्ही अम्मावरीपेटा तलावावर पोहोचलो. अवघ्या पाचच मिनिटांत इंदरामदेखील तलावावर पोहोचले. आम्ही आमचे कॅमेरे व दुर्बिणी बाहेर काढल्या आणि शोध सुरू केला. तलावाच्या काठच्या रस्त्यावर दुसऱ्या बाजूने असलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात पाण्यातील उंच गवत वाढलेले होते व बाभळीची झाडे वाढलेली होती. या भागात सुगरणीचा थवा कलकलाट करीत होता. तेथून जाताना इंदराम यांनी अगदी सहजपणे ते पक्षी रेषाळ सुगरण (Streaked Weaver) असल्याचे सांगितले. आमच्यासाठी तो नवीन पक्षी असल्याने आम्ही तिथेच थांबलो. आपल्या सुगरण पक्ष्याची दुसरी प्रजाती, जी आपल्या भागात सहज आढळत नाही, त्यांचा थवा त्या झाडावर होता. विशेष म्हणजे, त्यातील काही नर पक्षी घरटे बांधणीत गुंतलेले होते. आम्ही त्यांचे मनसोक्त फोटो काढून पुढे निघालो. तोपर्यंत इंदराम यांची नजर, आमचे लक्ष्य असलेली प्रजाती शोधतच होती. साधारणतः 7 वाजता तो पक्षी इकडे उतरतो, अशी माहिती त्यांनी दिली आणि अगदी थोड्याच वेळात स्परविंग्ड लॅपविंग उडत उडत येऊन तलावाच्या काठावर उतरतील. आम्ही दुर्बिणीतून बघून खात्री करून घेतली. ती स्परविंग्ड लॅपविंगच होती. आम्ही काही रेकॉर्ड शॉट घेऊन पुढे निघालो आणि बराच वेळ तिचे निरीक्षण करून फोटो आणि व्हिडिओ घेतले. ही प्रजाती इतर काही लाल गालाच्या टिटव्यांसोबत. परंतु थोडे अंतर राखून चरत होती. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इंदराम यांनी सांगितल्यानुसार मध्यंतरी या प्रजातीचा आणखी एक पक्षी या ठिकाणी आढळून आला आणि या प्रजातीची संख्या दोन इतकी झाली. आम्हाला मात्र, त्यादिवशी एकच पक्षी दिसून आला. आम्हाला स्परविंग्ड लॅपविंगची दुसरी जोडीदार दिसू शकली नाही. मात्र, हे जर खरच दोन पक्षी असतील आणि जर ते नर-मादी असतील, तर त्यांचे प्रजनन होऊ शकेल का आणि ते इथले स्थानिक रहिवासी होतील का, इत्यादी प्रश्न मनात घेऊन आम्ही पुढील प्रवासास लागलो.

- डॉ. जयंत पडतकर
(लेखक ‌‘महाराष्ट्र पक्षीमित्र‌’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत.)