JNPA: मध्यपूर्वेतील तणावातही जेएनपीएची दमदार कामगिरी

Total Views |
JNPA  
 
मुंबई : (JNPA) मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापारावर निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम कमी करण्यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सर्व प्रमुख बंदरांसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्यानुसार, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) तात्काळ विशेष कृती दल स्थापन करून परिस्थितीला प्रभावी प्रतिसाद दिला आहे. (JNPA)
 
या कृती दलात संयुक्त महासंचालक (परकीय व्यापार), अप्पर सीमाशुल्क आयुक्त, मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) जेएनपीए आणि उपमहासंचालक (जहाजवाहतूक महासंचालनालय) यांचा समावेश आहे. मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीमुळे व्यापारात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर समन्वित पद्धतीने मात करण्यासाठी गिरीश थॉमस, मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक), जेएनपीए यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (JNPA)
 
जहाजांचे वेळापत्रक विस्कळीत होणे आणि निर्यात मालाच्या वाहतुकीवर परिणाम होणे या पार्श्वभूमीवर जेएनपीएने सर्व संबंधित भागधारकांशी संवाद वाढवला आहे. अध्यक्ष गौरव दयाल आणि उपाध्यक्ष रवीश कुमार सिंह हे शिपिंग लाईन्स, निर्यातदार, टर्मिनल ऑपरेटर्स, सीमाशुल्क विभाग तसेच विविध व्यापारी संघटनांशी सातत्याने चर्चा करत असून कार्यान्वयन यातील अडचणी त्वरित सोडवण्यावर भर दिला जात आहे. (JNPA)
 
अडकलेल्या कंटेनर्समध्ये लक्षणीय घट
 
या समन्वित प्रयत्नांमुळे, बंदरातील परिस्थितीत सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. जेएनपीएमध्ये अडकलेल्या कंटेनर्सची संख्या दि.१ मार्च रोजी सुमारे ५,००० टीईयू होती ती दि.८ मार्च रोजी सुमारे ३,२०० टीईयू झाली आहे, तर अडकलेल्या नाशवंत कंटेनर्सची संख्या सुमारे २,००० वरून सुमारे १,००० पर्यंत कमी झाली आहे. अडकलेल्या कंटेनर्सची संख्या लवकरात लवकर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (JNPA)
 
हेही वाचा: Vande Mataram Controversy: नागालँडमध्ये ‘वंदे मातरम्’वरून राजकीय वाद; एनपीएफचा निर्णयाला विरोध!  
 
निर्यात कंटेनर्सच्या ‘बॅक टू टाउन’ हालचालींना गती
 
सीमाशुल्क विभागानेही मोठा दिलासा देत ईजीएम दाखल नसतानाही, सील अबाधित असल्यास प्राथमिक पडताळणीनंतर बॅक टू टाऊन हालचालींना परवानगी दिली आहे. नियमित सविस्तर भौतिक तपासणी आणि संबंधित शुल्क/दंड तात्पुरते माफ करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे निर्यात प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. रीफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनसोबत समन्वय साधून नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी पुरेशा ट्रेलर्सची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे केळी, द्राक्षे आणि इतर कृषी मालाची वेळेत व सुरळीत हालचाल होत आहे. (JNPA)
 
व्यापार सुलभतेसाठी निर्णायक उपाय
 
बंदरावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि आयात-निर्यात समुदायाला दिलासा देण्यासाठी जेएनपीएने पुढील उपाय तत्काळ लागू केले आहेत:
 
मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या मालासाठी तात्पुरती ट्रान्सशिपमेंट साठवण व्यवस्था
 
गरजेनुसार अतिरिक्त साठवणूक क्षेत्राचे वाटप
 
होरमुज सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील बंदरांसाठी (फुजैराह, खोर फक्कन, सोहार, मस्कत, सलालाह) विशेष जहाज फेऱ्या
नाशवंत आणि परत आलेल्या निर्यात मालाला प्राधान्य
 
“जेएनपीए बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आयात-निर्यात व्यवसायातील समुदायाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. माल वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि व्यत्यय कमी करण्यासाठी मदत उपायांचा शोध घेण्यासाठी आम्ही शिपिंग मंत्रालय, सीमाशुल्क अधिकारी, टर्मिनल ऑपरेटर आणि व्यापार भागधारकांशी सतत चर्चा करत आहोत. निर्यातदारांना आधार देणारे व्यावहारिक उपाय ओळखणे आणि बंदरांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करणे हा आमचा प्रयत्न आहे.” (JNPA)
- गौरव दयाल, अध्यक्ष, जेएनपीए
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.