संघर्ष उफाळला... ज्वाला भडकल्या...

09 Mar 2026 11:52:45

गेला एक आठवडा इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र होत गेला आहे. इराणकडील अत्याधुनिक शस्त्रसाठे संपवण्याच्या इराद्याने इस्रायल आणि अमेरिका पेटून उठले असून, हे दोन्ही देश इराणवर बॉम्ब टाकत आहेत. मात्र, अद्यापही त्यांचे लक्ष्य त्यांना गाठता आलेले नाही. याच काळात इराणने बाजूच्या देशांना युद्धात ओढून घेतल्याने संघर्षाची व्याप्ती वाढली आहे.

हा लेख लिहित असतानाच, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला बरोबर आठ दिवस झाले आहेत. या केवळ आठ दिवसांत या युद्धाचे अति संहारक आणि रौद्र रूप समोर आले. रात्रंदिवस सातत्याने एकमेकांवर बॉम्बहल्ले, जाळपोळीची दृश्ये सर्वत्र दिसत आहेत. या युद्धाची व्याप्ती केवळ आखाती देशांपुरती मर्यादित न राहता, थेट युरोपातील देशांपर्यंत आता पसरली आहे. इराणने युद्धोन्मादात म्हणा किंवा एक चाल म्हणून, सायप्रस आणि उत्तरेस लगतचा शेजारी असलेल्या अझरबैजानवरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. असे करून त्याने आपल्या विरोधात अनेक देश एकाचवेळी उभे करून, स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचे चित्र दिसते. युद्धाची व्याप्ती जरी अनेक देशांपर्यंत पसरली असली, तरी युद्धात अमेरिका-इस्रायल आणि इराण एवढेच भाग घेताना दिसत आहेत. दुसरा कोणताही देश या घटकेला प्रत्यक्ष युद्धात उतरण्याची आजतरी संभावना कमीच आहे. ब्रिटन आणि फ्रेंच सैनिकी तळांवर इराणने हल्ले केल्याने त्यांना इराणविरोधात पवित्रा घ्यावा लागला, तरी त्यांचे धोरणही तळ्यात-मळ्यात असेच आहे. याचे मूळ कारण उदारमतवादी लोकशाही असलेल्या ब्रिटनमध्ये, गेल्या काही दशकांत मुस्लीम जनसंख्येची फार मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ आहे. इतकेच नव्हे, तर भारतातही ज्या धोरणीपणाने मुस्लीम घुसखोरांनी येथील सुस्त आणि लाचखोर शासकीय यंत्रणेचा फायदा उठवत, मतदानाचे हक्क आणि जनहिताच्या इतर शासकीय योजनांचे फायदे घेण्यास सुरुवात केली, राजकीय पक्षांना लांगूलचालन करण्यास भाग पाडले; थेट तोच प्रकार ब्रिटनमधेही घडत आहे. मुस्लीम मतदार विरोधी पक्षांकडे झुकू नयेत, यासाठी इराणविरोधात कुठलेही विधान करण्यास ब्रिटन नाखुश आहे. त्यामुळे उद्या जरी ब्रिटनची अधिक सैनिकी किंवा वित्तहानी झाली आणि ‌‘नाटो‌’कडून इराणवर सैनिकी कारवाई करण्याचे ठरले, तरी त्यात ब्रिटनचा कितपत सहभाग असेल, हा प्रश्नच आहे! इराणला तर सर्वच मुस्लीम देशांनी वाळीत टाकले आहे.

इराणबाबत होरा चुकला

अगदी पहिल्याच दिवशी अयातुल्ला अली खामेनी आणि अनेक महत्त्वाच्या सेनाधिकाऱ्यांचा, एकाच हल्ल्यात अमेरिका-इस्रायलने बळी घेतला होता. इराणच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची फळी एकाचवेळी नामशेष केल्यावर इराण शरण येईल, हा त्यांचा होरा मात्र पूर्णपणे चुकला. उलट इराणने अधिक जोरदारपणे हल्ले करत आणि युद्धाची व्याप्ती वाढवली. अमेरिकेचे युद्धविषयीचे हल्ले गेले अर्धशतक चुकतच आले आहेत. 1960च्या दशकात व्हिएतनामच्या युद्धात नामुष्की पत्करून सैन्य मागे हटविणाऱ्या अमेरिकेने, अफगाणिस्तानमधूनही अशीच माघार घेतली; हा गेल्या दशकभराचा इतिहास आहे. इराणमध्ये दोघांनी मिळून केवळ हवाई हल्ले करण्याचे धोरण दिसत असले, तरी पुढे जाऊन तेथे सैन्य उतरविण्याला पर्याय राहिलेला नाही. जे व्हेनेझुएलामध्ये सहजपणे घडले, ते इराणमध्ये घडण्याची शक्यताच दिसत नाही. इराणमध्ये कोणत्या वेळी प्रत्यक्ष सैनिकी कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, हे आताच सांगणे कठीण आहे. ती वेळ येण्यासाठी प्रथम इराणचे मोठे बलस्थान असलेले क्षेपणास्त्रांचे साठे, नामशेष होण्याच्या स्थितीत यावे लागतील आणि सध्या जे क्रांतिकारी संरक्षण दल फार जोशात हल्ले करत आहे, त्याला समूळ नामशेष होण्याच्या पातळीवर आणावे लागेल. ती स्थिती आल्यावरच अमेरिका-इस्रायल, इराणच्या भूमीवर सैनिकी कारवाई करण्याला धजावतील. जर काही कारणाने ती करावी लागली, तर दोन्ही देशांची प्राणहानी-वित्तहानी अपरिमित होईल. अमेरिकेचे सैन्य कठीण परिस्थितीत लढण्याच्या तयारीत नसते, हे यातून दिसून आले आहे. इस्रायलला वेस्टबँक आणि लेबेनॉन या प्रदेशात लढाई करण्याचा सैनिकी सराव असला, तरी ते घर-अंगणातील युद्ध आहे. तेथील वातावरण इस्रायलपेक्षा फार वेगळे नाही. ते सैन्य इराणसारख्या विषम परिस्थितीच्या प्रदेशात प्राणहानी झेलण्याच्या परिस्थितीत कितपत टिकाव धरून राहील, याची शाश्वती देता येणार नाही. अमेरिकेपेक्षा इस्रायलमधील जनता प्राणहानीविषयी अधिक संवेदनशील आहे.

अली खामेनींनंतर कोण?

अयातुल्ला अली खामेनींना मारल्यानंतर कोण, याचे उत्तर मागच्या लेखात दिले होते. त्यांची जागा मोठा मुलगा घेणार हेही ठरल्याचे दिले होते. जरी त्यांच्यासोबत मोठा मुलगा आणि त्याचे कुटुंब मारले गेले असले, तरी नेमका त्याचवेळी दुसरा मुलगा मोज्तबा बाहेर असल्याने तो वाचला. मोज्तबालाही याआधी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन, अयातुल्लाच्या पदासाठी तयार केले होते. अयातुल्लाच्या गादीवर तो येईल, याची व्यवस्था अली खामेनींनी आधीच करून ठेवली होती. ते रीतसर घडण्यासाठी ज्येष्ठ मुल्लांच्या सभेने फक्त अनुमोदन देण्याचा केवळ उपचार राहिला होता. नेमकी ज्या ठिकाणी बैठक ठरली होती, तीच इमारत बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करण्यात आली. त्या हल्ल्यात ज्येष्ठ मुल्लांपैकी किती मारले गेले, ही माहिती बाहेर आलेली नाही. हल्ल्यामुळे ती बैठक पुढे ढकलली गेली. त्याची कडवी धर्मनिष्ठा, कट्टरपणा आणि दुराग्रही वृत्तीची माहिती, अनेक इराण अभ्यासकांना माहिती होती. तो अयातुल्लापदावर आल्यास संघर्ष लांबण्याची शक्यता बळकट आहे. म्हणून ट्रम्पबाबाने जाहीर केले की, अयातुल्लाच्या जागेवर नेमणूक होणारी व्यक्ती ही अमेरिकेच्या संमतीने ठरविली जावी. याचा अर्थ, ती अमेरिकेच्या ताटाखालची मांजर असायला पाहिजे. ते घडणे सध्या तरी कठीण दिसते. इस्रायलनेही धमकी दिली की, “अयातुल्लाच्या जागी जी व्यक्ती येईल, तिला ठार करू.” ज्याप्रमाणे अली खामेनीची योजनापूर्वक हत्या करत आली ते पाहता; नव्या अयातुल्लाच्या बाबतीत ते घडण्याची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही. तसे पाहिले, तर इराणमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्या घडवून आणण्याचा इस्रायलचा हातखंडा आहे, असेच म्हणावे लागेल. विशेष करून, आण्विक प्रकल्पांत महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ वैज्ञानिकांचा वध बेमालूमपणे इस्रायलने घडवून आणला आहे. असे असल्याने मोज्तबाला रीतसरपणे ‌‘अयातुल्ला‌’ म्हणून घोषित करण्याची घाई, ज्येष्ठ मुल्ला सभासदांनी दाखवलेली नाही. त्याला दुसरी बाजूही आहे. मोज्तबामुळे युद्ध लांबून संपूर्ण इराणची मोठ्या प्रमाणावर हानीच होईल. तसे होऊ नये, त्याजागी मवाळ धोरण असलेला अयातुल्ला बसवावा आणि अनेक वर्षांपासून इराणची होत असलेली राजकीय आणि सामाजिक कोंडी फुटावी, या विचारांचा गट ज्येष्ठ मुल्लांच्या सभासदांमध्ये असू शकतो. तेव्हा त्या बाबतीत सामोपचाराने एकमत घडवून आणून मोज्तबाऐवजी दुसऱ्या माणसाला आणावे, हाही विचार असू शकतो. सध्या तरी अयातुल्लापद रिक्त आहे. काही कडव्या मुल्ला सभासदांचा खातमा करून इस्रायलने त्यांच्यात दहशत माजवली, तर नव्याने येणारा अयातुल्ला मवाळ धोरण ठेवेल आणि शस्त्रसज्जतेबाबत कमी आग्रही राहील, असा अंदाज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेने घातलेल्या आर्थिक बंधनांमुळे इराणी जनता त्रासली आहे. ती बंधने शिथील झाली, तर त्यांना मोकळा श्वासही घेता येईल. बंधने मोकळी करताना अमेरिका काही अटी घालेलच. त्या स्वीकारण्याच्या मनस्थितीत नवे नेतृत्व असणेही आवश्यक असणार आहे. ते धोरण एक प्रकारे इराणला सध्याच्या आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यास मदतही करेल.

शस्त्रास्त्रांची विल्हेवाट

अमेरिका आणि इस्रायल या युद्धात उतरण्याचे मुख्य कारण, इराणने गेली दोन दशके एकेक करत तयार केलेला मोठा शस्त्रसाठा नष्ट करणे हे आहे. तो कसा नष्ट करणे आवश्यक आहे, याचे प्रत्यंतर आता येत आहे. आपल्या शेजारच्या खनिजतेल विपुल प्रमाणात असलेल्या छोट्या आणि दुबळ्या देशांवर, बेमुर्वतपणे सातत्याने हल्ले करण्याचे धोरण अगदी पहिल्या दिवसापासूनच इराणने स्वीकारले आहे. त्यातून सगळ्या जगाला ऊर्जासंकटाने घेरण्याचे त्याचे धोरण स्पष्ट आहे. इराणसारख्या कट्टर, माथेफिरू आणि कडवट मनस्थितीची राजवट असलेल्या देशाच्या हातात, आण्विक शस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असणे मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक असेच. लुळा-पांगळा पाकिस्तान गेली कित्येक दशके आपल्याला अण्वस्त्र सज्ज असण्याच्या धमक्या देत होता. इराण त्यापेक्षा अधिक कट्टर असून, परिणामांची तमा बाळगणारा देश नाही. तो त्या अण्वस्रांचा वापर करण्यास जराही मागे पुढे पाहणार नाही. स्वतः नाही, तर ‌‘हिजबुल्ला‌’, ‌‘हौती‌’ यांसारख्या अतिरेकी संघटनांच्या हाती ती सोपवून, हवे तिथे स्फोट घडवून आणू शकतो. यासाठी इराणला अण्वस्त्रसज्ज आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्यापासून परावृत्त करणे, हे न केवळ इस्रायलच्याच दृष्टीने, पण जगाच्या दृष्टीनेही हितकारक असेल. अमेरिका-इस्रायल ती नष्ट करण्याच्या मागे पडले आहेत. इराणचे अण्वस्त्र प्रकल्प, ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठे, मोठ्या धोरणीपणाने इराणने 100-125 फूट खोलीवर साठवून ठेवले आहेत. ते सहजासहजी नष्ट होणार नाहीत. सध्या येत असलेल्या बातम्यांनुसार, ही स्थाने दोघेही मिळून बॉम्ब टाकून नष्ट करण्याच्या मागे आहेत. पण, आज आठवडा झाल्यावरही ती नष्ट झाल्याचे वृत्त नाही. एक तर इराणचे साठे आहेत, तिथेच नष्ट करणे अथवा सतत संघर्ष चालू ठेवून काही दिवसांत ते ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठे संपण्याची वाट पाहणे, हे दोनच पर्याय त्या दोघांपुढे आहेत.

सध्या जग कात्रीत सापडले आहे. इराणचे अण्वस्त्र प्रकल्प, ड्रोन आणि क्षेपणास्त्रसाठे न संपता युद्ध थांबले, तर इराण अधिक शिरजोर होऊन जगासाठी डोकेदुखी ठरेल. जर युद्ध ते साठे पुरेपुर नष्ट होईपर्यंत खेचत राहिले, तरी ते जगावर महागाईचे अनेक प्रकारच्या तुटींचे अभूतपूर्व संकट होऊन दीर्घकाळपर्यंत घोंगावत राहील.

- प्रमोद पाठक
9975559155

Powered By Sangraha 9.0