आपल्या महिला क्रीडापटूंची ‌‘अस्मिता‌’

09 Mar 2026 12:29:08

देशामध्ये सध्या क्रीडाक्षेत्रामध्ये प्रगतीचे वारे वाहू लागले असून, या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अतुल्यच आहे. केंद्र सरकारदेखील तळागाळातील कुशल महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने देशाच्या क्रीडाक्षेत्रातील महिलांच्या सध्याच्या योगदानाचा घेतलेला आढावा...

क्रीडाक्षेत्रातीलही महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, जागतिक महिला दिन हा दि. 8 मार्च रोजी साजरा केला जातो. कालच्या या दिनाचे औचित्य साधून, क्रीडाक्षेत्रात स्त्री-पुरुष समानता राखण्यासाठी व महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‌‘अस्मिता‌’ (ASMITA - अचिविंग स्पोर्ट्स माईलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन) सारखे उपक्रम, भारत सरकारकडून ‌‘खेलो इंडिया‌’ योजनेचा भाग म्हणून राबवले जात आहेत. अस्मिता म्हणजे स्त्रीचा स्वाभिमान, तिची स्वतंत्र ओळख, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान. एक महिला भारताच्या राष्ट्रपतिपदावर, द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आरुढ झालेली आपण बघत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्येही अनेक महिला मंत्री उत्तम देशसेवा करत आहेत. रक्षा खडसे या समर्थपणे केंद्र सरकारमध्ये, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयात राज्यमंत्रिपद सांभाळत आहेत. त्यांनी जाहीर केल्यानुसार, ‌‘अस्मिता‌’ कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विशेष मैदानी स्पर्धांचे आयाजन करण्यात आले होते. 30 पेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात ईशान्येकडील राज्यांचाही समावेश होता.

गावे आणि लहान शहरांतील अधिकाधिक मुलींनी क्रीडाक्षेत्रात करिअर घडवावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असाच. जास्तीत जास्त महिलांना खेळांकडे आकर्षित करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि तळागाळातील प्रतिभा शोधणे हाअ ‌‘अस्मिता‌’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध वयोगटांत विविध स्पर्धांचे आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आले होते. खेळाच्या मैदानात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, महिला पंच आणि महिला समयपालांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे. खेळामध्ये वेळेची अचूक नोंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला आपण ‌‘समयपाल‌’ किंवा ‌‘टाईम-कीपर‌’ असे संबोधतो. प्रत्येक ठिकाणी पाच तांत्रिक अधिकारी, दहा स्वयंसेवक, एक स्पर्धा व्यवस्थापक, एक माजी चॅम्पियन खेळाडू आणि एक जिल्हा युवा अधिकारी कामकाजाचे निरीक्षण करत आहेत. भारतीय महिला खेळाडूंनी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि 2036चं ऑलिम्पिक, यादृष्टीने त्या आयोजनाकडे पाहिलं जातं आहे. या मोहिमेकडे महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, एक व्यासपीठ म्हणूनही बघण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग आपण बघत आहोतच. विविध क्रीडाप्रकारातही भारतीय महिला दिवसेंदिवस आघाडीवर जाताना दिसत आहेत. त्याप्रमाणेच भारतीय क्रीडाविश्वातील ऑलिम्पिक संघटनेतही, महिला प्रमुखपदावर आरुढ होत आहेत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपद एक महिलाच सांभाळत आहे. आपल्या सर्वांची परिचित असलेली प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा हिला, तत्कालीन राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी जुलै 2022 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून शपथ दिली होती. ती पी. टी. उषा भारतीय ऑलिम्पिक महासंघाची विद्यमान अध्यक्षा आहे.

केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र सरकारचा 2026-27चा अर्थसंकल्पही, ऑलिम्पिकचे लक्ष्य समोर ठेवून महिला व पुरुषांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आठ हाय-परफॉर्मन्स सेंटर्स आणि 25 उत्कृष्टता केंद्रांच्या उभारणीवर भर देतो आहे. यामध्ये बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, कुस्ती, शुटिंग यांसारख्या खेळांमध्ये, महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. हाय-परफॉर्मन्स सेंटर्समध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या 12 खेळांसाठी, राज्यभरात आठ आणि नंतर आणखी चार नवीन हाय-परफॉर्मन्स सेंटर्स सुरू होणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष खेळाडूंना शोधण्यासाठी, विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्रे आणि जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे उभारली जाणार आहेत. ‌‘ऑलिम्पिक 2036‌’ला डोळ्यांसमोर ठेवून खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, अत्याधुनिक मैदाने आणि राहण्यासाठी उत्तम निवास व्यवस्थाही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे महिला खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरणनिर्मितीवरही भर देण्यात येत आहे. थोडक्यात, ऑलिम्पिक पदकांचे ध्येय ठेवूनच, महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राणी रामपाल सांगते की, विश्वास, लवचिकता आणि संधी केवळ एका व्यक्तीचे जीवनच बदलू शकत नाहीत, तर राष्ट्राच्या खेळाची दिशादेखील बदलू शकतात. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेली आणि ‌‘हॉकीची राणी‌’ समजली जाणारी राणी रामपाल, हिचा आपण या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आवर्जून उल्लेख करायला हवा. राणी रामपालसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एक उत्सव आणि जबाबदारी दोन्ही आहे. एका मुलाखतीत राणी सांगते की, आदर्श व्यक्ती कायमच तरुण मुलींना त्यांची स्वप्ने वैध आणि शक्य आहेत यावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करणार ठरतो. किंबहुना जो असा असतो त्यालाच आदर्श म्हटले पाहिजे. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करण्यापासून ते दुखापती आणि अपयशांशी झुंजण्यापर्यंत, राणी रामपालने अनेक चढउतार अनुभवले आहेत. मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक आव्हानाने तिला केवळ एक खेळाडू म्हणूनच नव्हे, तर एक नेतृत्व म्हणूनही आकार दिला. अपयशाने मला नम्रता, ताकद आणि कधीही हार न मानण्याचे मूल्य शिकवल्याचे राणी म्हणते.

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या महिलेला सतत अडचणींचा सामना करावा लागला. मर्यादित संसाधने, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणी, हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. जीवनात आलेल्या काही क्षणांच्च्यवेळी तिला थांबणे सोपे झाले होते. पण भारताची जस घालण्याच्या एका एका स्वप्नाने तिला पुढे जाण्यास मदत केल्याचे,ती सांगते. माझे स्वप्न कोणत्याही अडथळ्यापेक्षा मोठे होते.

हॉकी खेळातून निवृत्त झालेली राणी, आता मुलींची नवीन पिढी तयार करण्यात मग्न आहे. भविष्याकडे पाहता राणीला वाटते की, आपलं प्राधान्य स्पष्ट असले पाहिजे. किशोरावस्थेत अधिकाधिक मुलींना क्रीडाक्षेत्रात आणणे हेच तिचे ध्येय आहे. आपण तळागाळातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि सुरक्षित क्रीडाक्षेत्रात गुंतवणूक केली पाहिजे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुलींना खेळत राहण्यासाठी प्रोत्साहितही केले पाहिजे, असे ती सांगते. राणीला नेतृत्वाचा विकास हे आपलं पुढील एक नैसर्गिक पाऊल वाटते. राणी ते स्पष्ट करताना सांगते, मला मैदानाबाहेर हॉकीच्या विकासात योगदान द्यायचे आहे आणि भविष्यातील नेत्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय मुलीला राणी हे आवाहन करते की, तुम्ही कुठूनही आलात, तरी धैर्याने स्वप्न पाहा आणि अथक परिश्रम करा.

राणी रामपालनंतरचा भारतीय महिला हॉकी संघ एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. दोन वर्षांपूव 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीत प्रवेश न मिळाल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघ नाराज झाला होता. आता हैदराबाद येथे होणाऱ्या 2026च्या महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीत, एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये प्रत्येकी चार संघांचे दोन गट करण्यात आले असून, यजमान भारताचा संघ स्कॉटलंड, उरुग्वे आणि वेल्ससह गट ‌‘ब‌’मध्ये आहेत. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना, त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ खेळावे लागेल. स्पर्धेतील शीर्ष तीन संघ दि. 15 ते 30 ऑगस्टदरम्यान, बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्समध्ये होणाऱ्या 2026च्या महिला हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील पराभवानंतर संघाची सूत्रे हाती घेतलेल्या कर्णधार सलीमा टेटे हिच्या भारतीय महिला हॉकी संघामध्ये, सातारा जिल्ह्यातील आसू या छोट्याशा गावातल्या वैष्णवी फाळके आणि फलटणच्या ऋतुजा पिसाळ यांचाही समावेश झाला आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात प्रशिक्षणासाठी गेलेल्या या मुलींबरोबर, अन्य प्रदेशांतून आलेल्या हॉकी खेळाच्या मुली जागतिक महिला दिनाच्या दिवशीच हैदराबादेत आपला पहिला सामना खेळणार आहेत. तर, जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी हॉकीच्या मुलींना तसेच बाकी सर्व खेळांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशा समस्त भारतीय महिलापटूंना आपण सारे शुभेच्छा देऊ. क्रिकेट तर आपण सारे बघत असतोच, पण महिला दिनानिमित्त त्यांचा हॉकीचा खेळ बघण्याची संधी आपल्याला मिळत आहे. ‌‘एफआयएच हॉकी वर्ल्ड कप क्वालिफायर्स हैदराबाद, तेलंगण 2026‌’ सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग ‌‘स्टार स्पोर्ट्स खेल‌’ आणि ‌‘जिओ हॉट-स्टार‌’वर उपलब्ध असेल.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704


Powered By Sangraha 9.0