बहुगुणी किरण

    09-Mar-2026   
Total Views |

प्रायोगिक नाटकाची चळवळ आणि वारसा पुढे नेण्यासाठी अनुभवाचा उपयोग करत, प्रायोगिक रंगभूमीला बळ देणाऱ्या किरण खांडगे यांच्याविषयी...

किरण खांडगे यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील निमगाव जाळी. त्यांचा जन्म दि. 24 एप्रिल 1973 रोजी त्यांच्या मामाच्या गावी, अर्थात, येवला येथे झाला. त्यांची साडेतीन ते चार एकर जिरायती शेती होती. पण पाण्याच्या अभावाने शेती करणे जिकिरीचे झाले होते. 1972च्या दुष्काळात वडील विष्णुपंत आणि आई कमल यांनी गाव सोडून, कामाच्या शोधात मुंबईची वाट धरली. पुढे कल्याण येथे वास्तव्यास आले. गाव सोडल्यामुळे शेती करण्यास कोणीच नसल्याने, विष्णुपंत आणि त्यांचे बंधू एकनाथ यांनी शेती विकली. पुढे कल्याणला आल्यानंतर विष्णुपंत यांनी ‌‘सॉलेट कन्टेनर्स प्रा. कंपनी‌’ येथे काम करण्यास सुरुवात केली. पुढे किरण त्यांना एक बहीण आणि एक भावासहित, कल्याणमध्ये गुण्यागोविंदाने राहू लागले.

पण किरण सातवीला असतानाच वडिलांची कंपनी बंद पडली. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला. त्यामुळे वडिलांनी भाजी विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कामात किरणदेखील मदत करत असत. शिवाय, किरण दूधविक्रीचेही काम करत.

किरण यांचे शालेय शिक्षण न्यू हायस्कूल येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी त्याच शाळेतून घेतले. पुढे कल्याणच्याच बिर्ला महाविद्यालयातून पदवीही संपादन केली. किरण यांनी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करत, आईवडिलांना आर्थिक मदत करण्याच्या उदिष्टाने दहावीत असतानाच एक ऑटो लॅम्प कंपनी सुरू केली होती. ती महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला जाईपर्यंत सुरू होती. त्यानंतर ऑटोमेटिक मशिनरी आल्याने, व्यवहाराचा ताळमेळ जमेना. परिणामी किरण यांना कंपनी चालविणेच कठीण होऊन बसल्याने, नाईलाजाने त्यांनी ती बंद केली.

शाळेत असताना किरण हे इतर उपक्रमांमध्येदेखील कायम सहभागी होत. कधी शाळेचे स्नेहसंमेलन असो, की नाटकात काम करणे असो, किरण त्यात हौसेने सहभाग घेत असत. यातूनच किरण यांच्यातील नाटकाविषयीची आवड वाढत गेली. यामुळे पुढे ते ‌‘विजिगीषा नाट्यसंस्थे‌’त प्रवेश घेतला. तिथे राम दौड, अर्जुन ढाकणे दिग्दर्शक दत्ता जाधव, ज्योती नायर, सुनिल कुंभार अशा नाट्यवेडी मंडळींचा सहवास त्यांना लाभला. त्यावेळी स्पर्धेसाठीच्या नाटकांमध्ये किरण अभिनयाबरोबरच, संगीताचीही जबाबदारी सांभाळत असत. त्यानंतर किरण यांची नाटकाची भूक अधिक वाढली, म्हणून त्यांनी सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शक रविंद्र लाखे यांच्या ‌‘मिती चार‌’ या संस्थेत दाखल झाले. लाखे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. ‌‘विजिगीषा‌’मध्ये एकांकिका स्पर्धेत कधी ‌‘पाषाणकर तुमचं काय चाललं‌’ यातील अण्णा, क्रिकेटर, ‌‘मुक्तछंद‌’मधील म्हातारा; तसेच दोनअंकी नाटक राज्य नाट्यस्पर्धेत प्राथमिक फेरीत अनेक बक्षिसे त्यांना मिळाली. बिर्ला महाविद्यालयामध्ये असताना, महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतही त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. किरण यांनी मित्र सुनील जोशी यांच्यासोबत मराठी वाद्यवृंददेखील सुरू केला. त्यातून होणाऱ्या अर्थार्जनातून, ते आपला खर्च करत. याच पैशातून त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणालाही हातभार लागला. त्याचबरोबर कल्याणमधील ‌‘अंतरंग‌’ या वाद्यवृंदाबरोबरही किरण जोडले गेले.

हे करत असताना नाटक डोक्यातून जात नव्हते, पण कामधंद्यामुळे नाटक करणे शक्य होत नसे. पण नाटकासाठी काहीतरी करण्याची तळमळ कायम होती. त्याचवेळी महाराष्ट्र प्रायोगिक नाटकांची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती; पण ती केवळ मुंबई-पुणे या शहरांपुरती मर्यादित होती. ती नाटके कल्याणकरांना बघण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागे.

मग आपण याच प्रायोगिक नाटकांचे प्रयोग कल्याणकरांसाठी इथे उपलब्ध करून देऊया, या विचाराने ‌‘चार मित्र कल्याण‌’ या संस्थेची स्थापना झाली. पुढे याच संस्थेच्या माध्यमातून कल्याणमधील अत्रे नाट्यमंदिरमध्ये, राज्यभर गाजत असलेल्या अनेक नाटकांचे प्रयोग होऊ लागले. आजही स्वतःची पदरमोड करून, नाट्यप्रेमींची आवड ही संस्था पुरवत आहे. किरण यांची नाटकाची आवड आणि ती पूर्ण करण्यासाठी करत असलेली धडपड पाहता, हौसेला मोल नाही याचीच प्रचिती येते. आतापर्यंत सुमारे 70 नाटकांचे प्रयोग त्यांनी लावले आहेत. नाटकाबरोबरच सिनेमाचीही आवड असल्याने, मराठी सिनेमामध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम करण्याचा त्यांचा मानस आहे. कल्याणमध्ये प्रायोगिक नाट्यचळवळ मोठ्या प्रमाणात रुजावी, यासाठी इथे एक ‌‘इन्टिमेट थिएटर‌’ बांधण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

किरण यांनी पदवी संपादन केल्यानंतर नोकरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना पोल्ट्रीमध्ये सर्विस सुपरवायजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 1996 ते 2000 पर्यंत त्यांनी या क्षेत्रात काम केल्यावर, स्वतःचा व्यवसायही सुरू केला. सध्या ते पोल्ट्री समुपदेशक म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच कल्याणमध्ये त्यांचे चिकनचे दुकान असून, ते आपली नाटककलाही जोपासत आहे. अशा या बहुगुणी कलाकाराला पुढील वाटचालीसाठी, दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा.