खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनात भारतीय महिलांचे योगदान

08 Mar 2026 15:07:23
Indian Women’s Contribution to Space Science
 
भारतीय समाजात महिला आणि अवकाश संशोधन म्हटले की, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स ही दोन नावे सर्वपरिचित आहेत. कल्पना चावला यांनी पृथ्वीबाहेरील सूक्ष्मगुरुत्व वातावरणात वैज्ञानिक प्रयोग करून मानवी अवकाश संशोधनात महत्त्वाचे योगदान दिले, तर सुनीता विल्यम्स यांनी दीर्घकालीन अवकाशवास, अवकाशभ्रमण आणि अंतराळ स्थानकावरील प्रयोगांद्वारे मानव दीर्घकाळ अवकाशात कसा राहू शकतो, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली. या दोघींनी भारतीय मुलींसाठी अंतराळ अक्षरशः खुले केले; परंतु भारतीय महिलांचे योगदान यापुरते मर्यादित नाही. तेव्हा आज ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने, अंतराळविश्वातील अनंताचा वेध घेणार्‍या या नव्या सदराचा प्रारंभ खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनातील भारतीय महिलांचे योगदान या विषयापासून करुया...
 
ग्रह, तारे, आकाशगंगा आणि विश्वाची रचना समजून घेण्याचा हा प्रवास दीर्घ आणि तितकाच जिज्ञासेने भरलेला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत आकाश निरीक्षणाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान होते. मात्र, इतिहासाच्या मुख्य प्रवाहात महिलांचे योगदान अनेकदा नोंदले गेले नाही. आज परिस्थिती बदलत आहे. खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधन या अत्याधुनिक विज्ञानक्षेत्रात भारतीय महिलांनी केवळ सहभागच नाही, तर नेतृत्वही सिद्ध केले आहे. प्राचीन भारतीय तत्त्वचिंतनात गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या विदुषींनी विश्वाच्या स्वरूपाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित केले. विश्व अनंत आहे का? अस्तित्वाची मर्यादा काय आहे? पदार्थ आणि चेतना यांचे नाते काय? अशा प्रश्नांमधून वैज्ञानिक विचारांची बीजे रोवली गेली. आधुनिक अर्थाने हे खगोलशास्त्र नसले, तरी विश्व समजून घेण्याची बौद्धिक परंपरा येथे निर्माण झाली. पुढील अनेक शतकांत गणिती खगोलशास्त्र विकसित झाले; परंतु सामाजिक मर्यादांमुळे महिलांची नावे इतिहासात कमी दिसतात.
 
२०व्या शतकात आधुनिक संशोधन संस्थांची उभारणी झाल्यानंतर भारतीय महिलांचा खगोलशास्त्रातील प्रवेश स्पष्टपणे दिसू लागतो. सूर्याच्या पृष्ठभागावरील बदल, तार्‍यांची रचना आणि प्रकाशाच्या वर्णपटांचा अभ्यास करणार्‍या निरुपमा राघवन या भारतातील आरंभीच्या महिला खगोल संशोधकांपैकी एक मानल्या जातात. त्यांनी निरीक्षणाधारित खगोलशास्त्रात महिलांसाठी मार्ग खुला केला. पुढे ‘तारकागुच्छांची निर्मिती’ आणि ‘तार्‍यांच्या उत्क्रांती’चा अभ्यास करणार्‍या अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांनी भारतीय खगोल-भौतिक संशोधनाला नवे परिमाण दिले. आकाशगंगांतील तार्‍यांच्या संख्येच्या अभ्यासातून त्यांची निर्मिती-प्रक्रिया समजून घेण्यास त्यांच्या संशोधनाने मदत केली.
 
‘सुपरनोव्हा स्फोट’ म्हणजेच तार्‍यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात घडणार्‍या प्रचंड ऊर्जावान घटनांचा अभ्यास करणार्‍या जी. सी. अनुपमा यांनी भारताला जागतिक खगोल संशोधन नकाशावर ठळक स्थान दिले. अल्पकाळ टिकणार्‍या आकाशीय घटनांचे निरीक्षण करून विश्वातील मूलद्रव्यांची निर्मिती कशी होते, याचा अभ्यास करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. ‘सैद्धांतिक विश्वरचनाशास्त्र’ क्षेत्रात प्रियंवदा नटराजन यांनी ‘कृष्णविवरे’ आणि ‘कृष्णद्रव्या’विषयी दिलेली गणितीय मांडणी आज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे. विश्वाच्या आरंभी निर्माण झालेल्या अतिविशाल कृष्णविवरांचा उगम समजावून सांगणार्‍या त्यांच्या संशोधनाने आधुनिक खगोल-भौतिकीला नवा दृष्टिकोन दिला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये आज महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक बनली आहे. ‘मंगळयान’ मोहिमेच्या यशामागे कार्यरत असलेल्या नंदिनी हरिनाथ, रितू करिधल आणि अनुराधा टी. के. यांसारख्या संशोधकांनी मोहिमेचे नियोजन, कक्षीय गणना आणि संप्रेषण प्रणाली विकसित करण्यात नेतृत्व केले. ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रितू करिधल यांनी ‘मंगळयान’, तसेच ‘चांद्रयान’ मोहिमांमध्ये मार्गदर्शन प्रणाली विकसित करण्याचे कार्य केले. ‘उपग्रह संप्रेषण’ क्षेत्रात अनुराधा टी. के. यांनी दीर्घकाळ कार्य करत भारताच्या बिनतारी अवकाश तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान दिले.
 
‘चांद्रयान’ आणि ‘आदित्य-एल१’सारख्या मोहिमांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक महिला अभियंत्या आणि संशोधकांनी उपग्रह रचना, डेटा विश्लेषण, कक्षानियोजन आणि वैज्ञानिक उपकरणांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अवकाश मोहिमांचे यश हे केवळ प्रक्षेपण क्षणापुरते मर्यादित नसते; त्यामागे हजारो तासांचे गणिती मॉडेलिंग, संकेत-प्रक्रिया, तापीय नियंत्रण आणि निरीक्षण विश्लेषण असते. या प्रत्येक स्तरावर भारतीय महिला संशोधक सक्रिय आहेत. भारतीय महिलांचे खगोलशास्त्रातील योगदान समजून घेताना आणखी एक महत्त्वाचा पैलू लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे निरीक्षण, डेटा विश्लेषण आणि अवकाश उपकरण विकास या तुलनेने कमी चर्चिल्या जाणार्‍या क्षेत्रांतील त्यांची भूमिका. आधुनिक खगोलशास्त्र केवळ दुर्बिणीतून आकाश पाहण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही; आज ते अत्यंत अचूक संगणकीय गणना, प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण आणि स्वयंचलित निरीक्षण प्रणालींवर आधारित आहे. भारतातील अनेक महिला संशोधक रेडिओ खगोलशास्त्र, उच्च ऊर्जा खगोल-भौतिकी आणि सूर्य निरीक्षण या क्षेत्रांत कार्यरत आहेत. पुणे, बंगळुरू, उटी आणि लडाख येथील वेधशाळांमध्ये कार्य करणार्‍या संशोधक महिलांनी ‘पल्सार’ संकेत, ‘क्ष-किरण’ स्रोत आणि ‘सक्रिय आकाशगंगां’च्या केंद्रांचा अभ्यास करून जागतिक संशोधनात योगदान दिले आहे.
 
विशेषतः रेडिओ दुर्बिणींच्या साहाय्याने विश्वातील अदृश्य प्रक्रियांचा अभ्यास करण्यामध्ये भारतीय महिला संशोधक सक्रिय आहेत. दृश्यमान प्रकाशात न दिसणार्‍या आकाशीय घटनांचा मागोवा घेण्यासाठी रेडिओ तरंगलांबी अत्यंत महत्त्वाची ठरते. ‘पल्सार’ नावाचे वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे, ‘कृष्णविवरां’च्या आसपास निर्माण होणारे ऊर्जाप्रवाह किंवा ‘आकाशगंगां’च्या केंद्रातील गतिशीलता समजून घेण्यासाठी दीर्घकालीन निरीक्षण आवश्यक असते. या निरीक्षण मोहिमांचे नियोजन, डेटा संकलन आणि विश्लेषण या सर्व टप्प्यांत महिलांचा सहभाग वाढताना दिसतो.
 
अवकाश मोहिमांमध्ये वैज्ञानिक उपकरणांची रचना हा आणखी एक महत्त्वाचा; पण कमी प्रसिद्ध भाग आहे. उपग्रहांवर बसवली जाणारी भिंगाधारित निरीक्षण साधने, विकिरण मापन यंत्रणा, सूर्य निरीक्षण उपकरणे आणि कण शोधक प्रणाली विकसित करण्यामध्ये महिला अभियंत्यांचे योगदान निर्णायक आहे. ‘अ‍ॅकस्ट्रोसॅट’सारख्या बहु-तरंगलांबी अवकाश वेधशाळेमुळे भारताला स्वतःची अवकाशाधारित निरीक्षण क्षमता प्राप्त झाली आणि या मोहिमेत महिला संशोधकांनी उपकरण चाचणी, संकेत विश्लेषण आणि वैज्ञानिक निष्कर्ष मांडणीमध्ये सक्रिय भूमिका बजावली.आज भारतीय महिला दुर्बिणींच्या साहाय्याने दूरस्थ आकाशगंगांचे निरीक्षण करतात, संगणकीय गणिती पद्धती वापरून विश्वाच्या ‘उत्क्रांतीचे मॉडेल’ तयार करतात आणि अवकाशयानांच्या साहाय्याने सूर्य व ग्रहांचा अभ्यास करतात. प्राचीन तत्त्वचिंतनातील विश्वविचारापासून आधुनिक अवकाश मोहिमांपर्यंतचा हा प्रवास भारतीय स्त्रीच्या ज्ञानशक्तीचा पुरावा आहे.
 
विज्ञानप्रसार क्षेत्रातील महिलांचे योगदानही उल्लेखनीय आहे. तारांगणे, शालेय कार्यशाळा आणि सार्वजनिक आकाश निरीक्षण कार्यक्रमांद्वारे महिलांनी विज्ञान लोकांपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दुर्बिणीतून प्रथमच चंद्रावरील विवरे किंवा गुरूचे उपग्रह दाखवण्याचा अनुभव अनेक संशोधक जाणीवपूर्वक घडवतात. विज्ञानातील प्रेरणा ही अनेकदा अशाच अनुभवातून जन्माला येते. भारतीय परंपरेत ज्ञान आणि विश्व समजून घेण्याच्या प्रयत्नाला अत्यंत उच्चस्थान दिले गेले आहे. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते|’ या जगात ज्ञानाइतके पवित्र दुसरे काहीही नाही. विश्व समजून घेण्याचा प्रयत्न हा ज्ञानाच्या सर्वोच्च शोधांपैकी एक मानला जातो. आज भारतीय महिला या ज्ञानयात्रेच्या अग्रभागी उभ्या आहेत. ‘महिला दिना’चा खरा अर्थ केवळ गौरव व्यक्त करणे नसून, विज्ञानातील सहभाग अधिक व्यापक करणे हा आहे. आगामी काळात मानवी अवकाश मोहिमा, विशाल दुर्बिणी प्रकल्प आणि ग्रह संशोधन कार्यक्रमांमध्ये भारतीय महिलांचे नेतृत्व अधिक ठळकपणे दिसेल. आजची भारतीय मुलगी आकाशातील तार्‍यांकडे केवळ आश्चर्याने पाहत नाही; ती त्यांच्या उगमाचे गणित मांडते, त्यांचे संकेत वाचते आणि विश्व समजून घेण्याच्या मानवाच्या प्रयत्नात सक्रिय सहभागी बनते. भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास लिहिताना आता महिलांचे योगदान उपान्त्य नव्हे, तर केंद्रस्थानी येत आहे आणि हीच आधुनिक वैज्ञानिक भारताची खरी ओळख आहे.
 
 
 
 - सुजाता बाबर
 
 
Powered By Sangraha 9.0