मुक्तीचा ‘इराणी’ आवाज!

08 Mar 2026 15:37:39
Iranian Women
 
आखाती देशांमध्ये युद्धाचे पडघम वाजू लागले आणि पुन्हा एकदा आसमंत विश्वयुद्धाच्या काळ्या ढगांनी झाकोळला गेला. प्रख्यात कवी महमूद दारवीश एकदा आपल्या कवितेत म्हणाला होता की, ‘आमची जन्मभूमी कुणी विकली हे आम्हाला माहीत नाही. मात्र, त्याची किंमत कुणी चुकवली, हे मला ठाऊक आहे.’ दमनशाही सत्तेच्या वरंवट्याखाली स्त्री आणि लहान मुले नेहमीच भरडली गेली. इराणमधल्या सत्ताबदलानंतर, जेव्हा स्त्रियांच्या पायात पुन्हा एकदा परंपरेच्या बेड्या अडकवल्या गेल्या, त्यावेळी स्त्रियांच्या जीवनात संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले. एका बाजूला युद्धामुळे झालेल्या जखमांंमधून सावरताना, दुसर्‍या बाजूला स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षातून तिथल्या स्त्रियांचे जीवन आकार घेऊ लागले. काळाच्या ओघात परिस्थिती बदलली, प्रश्न बदलले. मात्र, त्यांचा लढा अजूनही सुरूच आहे. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त अशाच काही धीरोदात्त इराणी महिलांचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचा सत्ताधीश अयातुल्ला खामेनी ठार झाला. इराणच्या सर्वोच्च नेत्यावर अशाप्रकारे हल्ला झाला आहे, असे लक्षात आल्यावर जगभरातील नेत्यांचे लक्ष आखाती देशांकडे वळले. कारण, अमेरिकेने केवळ इराणच्या नेतृत्वालाच संपवले नव्हते, तर आधीच युद्धामुळे धुमसणार्‍या आखाती देशांमध्ये तेल ओतण्याचे काम केले. रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण अशा संघर्षामुळे आधीच ज्या भूभागातील लोक मेटाकुटीला आले होते, तिथे अशाप्रकारचा संघर्ष पुन्हा उभा राहिल्यामुळे जगभरातच चिंतेची लाट पसरली. अशातच ‘सेंटर फॉर ह्युमन राईट्स’ या संस्थेच्या संचालकपदी असलेल्या मेहरंगीझ कर यांनी मध्य-पूर्वेतील सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात यावे, असे आवाहन केले. मेहरंगीझ कर यांनी आपल्या जीवनात तीन दशकांहून अधिक काळ अशा पद्धतीचा संघर्ष, बघितला, अनुभवला. इतकेच नव्हे, तर अशाच जुलमी राजवटीमुळे गजाआडसुद्धा गेल्या.
 
दि. १० ऑक्टोबर १९४४ साली इराणच्या अहवाज प्रांतात त्यांचा जन्म झाला. इराणसारख्या देशात वकिली करताना, त्यांच्या वाटेला जो संघर्ष आला, त्यातून आपल्याला वास्तवाचे भयाण चित्र लक्षात येते. १९७८-७९ दरम्यान इराणमध्ये जेव्हा ‘इस्लामी क्रांती’ झाली, त्याच काळात मेहरंगीझ कर यांची वकिली सुरू झाली. इस्लामी राजवटीतील न्यायव्यवस्थेच्या चौकटीमध्ये त्यांनी स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. (अर्थात, याबदल्यात मोठी किंमत चुकवून). एका बाजूला ‘शरिया’च्या चौकटीमध्ये महिलांना न्याय मिळवून देताना, दुसर्‍या बाजूला ही न्यायव्यवस्था किती अन्यायकारी आहे, यावरसुद्धा त्यांनी वेळोवेळी भाष्य केले.
शासनव्यवस्थाच जिथे अन्यायकारी होते, तिथे माणसांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर, नातेसंबंधांवर परिणाम होणे स्वाभाविकच.
 
कर यांनी आपल्या लेखणीतून इराणच्या व्यवस्थेमधील न्याय आणि मानवी हक्कांची मूलभूत तत्त्वे यांच्यातील तणावांना वाचा फोडली. यावरून तिथल्या परंपरावादी लोकांनी सातत्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. २००० साली बर्लिन येथे पार पडलेल्या ‘इराण आफ्टर इलेक्शन’ या परिषदेनंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. संविधानिक परिवर्तनाचा विचार मांडल्यामुळे मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले. चार वर्षे तुरुंगामध्ये बंदिस्त असताना त्यांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांना अमेरिकेत उपचारासाठी जाण्याची परवानगी मिळाली. मात्र, अशातच त्यांचे पती सियामक पौरझंद यांना काही सुरक्षारक्षकांनी अटक केली. काही काळानंतर त्यांच्याकडून टिव्हीवर जबरदस्तीने कबुलीजबाब नोंदवून घेतला. त्यांना ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अखेर २०११ साली नजरकैदेत असताना त्यांनी आत्महत्या केली. इतया सगळ्या संघर्षातून जात असताना मेहरंगीझ कर यांची लढाई तेव्हाही सुरू होती आणि आजही सुरूच आहे.
 
अशाच आणखीन एक दमनशाहीविरोधात आवाज बुलंद करणार्‍या अझर नफीसी. नफीसी यांचा जन्म १९४८ साली तेहरानमध्ये झाला. इराणच्या राष्ट्रीय सल्लागार सभेत निवडून गेलेल्या पहिल्या महिला नेझत नफीसी यांची ती कन्या. अमेरिका, स्वित्झर्लंड अशा देशांमध्ये शिक्षण झाल्यामुळे साहजिकच, तत्कालीन सामाजिक, राजकीय विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. १९७९च्या दरम्यान त्या आपल्या मायदेशी परतल्या. काळाच्या ओघात बंदिस्त होत गेलेल्या इथल्या संस्कृतीने अर्थातच त्यांचे स्वागत केले नाही. विद्यापीठामध्ये ‘हिजाब’ घालण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.
 
अशातच ९०च्या दशकात त्यांनी एक आगळीवेगळी योजना आखली. दर आठवड्याच्या एक दिवस अझर आपल्या मैत्रिणींना घरी बोलवून ‘निषिद्ध’ साहित्याचे वाचन करीत असे. त्यांच्या याच अनुभवावर आधारित ‘reading lolita in tehran’ हे पुस्तक त्यांनी लिहिले, जे नंतर अत्यंत अत्यंत लोकप्रिय झाले. जुलमी राजवटीतील स्त्रियांची नाकेबंदी आणि अभिजात साहित्यातील कल्पक विश्व यांचा मेळ त्यांच्या लेखणीतून अधोरेखित होतो. काळाच्या ओघात आपल्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारा ग्रंथ ‘things l've been silent about’ सुद्धा त्यांनी लिहिला, ज्यामध्ये बदलणार्‍या राष्ट्रात एका मुलीला तिचा स्वतःचा आवाज कसा सापडतो, याचे चित्रण केले आहे. नफीसी यांचे साहित्य कुठेतरी या प्रवाहात वैश्विक मूल्यांचा शोध घेते, असेच आपल्याला दिसून येते. "जेव्हा मी इराणचा विचार करते, तेव्हा मला प्रकाश दिसतो,” अशी उत्कट संवेदनशीलता आपल्या लेखणीतून मांडणार्‍या अझर नफीसी आपल्या जन्मभूमीपासून दूर आहेत. मात्र, एका बाजूला संघर्षाचा वणवा पेटलेला असताना त्यांचे शब्द आणि त्यांच्या कलाकृती मात्र लोकांना दिशा देत आहेत. संघर्षाचे माध्यम जरी बदललेले असले, तरी संघर्ष सुरूच आहे, ही बाब या दोघींच्या जीवनावरून अधोरेखित होते. मात्र, अशा असंख्य महिला आजही आपापल्यापरीने इराणच्या मुक्तीसाठी आवाज उठवत आहेत.
 
शाहरनूश पारसीपूर म्हणजे अशीच एक साहित्यिका, ज्यांना या अन्यायकारी राजवटीत तुरुंगवास भोगावा लागला. प्रख्यात अभिनेत्री गोलशिफ्तेह फराहानी यांनी हॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. २००८ साली पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये ‘हिजाब’ न घातल्यामुळे त्यांना निर्वासित व्हावे लागले होते. भारताच्या सांस्कृतिक विविधतेमुळे तिने भारताचा उल्लेख ‘आई’ असाच केला आहे.
 
रोया हकाकियान या इराणी अमेरिकन ज्यू पत्रकार आहेत. इराणमध्ये जन्मलेल्या रोया यांच्या कुटुंबीयांना अयातुल्ला खामेनीच्या राजवटीतील द्वेष सहन करावा लागला. त्या आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मुक्तीचा आणि शांतीचा विचार मांडतात.
प्रत्येक युद्धानंतर जगाचा केवळ भूगोलच बदलत नाही, तर संस्कृतीसुद्धा बदलते. वरकरणी आपल्याला राजकीय सत्तेचा खांदेपालट दिसत असतो. मात्र, समाजाच्या अदृश्य रक्तवाहिन्यांमध्ये अनेक छोटेछोटे बदल सातत्याने घडत असतात. लोकांचे जीवन आमूलाग्र बदलते. युद्ध, यादवी संघर्ष आदी गोष्टींमुळे इराण मागची कित्येक दशके धुमसतो आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक राष्ट्रांना भोगावा लागला. भू-राजकीय संघर्षांच्या मुळाशी असलेली वर्चस्ववादी वृत्ती युद्धाला कारणीभूत ठरते. मात्र, या युद्धाची किंमत सर्वात जास्त मोजणारा घटक म्हणजे महिला. भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला जो विश्वशांतीचा विचार दिला, तो याच स्त्रीमुक्तीच्या अनुबंधाला पूरक आहे. येणार्‍या काळात एक समूह आणि एक कुटुंब म्हणून या भेदांच्या पलीकडे आपला प्रवास सुरू होईल, अशी आशा करुया...
 
 
 
Powered By Sangraha 9.0