दूरदृष्टी नियोजनाची, आकांक्षा समाजसेवेची...

08 Mar 2026 18:23:09
Rohini Lokare
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला अधिकारी ते कार्यकारी अभियंता असा रोहिणी लोकरे यांचा ३७ वर्षांचा प्रवास. हा प्रवास केवळ त्यांच्या कर्तृत्वाचा आणि पदोन्नतीचाच नसून, तर तो त्यांच्यावरील विश्वासाचेही प्रतिबिंब दर्शविणारा आहे. या काळात लोकरे यांनी अनेक विकास प्रकल्प पूर्णत्वाला नेले. तेव्हा, आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त प्रशासकीय कामाबरोबरच सामाजिक कार्याची कास धरणार्‍या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
 
तुम्हाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेत ३६ वर्ष पूर्ण झाली असून, तुमच्या सेवेचे हे ३७वे वर्ष. तेव्हा, आपल्या जीवनप्रवासाविषयी काय सांगाल?
 
माझ्या जन्माच्या वेळी ‘रोहिणी’ नक्षत्राचा पाऊस पडत होता. त्यामुळे आजोबांनी माझे नाव ‘रोहिणी’ असे ठेवले. आईचे शिक्षण ११वी मॅट्रीक, तर वडिलांचे ‘बीए ऑनर्स’ झाले होते. वडिलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये झालेले असल्याने आम्ही जन्मापासूनच ‘मिलिटरी’ शिस्तीत वाढलो. आजोबा आणि आई-वडील शिक्षणाबाबत जागरूक असल्याने पहिली ते दहावीपर्यंत शाळेत प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण झाले. दहावीला स्वयंअभ्यास करून शाळेत सर्वप्रथम आल्याने नाशिक जिल्ह्यात अनेक सत्कार झाले. ‘जे.जे. स्कूल ऑफ ऑटर्स’ शिकण्याची इच्छा होती; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे नाशिकच्या शासकीय ‘तंत्रनिकेतन’मध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर ‘स्थापत्यशास्त्र’ची पदविका प्राप्त केली.
 
खासगी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचा पर्याय उपलब्ध असताना, आपण सरकारीसेवेत रुजू होण्याचा निर्णय का घेतला?
 
खासगी नोकरी दोन वर्षे केल्यानंतर वडिलांनी गिरीश लोकरे यांच्याशी विवाह लावून दिला. माझे सासरे रामकृष्ण लोकरे हे अतिशय जिज्ञासू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी माझी आवड पाहून तत्काळ ड्रॉईंग बोर्ड आणि त्यासोबत आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या. तसेच पुढील शिक्षणासाठीही परवानगीदेखील दिली; परंतु लगेचच तीन महिन्यांत ‘केडीएमसी’मध्ये ‘कनिष्ठ अभियंता’ पदावर नियुक्ती झाली. ‘केडीएमसी’तील पहिली महिला इंजिनिअर होण्याचा मान मला मिळाला.
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काम करतानाचा आजवरचा प्रवास कसा राहिला?
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर बांधकाम खात्यात ‘टेक्निकल स्क्रूटिनी’ विभागात म्हणजे बांधकाम मुख्यालयात काम केले. त्याच वेळी तत्कालीन शहर अभियंता जागंडे सर यांनी प्राकलनांची तांत्रिक तपासणी कशी करायची, हे शिकविले. सुमारे सात वर्षे शासनाच्या शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली काम केले. त्यामुळे १९९७ साली ‘उपअभियंता’ म्हणून बढती मिळाल्यानंतर ‘साईट’वर काम करणे अतिशय सुलभ झाले. ‘फ’ प्रभागात ‘उपअभियंता’ पदावर काम केले. वडील, मोठी बहीण, मोठा भाऊ सगळे सरकारी नोकरीत असल्याने मीदेखील शासकीय नोकरीत सेवा बजावण्याचा निर्णय घेतला.
 
महापालिकेत पर्यावरण आणि प्रकल्प विभागाची जबाबदारी आपण सांभाळत आहात. या विभागात काम करण्याचा एकंदरीतच अनुभव कसा आहे?
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि तांत्रिक अधिकार्‍यांनी प्रारंभीपासूनच जबाबदारीची कामे सोपविल्यामुळे मी इतर अभियंत्यांप्रमाणे कामे करत होती. रस्ते, गटार-बांधणी, इमारत-बांधणी हे ज्ञात असल्याने फारशी अडचण काम करताना आली नाही; परंतु पाणीपुरवठा जलवाहिन्या, भुयारी गटारांची कामे, तसेच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणे, ही कामे माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे या कामांचा अनुभवदेखील चांगला होता. स्मशानभूमी, दफनभूमीचे काम करतानाही खूप वेगवेगळे अनुभव आले. सुमारे १३ ते १४ स्मशानभूमींची कामे केली आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना अनेक वेळा दगडफेक, जीवे मारण्याची धमकी, कामगारांना मारहाण अशा अनेक घटना घडल्या. पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल कराव्या लागल्या होत्या. सुमारे सहा ते सात कोर्ट केसेस दाखल झाल्या. सुमारे २५ वर्षे उपअभियंता म्हणून काम केले आहे. तसेच ‘कोविड’ काळात ‘कोविड रुग्णालय मॅनेजर’ म्हणूनही काम केले. पर्यावरणविषयक विविध प्रकल्प राबवायची आवड आहे. या विभागामार्फत स्मशानभूमीमुळे होणारे वायुप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून ४० बर्निंग स्टॅण्डवर ‘वायुप्रदूषण नियंत्रण’ प्रणाली बसविण्याचे काम हाती घेतले आहे. शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळादेखील आम्ही आयोजित केली होती. त्यात ९९ शाळांचे एकूण चार हजार, ६५७ विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, तसेच ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली.
 
कल्याण-डोंबिवली ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत आतापर्यंत तुम्ही कोणते उपक्रम हाती घेतले आहेत?
 
‘स्मार्ट सिटी’बरोबरच इतर उपक्रमांतर्गत आतापर्यंत विविध पर्यावरणपूरक व नागरी सुविधा सुधारणा प्रकल्प हाती घेतले आहेत. हिरवळ वाढवणे, पर्यावरणीय समतोल राखणे, पायाभूत सुविधांचे नियोजन करणे, या सगळ्या कामांमध्ये टीमवर्क, तांत्रिक ज्ञान आणि लोकसहभाग या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या प्रवासात अनेक प्रकल्प मला आपल्या जवळचे वाटतात. कारण, ते थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत.
 
कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावण्याबरोबरच सामाजिक जीवनातही आपण फार क्रियाशील आहात. त्याविषयी काय सांगाल?
 
महाविद्यालयात असताना सायंकाळी शाळेतील गणितात कमकुवत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनींना बीजगणित आणि भूमिती विनामूल्य शिकवत असे. दहा दिवसांची अभ्यास शिबिरेदेखील मी घेत होते. नोकरी करत असताना सुरुवातीच्या काळात जेवणाच्या सुटीत ग्लास पेंटिंग, वूड पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, बांबूस्टिक वापरून देखावे करणे इत्यादी बाबी शिकून सायंकाळी इतर मुलींना शिकवीत असे. ‘कोविड’ काळात रुग्णांसाठी ‘मेडिटेशन’ घेत असे. त्यामुळे रुग्णांच्या ‘रिकव्हरी’चा रेट खूप चांगला होता. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेतर्फे मजुरांना ६५० राशी-किट उपलब्ध करून प्रत्यक्ष त्यांच्या वस्तीत जाऊन वाटप केले. कार्यालयीन कामाबरोबरच सामाजिक जीवनातही सक्रिय राहण्याचा प्रयत्न असतो. समाजाशी जोडलेले राहणे, महिलांच्या प्रश्नाबद्दल संवेदनशील राहणे आणि तरुणपिढीला मार्गदर्शन करणे, मला महत्त्वाचे वाटते. कारण, एक संवेदनशील नागरिक म्हणून ती आपली जबाबदारी वाटते.
 
आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त महिलांना काय संदेश द्याल?
 
‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने सर्व महिलांना एवढेच सांगू इच्छिते की, स्वत:वर विश्वास ठेवा, शिक्षणाला प्राधान्य द्या आणि संधी मिळेल तेव्हा पुढे या. अडचणी येतील. पण, त्या तुमची ताकद वाढवण्यासाठीच असतात. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याचा ध्यास कायम ठेवा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0