समाजकार्यापासून ते राजकीय वाटचाल : एक प्रेरणादायी प्रवास

08 Mar 2026 18:11:50
Rasika Shrikrishna Patil
 
इच्छाशक्ती, जिद्द आणि समाजसेवेची आवड जेव्हा राजकारणात येते, तेव्हा बदलाची नांदी सुरू होते. असाच समाजकार्यात सक्रिय असणारा चेहरा म्हणजे, भाजपच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका रसिका श्रीकृष्ण पाटील. आता त्या महापालिकेत जनतेचे प्रश्न मांडणार आहेत. समाजकार्यापासून राजकारणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने जाणून घेऊया...
नगरसेवकपदासाठी निवडणूक उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती?
 
पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी मिळते हे समजले, तेव्हा खूप आनंद आणि त्याचा अभिमानदेखील होता. आमच्या प्रभागात जी कामे केली आहेत, त्यावर विश्वास होता. मला मिळालेली संधी स्वीकारली. निवडणुकीकडे राजकीय पद म्हणून न पाहता, समाजकल्याणाची संधी मिळणार आहे, या दृष्टिकोनातूनच पाहिले. समाजकल्याणासाठीच काम करत असल्याचे कामातून नागरिकांनाही दिसून येईल.
 
प्रभागातील नेमक्या कोणत्या समस्यांवर तुम्ही आता प्राधान्याने काम करीत आहात?
 
सध्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, स्वच्छता, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, प्रभागाचा विकास यांचा समावेश आहे. नागरिक जे प्रश्न घेऊन येतात, ते सोडविण्याचा प्राधान्याने प्रयत्न करतो. नागरिकांनी मला महापालिकेत जाऊन त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली आहे आणि ते प्रश्न महापालिकेत मांडणार आहे. आतापर्यंत समाजसेवा म्हणून काम करत होते. आता त्याच्या पुढे जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. माझा प्रभाग कसा स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर असेल, ही प्रेरणा नागरिकांसमोर ठेवणार आहे.
 
सामाजिक क्षेत्रातून आता राजकीय पटलावर काम करताना तुमच्या पतीची कशी साथ मिळते?
 
माझे पती श्रीकृष्ण बाळाराम पाटील हे गेली अनेक वर्षे समाजसेवक म्हणून येथे कार्यरत आहेत. त्यांना प्रभागातील नागरिकांचे अनुभव आणि नागरिकांना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याची माहिती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न महापालिका सभागृहात मांडणार आहे. प्रभागात विकासकामे कशी करायची, हे जाणून घेऊन त्या दिशेने कामे करीत आहे. आमच्यामध्ये याबाबत चर्चा होतात. या सगळ्यात कुटुंबाची साथ असली पाहिजे, ती मला मिळाली आहे.
 
महिला नगरसेवक म्हणून प्रभागातील महिलांसाठी कोणत्या महत्त्वाकांक्षी योजना तुम्ही राबविणार आहात?
 
महिला नगरसेविका म्हणून महिलांना प्रथम प्राधान्य देईन. महिला सक्षमीकरण, सुरक्षा, मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन, बचतगट बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहे. महिलांना पुढील काळातसुद्धा प्राधान्य देणार आहे. महिलांसाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. बचतगटाच्या माध्यमातून आम्ही भेटतो, तेव्हा त्यावर मार्गदर्शन करते. माझ्या प्रभागातील महिलांना त्यांच्या क्षेत्रात कसे बळकट केले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
 
नगरसेवक ते आता राज्यसभा खासदार म्हणून उमेदवार असा प्रवास नागपूरच्या माया इवनाते यांनी केला आहे. भाजपमध्ये हे शक्य झाले, त्याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे?
 
भाजप हा नेहमीच कार्यकर्त्यांना संधी देतो. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांनाही भाजपकडून स्थानिक स्तरापासून मोठ्या पदावर काम करता येते. माया इवनाते यांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. स्थानिक स्तरावरील सर्व महिलांनी माया इवनाते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. माझे पती श्रीकृष्ण आणि मी कार्यकर्ते म्हणून काम करत होतो. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमच्यावर विश्वास दाखविला. आम्ही जुनी डोंबिवलीमध्ये ‘गणेश घाट प्रकल्प’ हाती घेतला. त्यासाठी आमदार निधीतून निधीही मिळाला. भाजपत काम करण्याची इच्छा असेल, तर त्याला हा पक्ष नक्कीच पुढे घेऊन जातो आणि कार्यकर्त्याला योग्यरीत्या मार्गदेखील दाखवतो.
 
आज ‘जागतिक महिला दिना’साठी तमाम महिलावर्गाला काय संदेश द्याल?
 
‘जागतिक महिला दिना’निमित्त महिलांना एवढाच संदेश देईन की, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. महिला कुटुंब सांभाळते. तसा तिचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही मोठा वाटा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक योजना राबवितात. त्या महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असते. त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा. कोणत्याही कामासाठी पुढे यावे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0