‘जागतिक महिला दिना’निमित्त संकल्प स्त्रियांबद्दलची परिभाषा बदलण्याचा...

08 Mar 2026 15:25:55
Women’s Dignity
 
हल्ली ‘लग्न’ हा शब्द उच्चारताच अनेक घरांमधील लग्नाळू मुलामुलींच्या कपाळावर आठ्या उमटतात. मनोमन लग्न करण्याची इच्छा असली, तरी आपल्याला अनुरुप जोडीदार मिळेल का, या प्रश्नाची मुलामुलींसह त्यांच्या पालकांनाही चिंता भेडसावते. लग्न जुळण्यापासून ते ती न टिकण्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कारणे असली, तरी शेवटी विवाहसंस्था ही भारतीय कुटुंबव्यवस्थेचा कणाच. त्यामुळे समाजाचा हा कणा शाबूत ठेवायचा असेल, तर केवळ मुलामुलींनीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनीही मानसिकतेत आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर ‘अनुरुप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ. गौरी कानिटकर वैवाहिक ऋणानुबंध जपण्यासाठी ‘लग्नानुबंध’ या मासिक सदरातून आपल्या भेटीला येणार आहेत. आज या सदराचे प्रथम पुष्प खास ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने गुंफले जात असल्यामुळे, स्त्रियांबद्दलची समाजातील परिभाषा बदलण्याची गरज आणि त्याअनुषंगाने समाजाला आवाहन करणारा हा लेख...
 
सर्वप्रथम ‘जागतिक महिला दिना’च्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! दरवर्षी आपण सगळेजण ‘महिला दिन’ साजरा करतो. अशा वेळी असेही म्हणतो की, एकच दिवस ‘महिला दिन’ साजरा करण्याऐवजी रोजच ‘महिला दिन’ साजरा केला जावा. असे दिन साजरे करत असतानाच महिलांना, स्त्रियांना नेमके काय हवे आहे बरे, याचा विचार व्हावा असे वाटते. विशेष करून लग्नाळू मुलींच्या बाबतीत तर अनेक गोष्टी बोलल्या जातात. उदा. ‘मुली हल्ली फारच शेफारल्या आहेत. किती अपेक्षा या? घरातली कामे जराही करायला नकोत यांना...! स्वयंपाक तर येतच नाही... पैसे मिळवतात म्हणजे हात आभाळाला टेकले की काय?’ वगैरे वगैरे...
 
‘अनुरूप’ विवाहसंस्थेत काम करत असताना अशाप्रकारचे कितीतरी शेरे मला रोज ऐकायला मिळतात. परवाच एक गृहस्थ ऑफिसमध्ये भेटायला आले होते. एका लग्नाळू मुलाचे वडील होते. ते म्हणाले की, "हल्ली ही मुले-मुली बाहेर भेटतात; तर पूर्वीसारखे आम्ही घरीच त्या मुलीला बघायला गेलो, तर चालेल का?”
 
मला एकदम जाणवले की, आता बदलत्या काळात आपल्याला स्त्रियांबद्दल बोलताना परिभाषा बदलायला हवी ना? पूर्वीसारखेच बोलून कसे चालेल? भारतीय समाजात लग्न ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची जुळवाजुळव मानली जाते. या सुंदर नात्याभोवती अनेक परंपरा, रूढी आणि भावनिक अपेक्षा गुंफलेल्या असतात. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत आपण नकळत जी भाषा वापरतो, ती अनेकदा मुलीला दुय्यम स्थान देणारी असते. शब्द छोटे असतात; पण त्यांचा परिणाम खोलवर होतो.
 
आपण रोज वापरत असलेली भाषा ही आपल्या विचारांची आणि संस्कारांची झलक दाखवते. ‘मुलगी दाखवायला जाणे’, ‘मुलगी देणे’, ‘अमया घरात मुलगी दिली आहे’, असे शब्दप्रयोग अनेक घरांत सहजपणे वापरले जातात. हे शब्द इतके रूढ झाले आहेत की, त्यातला अपमानकारक अर्थ आपल्याला जाणवतही नाही. आपल्याकडे अजूनही ‘मुलगी पाहायला जाणे’ हा शब्दप्रयोग खूप सामान्य आहे. या वयातच मुलगी एखाद्या प्रदर्शनातील वस्तूसारखी वाटते. प्रत्यक्षात लग्न ठरवण्याची प्रक्रिया ही दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेण्याची असते. म्हणून ‘मुलगी पाहायला जात आहोत’ याऐवजी ‘मुलीची आणि मुलाची ओळख करून घेण्यासाठी भेट ठरवली आहे’ असा शब्दप्रयोग अधिक सन्मानजनक आणि समतोल आहे. त्यामुळे मुलीवरचा दबाव कमी होतो आणि मुलगाही तितयाच जबाबदारीने या प्रक्रियेत सहभागी होतो.
 
‘मुलगी दिली जाते’ की मुलगी लग्न करते?
 
‘मुलगी दिली’ हा शब्दप्रयोग अजूनही अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो. या वयात मुलीची स्वतंत्र ओळख पूर्णपणे पुसली जाते. जणू ती एखादी वस्तू आहे, जी एका घरातून दुसर्‍या घरात दिली जाते. याऐवजी ‘मुलगा आणि मुलगी दोघेही विवाहबद्ध झाले आहेत’ आणि ‘लग्नानंतर मुलगी पतीच्या घरी राहायला जाणार आहे’ असा छोटा बदल मुलीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता देतो. या वयामध्ये मालकीचा भाव नाही, तर परस्पर आदर आहे.
 
भाषा बदलली की नातेसंबंध बदलतात. ‘अनुरूप’मध्ये समुपदेशनाच्या कामात आम्हाला वारंवार जाणवते की, अनेक गैरसमज, ताण आणि भावनिक दुखापती या भाषेमुळे निर्माण होतात. जेव्हा मुलीला सतत दुय्यम वागणूक देणारी भाषा ऐकू येते, तेव्हा तिच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो. स्त्री-पुरुष ही मालकी हक्काची स्पर्धा नव्हे, कोण श्रेष्ठ हाही विचार नव्हे, तर ‘दोघे मिळून पुढे जाऊ’ हा विचार दोघांच्या प्रगतीला हातभार लावतो. मुलगी ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली, स्वतंत्र विचार करणारी माणूस आहे. मग तिच्याबद्दलची भाषा इतकी एकतर्फी आणि कमीपणा दाखवणारी का असावी?
 
‘जागतिक महिला दिना’कडे थोडे अजून खोलवर पाहायचे झाले, तर तो केवळ साजरा करण्याचा दिवस नसून समाजाच्या आरशात स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. ‘जागतिक महिला दिना’ची सुरुवात कामगार महिलांच्या हक्कांसाठीच्या चळवळीतून झाली. ‘युनायटेड नेशन्स’ने १९७५ पासून अधिकृत मान्यता दिली; पण त्यामागे शेकडो महिलांचा संघर्ष होता. त्यामुळे हा दिवस केवळ उत्सव नाही, तर आंदोलनाची आठवण करून देण्याचा आहे.
 
सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व केले, कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक स्त्रीला तिची क्षमता ओळखू देणे आवश्यक आहे. पुरुषांनी घरकामात हातभार लावणे, कार्यस्थळी स्त्रियांच्या मताचा आदर करणे, हे छोटे बदलही मोठा परिणाम करू शकतात. ‘महिला दिना’चा खोलवर विचार म्हणजे स्वतःच्या विचारसरणीची तपासणी. समानता म्हणजे सारखेपणा नाही, तर संधी, आदर आणि निवडीचे स्वातंत्र्य.
यावर्षीच्या ‘महिला दिना’च्या निमित्ताने आपण स्त्रियांबद्दलची परिभाषा बदलण्याचा संकल्प करूया. बोलताना शब्द जाणीवपूर्वक निवडणे, मुलांना समतोल भाषा शिकवणे, लग्नाच्या
 
चर्चेत आदरयुक्त शब्द वापरण्याचा आग्रह धरणे, हे करूया.
 
लग्न ही आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्या पायरीची सुरुवातच जर आदरयुक्त भाषेत, सन्मानाच्या भाषेत झाली, तर पुढचा प्रवास अधिक सुंदर आणि समतोल होऊ शकतो. लग्न ही व्यवहाराची गोष्ट नाही, तर ती समानतेवर उभी असलेली भागीदारी आहे.
 
शब्द बदलणे म्हणजे विचार बदलणे. हे वाटते तितके सोपे नाही; पण त्यासाठी लागणारी जागरूकता आणि संवेदनशीलता असेल, तर नक्कीच जमेल.
 
भाषा बदलली की, दृष्टिकोन बदलेल आणि मग समज बदलायला कितीसा वेळ लागणार?
 
 
- डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‘अनुरुप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून ‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0