‘वारसा जनसेवेचा आणि वसा विकासाचा’ म्हणत भोईर घराण्याची राजकीय परंपरा पुढे घेऊन जाणार्या भाजपच्या कल्याण-डोंबिवलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा हृदयनाथ भोईर यांच्याशी ‘जागतिक महिला दिना’निमित्त साधलेला हा संवाद...
आपण नुकत्याच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आला आहात. तेव्हा एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून काय भावना आहेत?
एक महिला नगरसेविका म्हणून माझ्या भावना खूप अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहेत. महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. समाजातील बदलत्या विचारसरणीमुळे महिलांना अधिक संधी मिळत आहेत. नगरसेवक म्हणून काम करताना मला समाजासाठी काम करण्याची आणि विशेषत: महिलांच्या व मुलींच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याची संधी मिळते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी काम करणे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. आज महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता, समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे भविष्यातही समाजासाठी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
डोंबिवलीच्या राजकीय पटलावर भोईर कुटुंबाची स्वच्छ राजकीय प्रतिमा आहे. त्यामुळे जनतेच्याही साहजिकच तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या लक्षात घेता, आपले प्रभागातील विकासकामांचे व्हिजन काय आहे?
डोंबिवलीच्या राजकीय पटलावर आज भोईर कुटुंब हे नाव स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेसाठी समर्पित राजकारणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा वारसा केवळ नावाचा नाही, तर मूल्यांचा, प्रामाणिकतेचा आणि लोकसेवेच्या निष्ठेचा आहे. हा वारसा पुढे चालवणे म्हणजे फक्त पद भूषवणे नाही, तर त्या विश्वासाला पात्र ठरणे आहे. स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी पारदर्शक निर्णय-प्रक्रिया, लोकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव न करता काम करणे, हे माझे पहिले ध्येय असेल. प्रभागाच्या सर्वांगीण विकासात मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून प्रभागातील परिसर अधिक सक्षम आणि सुंदर बनवू. युवापिढीला संधी, महिलांना सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देणारे वातावरण निर्माण करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भोईर कुटुंबाने जपलेली प्रामाणिकता, जनसंपर्क आणि लोकाभिमुख भूमिका याच तत्त्वांवर मी पुढे वाटचाल करणार आहे. परिसरातील नागरिकांचा विश्वास, मार्गदर्शन आणि आशीर्वाद, हीच खरी ताकद आहे.
नगरसेविका म्हणून ही आपली दुसरी टर्म आहे. तेव्हा पहिल्या टर्म आणि नंतर ‘कोविड’ काळातील कामाचा अनुभव कसा होता?
नगरसेविका म्हणून दुसरी टर्म असली, तरी पहिल्या टर्ममध्येच लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून अनेक विकासकामे केली. नागरिकांशी सतत संपर्क करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. ‘कोविड’काळ हा सर्वांसाठीच मोठा आव्हानात्मक होता. त्याकाळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. गरजू कुटुंबांना अन्नधान्य व औषधे उपलब्ध करून दिली. तसेच लसीकरण आणि जनजागृतीसाठी काम करणे, ही मोठी जबाबदारी होती. प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने परिसरातील लोकांना शक्य ती सर्व मदत केली. या दोन्ही काळातील अनुभवामुळे नागरिकांची सेवा करण्याची अधिक प्रेरणा मिळाली आणि पुढील काळात ही विकासकामे करण्याचा माझा निर्धार मजबूत झाला.
तुमचे पती हृदयनाथ भोईर हेदेखील नगरसेवक होते. तेव्हा त्यांच्या अनुभवाचा आपल्याला कसा उपयोग होतो?
माझे पती हृदयनाथ भोईर यांनी नगरसेवक म्हणून काम करताना जनतेशी जुळवून घेतलेले नाते, प्रशासनातील अनुभव आणि विकासकामांची समज ही माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लोकांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता, त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा कसा करायचा, हे मी त्यांच्याकडून शिकले. प्रशासनाशी सुसंवाद ठेवत कामे कशी पूर्णत्वाला न्यायची, याचा अनुभव त्यांच्या मार्गदर्शनातून मला मिळतो. त्यांच्या अनुभवातून शिकत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण अधिक सक्षम आणि प्रगत समाज घडवू.
महापालिका निवडणुकीत पॅनेल पद्धतीत तुमच्या प्रभागात बराच नवीन भाग समाविष्ट झाला आहे. तेव्हा, येथील विकासासाठी तुम्ही काय नियोजन केले आहे?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी आमच्यावर विश्वास दाखवून, आम्ही पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आम्हाला विकासकामांसाठी निधी मिळवून दिला. नवीन समाविष्ट झालेल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. सर्वप्रथम त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या मूलभूत गरजा समजून घेणार आहे. तसेच त्या भागातील उद्याने, क्रीडांगणे, आरोग्यसुविधा आणि शैक्षणिक सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. युवक आणि महिलांसाठी विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील.