Iran threat to Donald Trump: ट्रम्प यांना सोडणार नाही; खामेनेईंच्या हत्येनंतर इराणची थेट अमेरिकेला धमकी

08 Mar 2026 17:52:16
Iran threat to Donald Trump
 
तेहरान/वॉशिंग्टन : (Iran threat to Donald Trump) २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू केले. या मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण आक्रमक झाले असून त्यांनी मध्यपूर्वेतील अमेरिकन-इस्रायल तळ आणि दूतावासांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या हल्ल्याचा बदला घेण्याचीही धमकी दिली आहे.
 
इराणची बदल्याची भाषा
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही ट्रम्प यांना सोडणार नाही. त्यांनी केलेल्या कृत्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल,” असे लारीजानी म्हणाले. आमच्या नेत्यासह हजारो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत बसणार नाही आणि हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
 
राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचा इशारा
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. “इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच भागदेखील कोणालाही घेऊ दिला जाणार नाही. कोणी आमच्या सार्वभौमत्वाला किंवा प्रादेशिक अखंडतेला धक्का देण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. इराण कोणत्याही देशावर हल्ला करण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
 
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या धमक्यांना फेटाळून लावले आहे. “इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शांततेने चर्चा करण्याची वेळ संपली आहे आणि आता इराणसमोर फक्त आत्मसमर्पणाचा पर्याय उरला आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले. इराण शरणागती पत्करत नाही तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
मध्यपूर्वेत वाढती अस्थिरता
अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जागतिक स्तरावरही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0