प्रखर ध्येयभावनेने आयुष्य जगलेले ‘तात्या’

08 Mar 2026 12:45:19
Digambar Bhagwat
 
संघाच्या शाखेतून घडलेले स्वयंसेवक आपल्या आचार-विचारातून आणि जीवनशैलीतून राष्ट्रभक्ती, शिस्त आणि समाजसेवेची मूल्ये जगासमोर ठेवतात. अनेक स्वयंसेवक आयुष्यभर संघकार्य करत, समाजात निःस्वार्थ सेवेचे आदर्श निर्माण करतात. अशाच संघनिष्ठ, साधेपणाने; पण प्रखर ध्येयभावनेने आयुष्य जगलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे कै. दिगंबर गणेश भागवत अर्थात, ‘तात्या’ भागवत. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा संघसंस्कार, त्याग, साधेपणा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरतो.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यथार्थ ओळख संघाच्या शाखा, स्वयंसेवकांच्या माध्यमातूनच होते. संघाचे विचार, शिस्त, प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात पूर्णपणे भिनविलेले समर्पित कार्यकर्ते वयोमानानुसार संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाले, तरी संघव्रतापासून ढळत नाहीत. उलट, संघाची समाजात ओळख बनून राहतात. असेच ध्येयासक्त व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. दिगंबर गणेश भागवत तथा ‘तात्या’ भागवत. दररोज सकाळी ७ वाजता खाकी पॅन्ट आणि इन केलेला शर्ट घालून सायकलवर स्वार होऊन तात्या शाखेसाठी बाहेर पडले नाहीत, असे घडले नाही. अगदी वयाच्या ९० वर्षापर्यंत प्रभात शाखेचा नित्यक्रम कधी चुकला नाही. म्हणूनच, सकाळी ठरावीक वेळेला ही ज्येष्ठ व्यक्ती कोठे जाते, या कुतूहलापोटी त्यांच्याशी ओळख करून घेऊन, मैत्री होऊन संघाशी जोडली गेलेली अनेक उदाहरणे आहेत.
 
आपल्याला लाभलेल्या दीर्घ आयुष्यातील प्रत्येक क्षण सळसळत्या उत्साहाने जगणारा झरा, परिचित व्यक्तीच्या पाठीवर सलगीची थाप मारणारा हळुवार वारा, असे तात्या भागवतांचे वर्णन करणे योग्य ठरेल. आतून-बाहेरून साधे, सरळ, मोकळे, हळवे व्यक्तिमत्त्व, खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहत आपल्या नावाला साजेशा ‘दिगंबरी’ वळणाचे तात्या लहानांत लहान, मोठ्यांत मोठा होऊन रमणारे; सदा चैतन्यदायी. आयुष्यात अडचणी असंख्य आल्याच; पण वागण्यात कटुता, नकारात्मकता कधीच आली नाही. ध्येयाप्रती विश्वास कधी डगमगला नाही.
 
तात्यांचा जन्म
 
दि. ६ जानेवारी १९२१ रोजी संगमेश्वर तालुक्यातील सरंद गावात झाला. अगदी लहानवयातच पितृछत्र हरवले. आईने त्यांना लहानाचे मोठे केले. शालेय शिक्षण माखजन इंग्लिश स्कूलमध्ये झाले. बालवयातच त्यांचा शाखेशी संपर्क आला. गावातील कै. रघुनाथ तथा नाना भागवतांमुळे माखजन पंचक्रोशीत संघकामाला सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात देवगड येथे प्रचारक म्हणूनही सक्रिय राहिले. विवाहानंतर लगेचच गांधीहत्येनंतरच्या अटकसत्रात तात्यांना अटक झाली. पुढे मुंबईत गिरगावात राहत असताना काहीकाळ आग्रीपाडा, कामाठीपुरा भागात आणि १९४८ सालापासून घाटकोपर येथे स्थायिक झाल्यावर मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत असतानाही तात्या भागवतांनी अनेक वर्षे भाग, विभाग, महानगर स्तरावर वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. नव्यानेच बनलेल्या घाटकोपर भागाचे ते काही वर्षे कार्यवाह राहिले. गणपत शेणॉय, सीताराम नगरकर, जाम साहेब मुकादम हे त्यांचे सहयोगी कार्यकर्ते. शिवराय तेलंग, मधुकरराव मोघे, मुकुंदराव पणशीकर, अनंतराव देशपांडे यांसारखे मार्गदर्शक लाभले.
 
१९९० पासून भांडुप (पूर्व) येथे वास्तव्य. पुढे काहीकाळ साप्ताहिक ‘विवेक’चा वाचकवर्ग वाढावा म्हणून पूर्णवेळ त्यासाठी मुंबई महानगर आणि जवळच्या परिसरात सक्रिय. ‘श्रीराम जन्मभूमी’ आंदोलनात कारसेवेसाठी त्यांचा सहभाग होता. लहान, थोर यांसारख्या कोणत्याही वयाच्या व्यक्तींबरोबर बोलताना त्यांच्याच वयाचे होऊन त्यांना आपलेसे करणे आणि पुढे त्यांना स्वयंसेवक करणे, चुलीपर्यंत जाऊन संवाद करत सगळा परिवार संघानुकूल करणे, अत्यंत किमान गरजा आणि साधेपणा जपत भरपूर वेळ संघकामाला देणे, सायकल हाताशी घेऊन दिवसाच्या कोणत्याही वेळी कार्यक्षेत्रात सतत फिरत राहणे, अशा अनेक पैलूंचे उदाहरण म्हणजे कै. दिगंबर गणेश भागवत.
 
त्यांना विविध खेळांची खूप आवड. नियमित व्यायाम आणि सायकल चालविणे, यामुळेच निरोगी आरोग्याचे धनी. आपले गाव आणि गावातील माणसे यांवर तात्यांचे नितांत प्रेम. आयुष्यभर गावाचा, गावकर्‍यांच्या विकासासाठी तन-मन-धनाने सतत झटत राहिले. ‘कर्मण्येऽवाधिकारस्ते’ या भगवंताच्या उपदेशाला जागत राहिले. गावचे लक्ष्मीनारायण मंदिर आणि गावाची एकी यासाठी सतत कार्यरत राहिले. शक्य असूनही ऐहिक सुखाचे लोभी, भोगी बनले नाहीत. दोन खोल्यांतही सुखाने संसार आणि नंतर घर, बंगला, गाड्या, गावची मालमत्ता कशाचा मोह, लोभ शिवलाच नाही. मी आणि माझी सायकल बरी, ही वृत्ती जीवनात अखंड अविचलित करणारी ठरली. दिगंबरपंतांच्या धर्मपत्नी कै. मालती भागवत यांनीही आपल्या पतीचे व्रत आपले मानले. कसलीही तक्रार न करता काटकसरीने नेटका संसार केला.
 
संघसंस्कार आपल्या कुटुंबात रुजवण्यातही दिगंबरपंत यशस्वी झाले. त्यांचा मुलगा कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि सून मुंबई महानगर ‘संस्कार भारती’शी संलग्न आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब-दोन मुली, एक मुलगा-सून, दोन जावई आणि नातवंडे, सगळे संघानुकूल आहेत. अनेक पिढ्या घडवणारे असे हे कृतार्थ संघसमर्पित व्यक्तिमत्त्व कै. दिगंबर गणेश भागवत! त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
 
 
 
Powered By Sangraha 9.0