महिला दिनी ऍक्वा लाईनची धुरा महिलांच्या हाती; २ स्थानके पूर्णपणे महिला संचलित करणार

07 Mar 2026 16:53:12
Mumbai Metro Stations Operated by Women on Women’s Day
 
मुंबई : (Mumbai Metro Stations Operated by Women on Women’s Day) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून स्त्रीशक्तीचा गौरव करणारा अभिमानास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे. दि.८ मार्च रोजी मुंबई मेट्रो लाईन ३ अ‍ॅक्वा लाईनवरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही दोन महत्त्वपूर्ण स्थानके पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जाणार आहेत.ही केवळ जबाबदारी नाही, तर महिलांच्या नेतृत्वक्षमतेचा आणि शहरी वाहतूक क्षेत्रातील त्यांच्या वाढत्या सहभागाचा प्रभावी संदेश यानिमित्ताने दिला जाणार असल्याचे एमएमआरसीएलने सांगितले.
 
हेही वाचा : Vishwas Patil : 'संभाजी' कादंबरीतील 'तो' उल्लेख काल्पनिक! विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?
 
त्या दिवशी स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व्यवस्था, देखभाल सहाय्य ते हाऊसकीपिंगपर्यंतची सर्व कामे महिलांच्या खांद्यावर असतील. विविध शिफ्टमध्ये एकूण ८५ महिला कर्मचारी या स्थानकांचे कामकाज समर्थपणे सांभाळतील. अ‍ॅक्वा लाईनच्या दैनंदिन संचालनातही महिलांचा ठसा स्पष्ट दिसतो. सध्या २७ महिला ट्रेन ऑपरेटर्स (मेट्रो पायलट) नियमितपणे मेट्रो गाड्या चालवत असून सुरक्षित, वेळेवर आणि सक्षम सेवा देत आहेत. एकूण १,३८८ महिला कर्मचारी विविध स्तरांवर एमएमआरसीमध्ये कार्यरत आहेत.कार्यालयीन प्रशासनापासून ऑपरेशन्स, तिकीटिंग, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान भक्कम आहे.महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती देत एमएमआरसीएलने केवळ प्रतीकात्मक उपक्रम न राबवता, स्त्रीशक्तीवरील विश्वास आणि समान संधींची बांधिलकी अधोरेखित केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0