फेरी बोट म्हटली की, डोळ्यासमोर निवांत सागरकिनारी सहली किंवा रोजच्या प्रवासासाठीची विश्वासार्ह जलवाहतूक येते. या बोटी त्यांच्या स्थैर्यामुळे आणि उपयोगितेमुळे जगभरातील सागरी वाहतुकीचा कणा मानल्या जातात. पण, या साध्यासुध्या वाटणार्या फेर्यांमध्येही काही अशा आहेत, ज्यांनी वेग, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या मर्यादा मोडून काढल्या आहेत. गेल्या काही दशकांत सागरी अभियांत्रिकीने प्रचंड झेप घेतली आहे. अत्यंत शक्तिशाली टगबोटी, आधुनिक नौदल जहाजे आणि अतिवेगवान फेर्या ही त्याचीच उदाहरणे.जेट विमान किंवा हायपर कार वेगाच्या शर्यतीत अग्रेसरच. पण, फेरी हा एक वेगळाच खेळ आहे. मोठा आकार, शेकडो प्रवासी, वाहनांची वाहतूक, समुद्राचे खवळलेले पाणी या सगळ्यांच्या समतोलात वेग साधणे ही अभियांत्रिकीची खरी कसोटी असते. तरीही, काही धाडसी जहाजबांधणी कंपन्यांनी अशा फेरी तयार केल्या आहेत, ज्या आकाराने मोठ्या असूनही लहान आणि हलक्या बोटींसारख्या वेगाने मार्गक्रमण करतात.
याच परंपरेतून उदयास आलेली ‘एचएससी फ्रान्सिस्को’ ही आज जगातील सर्वात वेगवान फेरी म्हणून ओळखली जाते. २०१३ साली अर्जेंटिनाच्या ‘बॅकब्स’ कंपनीसाठी ऑस्ट्रेलियातील ‘इनकॅट टास्मानिया पीटीवाय लिमिटेड’ यांनी बांधलेले हे ‘कॅटमरॅन डिझाईन’चे जहाज वेग, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांचा अद्वितीय संगम आहे. कॅथोलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांच्या सन्मानार्थ या फेरीला ‘फ्रान्सिस्को’ हे नाव देण्यात आले. २०१३ साली सेवेत दाखल झालेली ‘फ्रान्सिस्को’ ही फेरी आजही जगातील सर्वात वेगवान प्रवासी जहाजांपैकी एक मानली जाते. हे जहाज केवळ वेगासाठी नव्हे, तर हरित तंत्रज्ञानाच्या वापरासाठीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिले आहे.
‘फ्रान्सिस्को रिओ दी ला प्लाटा’ या नदी मार्गावर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स आणि उरुग्वेची राजधानी मॉन्टेव्हिडिओ यांना जोडते. सुमारे २५० नॉटिकल मैलांच्या या मार्गावर व्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी ही फेरी महत्त्वाची जीवनरेखा ठरली आहे. आजच्या वेगवान आणि पर्यावरण-जागरूक जगात, सीमापार जलवाहतुकीचा हा आधुनिक नमुना म्हणून पाहिला जातो. ‘फ्रान्सिस्को’ ५१.८ नॉट्स (सुमारे ९६ किमी/ताशी) वेगाने धावू शकते, तर तिची डेडवेट क्षमता ४५० टन आहे. या फेरीची दोन इंजिन प्रत्येकी २२ मेगावॅट शक्ती निर्माण करतात. ही इंजिन द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी), तसेच ‘मरीन डिस्टिलेट’ या दोन्ही इंधनांवर चालू शकतात. ‘अॅक्सियल वॉटरजेट्स’ आणि ‘लिप्सट्रॉनिक ७०००’ या नियंत्रण प्रणालीमुळे जहाजाला उच्च-वेगातही अचूक दिशा व नियंत्रण मिळते. आज २०२० नंतरच्या दशकात सागरी उद्योगावर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रचंड दबाव आहे. ‘आंतरराष्ट्रीय सागरी संघटना’ २०५० पर्यंत शून्य-उत्सर्जनाच्या दिशेने प्रयत्न करत आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘फ्रान्सिस्को’चे ‘एलएनजी’आधारित तंत्रज्ञान हे दूरदृष्टीचे उदाहरण ठरते.
जहाज सुरू करताना ‘मरीन डिस्टिलेट’ वापरले जाते; परंतु प्रणाली स्थिर झाल्यावर ते स्वयंचलितपणे ‘एलएनजी’वर स्विच होते. बंदरात पोहोचताना पुन्हा ‘डिस्टिलेट’चा वापर होतो. ही संपूर्ण प्रक्रिया अखंडित आणि सुरक्षित आहे. ४३ घनमीटर क्षमतेचे दोन ‘सुपर-इन्सुलेटेड टँक’ जहाजात बसविलेले आहेत. हे टँक चार तासांच्या उच्च-वेगाच्या प्रवासासाठी पुरेसे इंधन पुरवतात, ज्यामुळे संपूर्ण फेरी एकाच बंकरिंगमध्ये पूर्ण करता येते. ‘फ्रान्सिस्को’मध्ये ९५५ प्रवासी आणि १५० कार वाहून नेण्याची क्षमता आहे. चार स्तरांमध्ये विभागलेल्या या जहाजात इकोनॉमी, टुरिस्ट, बिझनेस आणि फर्स्ट लास लाऊंजची सुविधा आहे. बार, ड्युटी-फ्री शॉप्स, रिसेप्शन एरिया आणि व्हीआयपी लाऊंज यामुळे हा प्रवास केवळ वाहतूक नसून एक आरामदायी अनुभव ठरतो. ९९ मीटर लांबी, २६.९४ मीटर रुंदी आणि ५० नॉट्स सेवा वेग असलेले हे ‘कॅटमरॅन डिझाईन’ आधुनिक जलवाहतुकीच्या मानदंडांनुसार तयार करण्यात आले आहे. २४ सदस्यांचा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग जहाजाचे संचालन करतो. आज जगभरात ‘हायस्पीड’ फेरीज, ‘एलएनजी’आधारित जहाजे आणि पर्यावरणपूरक प्रणालींची मागणी वाढत आहे. युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिका येथेही हरित जलवाहतुकीकडे कल वाढला आहे. वेग, तांत्रिक नावीन्य आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम साधत ‘फ्रान्सिस्को’ने सागरी वाहतुकीत एक नवा अध्याय लिहिला.